इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. हा विजय उल्लेखनीय आहे. भारतीय संघाचा आपल्याच भूमीवर हा सलग सतरावा विजय. २०१२मध्ये इंग्लंडविरुद्ध मालिका गमावल्यानंतर भारतीय संघाने सातत्याने विजय मिळवलेला आहे. घरच्या मैदानांवर जिंकण्यात कोणती मर्दुमकी हा प्रश्न फ्रँचायझी क्रिकेटच्या वाढत्या विस्तारानंतर कालबाह्य ठरू लागला आहे. कारण ‘परदेशी वातावरण’, ‘अनोळखी खेळपट्ट्या’ हे संदर्भच आता पुसले जाऊ लागले आहेत. त्यामुळे अलीकडच्या मालिकांवर नजर टाकल्यास एक बाब स्पष्ट होते. ती म्हणजे, घरच्या मैदानांवर मालिका ही आता विजयाची हमी ठरू शकत नाही. तशात इंग्लंडच्या संघाने प्रशिक्षक ब्रेंडन मॅककलम आणि कर्णधार बेन स्टोक्स यांच्या नेतृत्वाखाली इंग्लिश क्रिकेट संघ ‘बॅझबॉल’ या अत्यंत आक्रमक शैलीत खेळू लागला आहे. या शैलीशी जुळवून घेणे भल्याभल्या संघांना जड जाते. परंतु रोहित शर्माचे नेतृत्व आणि अनुभवी खेळाडूंना उदयोन्मुख खेळाडूंकडून मिळालेली साथ यांच्या जोरावर पहिला कसोटी सामना धक्कादायकरीत्या गमावूनही भारताने इंग्लंडवर बाजी उलटवली.

हेही वाचा >>> संविधानभान : भारतीय धर्मनिरपेक्षतेचे प्रारूप

कसोटी क्रिकेटमध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्येही दबावाखाली मोडून न पडण्याचा गुण भारतीय संघ विशेषतः ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध दाखवताना दिसतो. या मालिकेचे वैशिष्ट्य म्हणजे काही युवा क्रिकेटपटूंनी मोक्याच्या क्षणी परिपक्वता दाखवून अनुभवी खेळाडूंची उणीव जाणवू दिली नाही. यशस्वी जयस्वाल, सर्फराझ खान, ध्रुव जुरैल, आकाशदीप ही काही उदाहरणे. या संपूर्ण मालिकेत विराट कोहली, मोहम्मद शमी उपलब्ध नाहीत. के. एल. राहुल, जसप्रीत बुमरा दुखापत किंवा विश्रांतीच्या कारणास्तव अधूनमधून अनुपस्थित राहिले. श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, के. एस. भारत यांना सूर गवसला नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्याच कामगिरीतही सातत्य नव्हते. रविचंद्रन अश्विन एक संपूर्ण डाव उपलब्ध नव्हता. अशा विविध अडचणी सतत उभ्या राहात होत्या. त्या तुलनेत इंग्लंडचा संघ अधिक ताकदीने उतरला होता आणि ‘बॅझबॉल’च्या जोरावर आपल्याला मालिकाविजयाची सर्वोत्तम संधी आहे, अशी दर्पोक्ती इंग्लंडचे आजी-माजी क्रिकेटपटू करू लागले होते. परंतु भारताच्या स्थानिक क्रिकेटचा दर्जा आता जगातील सर्व देशांपेक्षा अधिक चांगला आहे हे या वेळीही दिसून आले. हे स्थानिक क्रिकेट आयपीएल नसून रणजी क्रिकेट आहे, याचा विशेष उल्लेख आवश्यक.

हेही वाचा >>> उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…

एका माजी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूने मागे म्हटल्याप्रमाणे, इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात अजूनही लाल चेंडूचे क्रिकेट गांभीर्याने खेळले जाते. त्यामुळे भारताच्या काही संस्मरणीय विजयांचे श्रेय आयपीएलला दिले जाते ते चुकीचे आहे. तंत्र, शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक कणखरपणा यांचा एकत्रित आविष्कार कसोटी क्रिकेटमध्येच दिसून येतो. या क्रिकेटसाठी आवश्यक अनुभव आणि प्रशिक्षण रणजी करंडकासारख्या अस्सल देशी स्पर्धेतूनच प्राप्त होऊ शकतो. यानिमित्ताने किमान तीन व्यक्तींनी वेगवेगळ्या व्यासपीठांवर कसोटी क्रिकेट आणि रणजी क्रिकेटचे महत्त्व अधोरेखित केले त्याची दखल घ्यावी लागेल. विद्यमान कसोटी कर्णधार रोहित शर्मा, महान माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी याबाबत महत्त्वाची वक्तव्ये केली. तिन्हींचा मथितार्थ इतकाच, की जिंकण्याची भूक असलेल्यांनाच कसोटी संघात प्रवेश मिळेल. तसेच स्थानिक क्रिकेट खेळण्याचे टाळून आयपीएलला प्राधान्य देणाऱ्या क्रिकेटपटूंची यापुढे खैर नाही! या खरमरीत भूमिकेचे प्रतिबिंब बुधवारी जाहीर झालेल्या बीसीसीआयच्या वार्षिक केंद्रीय कंत्राटनाम्यात उमटले. स्थानिक क्रिकेट खेळणे टाळणारे श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना करारनाम्यातून वगळण्यात आले. या भूमिकेचे आणि कृतीचे स्वागत, परंतु रोहित-गावस्कर किंवा शहा यांच्या या भूमिकेत सातत्य मात्र दिसत नाही, त्याचे काय? रोहितची आयपीएल कारकीर्द उतरणीकडे लागली आहे. गावस्कर आयपीएलमध्ये समालोचन करतातच आणि जय शहा तर आयपीएलचे विंगेतले सूत्रधार आहेत. आयपीएलला प्राधान्य देणाऱ्यांची कानपिळी यांतील रोहित आणि शहा यांच्याकडून याआधी झालेली दिसली नाही. आता कसोटी सामन्यांचे मानधन वाढवण्याचा विचार सुरू झाला आहे. हीदेखील पश्चातबुद्धीच ठरते.