‘चषकातील वादळ!’ (लोकसत्ता- ३० सप्टेंबर) हे वार्तांकन वाचले. ‘टी-ट्वेंटी एशिया कप’मध्ये खिलाडू वृत्तीऐवजी जे द्वेषाचे वातावरण निर्माण झाले ते खेळाला हानीकारक आहे. खरे तर पाकिस्तानशी हे सामने खेळायलाच नको होते, पण पैशासाठी खेळ खेळला गेला. मग आता हस्तांदोलन न करणे, एकमेकांविरुद्ध आक्षेपार्ह हावभाव करणे, पाकिस्तानच्या पदाधिकाऱ्यांनी करंडकच घेऊन पळणे, पदके न देणे इत्यादींनी क्रिकेट व एकंदर खेळाचीच शोभा घालवली. त्यामुळे खेळापेक्षा देश मोठा असेल तर पाकिस्तानशी कोणतेही सामने यापुढे खेळू नयेत. जे झाले ते तर ‘खेळ कमी व नौटंकी जास्त’ असे झाले.
● डॉ. विजय आठल्ये. मुलुंड पूर्व (मुंबई )
अपमान खास! करंडकाचे काय?
पहलगाममध्ये पर्यटकांची अमानुष हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांची पाठराखण करणाऱ्या आणि रक्तरंजित इतिहास असलेल्या पाकिस्तानचे एक मंत्री मोहसीन नक्वी यांच्या हस्ते आशियाई करंडक विजेत्या भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघाने पुरस्कार स्वीकारण्यास नकार दिला. वैयक्तिक बक्षिसे स्वीकारली, पण त्या वेळीसुद्धा त्यांच्याकडे ढुंकूनही बघितले नाही की त्यांच्याशी हस्तांदोलन केले नाही. यापेक्षा नक्वींचा अजून काय अपमान होऊ शकतो? पाकिस्तानला एकदा नव्हे, दोनदा नव्हे, सातत्याने तीन वेळा हरवून चारी मुंड्या चीत केल्याबद्दल भारतीय संघाचे कौतुक आणि अभिनंदन, करंडक स्वीकारण्यापेक्षा नक्वींचा अपमान देशासाठी खास होता.
● अजित शेट्ये, डोंबिवली पूर्व
यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा?
‘‘गर्दी’गुंड!’ हा अग्रलेख (३० सप्टेंबर) वाचून एकच प्रतिक्रिया येते की राजकारणातील व्यक्तिपूजेच्या अतिरेकामुळे इथे ‘मरण स्वस्त होत आहे’! तमिळनाडूतील करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीत ४० हून अधिकांचा मृत्यू, ही घटना काही अपवादात्मक नाही. अशा दुर्घटनांचा रक्तरंजित इतिहास अग्रलेखातही नमूद आहे. प्रत्येक वेळी मृतांचा आकडा वाढतो; पण जबाबदारांना जाब विचारला जात नाही. शासन, आयोजक आणि समाज- तिघांच्याही उदासीनतेने या शोकांतिका पुन्हा घडतात. मुख्य प्रश्न आयोजकांच्या बेपर्वाईचा आहे. लाखो मानधन घेणारे, सुरक्षारक्षकांच्या गराड्यात जगणारे अभिनेते-राजकारणी साध्या गर्दीचे नियमन करू शकत नाहीत, हेच सर्वात धक्कादायक आहे. अशांना जनतेचे भवितव्य सांभाळण्याची पात्रता आहे का? आपला वेळ, श्रम आणि अखेरीस जीव देणाऱ्या लोकांच्या सहनशीलतेवर ते राजकारण करतात. हे अपघात नाहीत, तर निष्काळजीपणाने घडवून आणलेल्या सामूहिक हत्या आहेत. दुर्घटनेनंतरच्या ‘विरोधकांचा कट’ या नाट्यमय आरोपांमागे खरी जबाबदारी दडपली जाते. खरा प्रश्न इतका साधा आहे – जीव वाचवण्याइतके सक्षम व्यवस्थापनही जे करू शकत नाहीत, त्यांच्यावर लोकांनी विश्वास कसा ठेवायचा? सरकारने आता ठोस पावले उचलली पाहिजेत. जोपर्यंत समाज अशा ढोंगी नायकांच्या मागे आंधळेपणाने धावत राहील, तोपर्यंत प्रत्येक मेळावा संभाव्य स्मशान ठरतच राहील.
● डॉ. राजेंद्र तांबिले, सातारा
दक्षिण/ उत्तर (अभि)नेत्यांमधला फरक
‘‘गर्दी’गुंड!’ या संपादकीयातील, ज्यांनी जमवलेल्या गर्दीत काही दुर्घटना घडेल त्यांना त्यापुढे मेळावे, सभा, मिरवणुका घ्यायला बंदी घालण्याची सूचना ‘रोगापेक्षा औषध भयंकर’ अशी आहे. ती माकडाच्या हाती कोलीत देऊन जाईल. महात्मा गांधींची हत्या करायला सुंता करून जाणाऱ्या कुटिल विचारसरणीच्या समर्थकांहाती हे हत्यार गेले तर काय?
त्याचबरोबर ‘कोणीएक विजय’ असे म्हणण्याइतका विजय हा छोटा अभिनेता नाही, रजनीकांतचा उत्तराधिकारी म्हणावा इतकी त्याची अफाट लोकप्रियता आहे. तो राजकीयदृष्ट्या किती दखलपात्र आहे, हे त्याच्या सभांना होणाऱ्या गर्दीतूनही दिसून येते. शिवाय, दक्षिणेतील व्यक्तिस्तोमाला नाके मुरडण्याचा अधिकार आता मोदीयुगात आणि मोदीभक्तांच्या मांदियाळीत उर्वरित भारताला राहिलेला आहे का? ‘दक्षिणेत सुपरस्टार नायक-नायिका निव्वळ पडद्यावरच्या लोकप्रियतेच्या बळावर राजकारणात येतात,’ हे सोपे आकलन झाले. वास्तविक ते खूळही उत्तरेतले. निव्वळ प्रतिमेच्या बळावर अमिताभ बच्चनपासून विनोद खन्ना, धर्मेंद्र, हेमा मालिनी, जयाप्रदा आणि अगदी अलीकडच्या कंगना राणावतपर्यंत अनेक फिल्मस्टार राजकारणात आले. दक्षिणेत तसे नाही. पेरियार यांच्या प्रखर द्रविड चळवळीतून करुणानिधी (हे पटकथा संवादलेखक होते) आणि सुपरस्टार एमजी रामचंद्रन यांच्यासारखे कलावंत घडले आणि त्यांचे सिनेमेही घडले. सिनेमा आणि राजकारण हे तिथे तेव्हापासून हातात हात घालूनच चालत आलेले आहेत. त्याला निखळ व्यक्तिस्तोम म्हणता येत नाही.
● विवेक शानभाग, भाईंदर
षड्यंत्र, परकीय हात हे शब्द कशासाठी?
‘चर्चेसाठी वांगचुक यांच्या सुटकेची अट’ ( लोकसत्ता – ३० सप्टेंबर) ही बातमी वाचली. लडाखचा राजकीय दर्जा, पर्यावरण बदल अशा मागण्यांसाठी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सोनम वांगचुक यांना तातडीने अटक केली गेली हेच मुळात निंदनीय. सत्याग्रही जनआंदोलकांना तातडीने कोठडीत डांबायचे, त्याविषयी कोणतेही स्पष्टीकरण देण्यास नकार द्यायचा आणि दुसरीकडे मसाजोगचे लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरपंच संतोष देशमुख यांच्या खंडणीविरोधी धोरणामुळे झालेल्या निर्घृण हत्येचे मुख्य आरोपी असलेल्या वाल्मीक कराड यांच्याविषयी ‘संयमी भूमिका’ घ्यायची. अशा गंभीर गुन्ह्यांतील आरोपी राजकीयदृष्ट्या जवळचे असतील तर संयमी भूमिका घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांना सोनम वांगचुक हे मात्र देशद्रोही षड्यंत्र रचत असल्याचा साक्षात्कार होतो हे विशेष! लडाखमधील सरकारी कारवाईत चार बळी गेले, त्यातील एक कारगिल युद्धात शौर्य गाजवणारे जवान सेवांग थारचीन आहेत. या योगदानाचे भान राखून तरी, सरकारने आपल्या लडाखमधील कारवाईचे स्पष्टीकरण देताना षड्यंत्र, परकीय हात आदी शब्द वापरू नयेत. संवेदनशीलता बाळगणे शक्य नसेल तर किमान जबाबदारीने भाष्य करावे.
● भूषण सरमळकर, दहिसर (मुंबई)
‘केवायसी’ची मागणी दिरंगाईसाठीच?
‘पुरानंतर पुराव्याचे संकट?’ हे वृत्त (लोकसत्ता- ३० सप्टेंबर) वाचले. पूरग्रस्त शेतकऱ्यांना मंजूर झालेला निधी बँकेतून मिळवण्यासाठी ओळख पटवून देणे (केवायसी) अनिवार्य करण्याची प्रशासकीय शिस्त ठीक; पण अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या महापुरात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांतील शेतकरी आणि सामान्य लोकांच्या सामानसुमानासह कागदपत्रे, बँक पासबुक, मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, पॅन कार्ड आदी पुराव्यांची कागदपत्रेही वाहून गेली आहेत किंवा भिजून खराब झालेली आहेत. अशा संकटसमयी त्यांच्याकडे मदतनिधी देण्यासाठी केवायसीची मागणी करणे म्हणजे जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. बँकांकडे त्यांच्या अधिकृत ग्राहकांच्या केवायसीची कागदपत्रे संगणकीय प्रणालीमध्ये नोंदणीकृत असतात. विद्याुत पुरवठा कंपन्या, निवडणूक विभाग, स्थानिक स्वराज्य संस्था, आयकर विभाग, शिधावाटप कार्यालय, आदी आस्थापनांकडे स्थानिक लोक आणि शेतकऱ्यांची नोंदणी झालेली असते. या उपलब्ध विदेचा उपयोग पूरग्रस्तांना मदतनिधी देण्यासाठी बँकांना पुरावा म्हणून वापरता येऊ नये?
‘लाडक्या बहिणीं’साठी २०२४/२५ या वर्षात महिन्याला अंदाजे २७०० ते २८०० कोटी रुपये (केवायसीच्या अटींविना) वाटणाऱ्या सरकारने दुर्दैवी पूरग्रस्त शेतकरी आणि इतर लोकांसाठी केवळ १५०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे, यामुळे महायुतीचे सरकार शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे यावर विश्वास बसत नाही. पूरग्रस्तांना केवायसीचे अडथळे उभे करून मदत देण्यासाठी दिरंगाई केली जात आहे, हे अन्यायकारक आहे.
● प्रशांत कुळकर्णी, कांदिवली (मुंबई)