‘अमंगलाचे मंगलसूत्र’ हा अग्रलेख (१ मे) वाचला. २०१२ सालातील ‘निर्भया’वरील निर्घृण लैंगिक अत्याचारांच्या विरोधात जात-धर्म-राजकीय बांधिलकी बाजूला ठेवून एकजुटीने रस्त्यावर उतरणाऱ्या समाजाचे गेल्या दशकात, अत्याचार करणाऱ्या नराधमाची तसेच पीडित महिलेची जात-धर्म-राजकीय बांधिलकी बघूनच निषेध करण्यापर्यंत, झालेले अध:पतन झाले अस्वस्थ करणारे आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बलात्कारी नराधमांचा सत्कार करणे, ‘वजनदार’ व्यक्तींनी केलेल्या अत्याचारांकडे दुर्लक्ष करणे किंवा त्यांच्यावरील गुन्हा सौम्य करून त्यांची अटक टाळणे, त्यांना आपल्यात सामील करून पवित्र करून घेणे, मणिपूरसारख्या घटनांवर मौन बाळगणे, अशी कृत्ये करून गुन्हेगारांना पक्षाश्रयामार्गे राजाश्रय देण्याचा आणि अत्याचारांकडे जात-धर्म-राजकीय बांधिलकीसापेक्ष नजरेने पाहण्याचा पाया भाजपने घालणे हे त्यांच्या संस्कृतीनुसार आणि त्यांच्या राजकीय नैतिकतेनुसार त्यांना योग्य वाटत असावे असे दिसते. परंतु, मणिशंकर अय्यर यांच्या मोदींविरोधातील कथित अनुदार वक्तव्यावर तत्काळ कारवाई करणारा काँग्रेस पक्षदेखील महिलांवरील अत्याचारांचा निषेध करताना आजकाल जात-धर्म-राजकीय बांधिलकी पाहून भाजपचीच री ओढत आहे. थोडयाफार फरकाने हे सर्वच राजकीय पक्षांना लागू होत आहे. 

महिलांवरील अत्याचार हा मानवतेविरुद्धचा घृणास्पद अपराध आहे. अशा अपराधांविरोधात खरे तर पुरुषांबरोबरच समस्त महिलांनीदेखील एकजूट होऊन, चवताळून उठून, आपल्यातील दुर्गा-काली जागृत करून आपला रुद्रावतार दाखवून दिला पाहिजे. परंतु, महिला नेत्यासुद्धा असा निषेध पीडितेची किंवा गुन्हेगाराची जात-धर्म-राजकीय निष्ठा पाहून करत आहेत हे अग्रलेखातून दिसून येते. हे अत्यंत यातनादायी आहे. याबाबतीत महिलाच जर स्वत:वरील अन्याय-अत्याचाराबाबत अशा दुभंगलेल्या असतील तर त्यांना समता आणि न्यायासाठी अजून काही शतके तरी वाट पाहावी लागेल असे दिसते.

उत्तम जोगदंड, कल्याण</strong>

हेही वाचा >>> लोकमानस: छडा लावू शकत नाहीत की इच्छित नाहीत?

कशाचा बागुलबुवा दाखवतील कोण जाणे

‘अमंगलाचे मंगलसूत्र’ हा अग्रलेख वाचला. गेल्या दोन दिवसांत पंतप्रधान मोदींच्या राज्यात भरउन्हात सहा सभा पार पडल्या. प्रत्येक सभेत मोदींनी काँग्रेसच्या एक्स रे नीतीची गोष्ट सांगितली. काँग्रेस सत्तेवर आल्यास प्रत्येकाच्या संपत्तीची तपासणी होऊन तुम्ही भविष्यासाठी ठेवलेल्या मिळकतीची देखील वाटणी होईल आणि ही संपत्ती ज्यांना जास्त मुले आहेत त्यांना, म्हणजेच मुस्लिमांना, वाटण्यात येईल अशी भीती दाखवली गेली. विशेषत: महिलांचे मंगळसूत्रदेखील हिरावून घेतले जाईल असे मोदींनी प्रत्येक सभेत सांगितले. याचा अर्थ जर काँग्रेस सरकार आले तर अनाचारच वाढत जाऊन ‘मोगलाई’ येईल असे मोदींना वाटते काय?

पश्चिम बंगालमधील संदेशाखाली येथील अत्याचारांबाबत भाजपचे नेते प्रचार सभांमध्ये सांगत आहेत परंतु कर्नाटकातील त्यांच्या मित्र पक्षातील प्रज्वल रेवण्णांच्या भानगडी, फोटो, व्हिडीओ मात्र मोदी आणि भाजपच्या नेत्यांना दिसत नाहीत. प्रज्वल देशाबाहेर पळून गेल्यानंतर भाजपला आणि देशाला समजले ही गोष्ट देशाच्या ‘आयबी’चे अपयश नाही का? उत्तरप्रदेशातील उन्नावमधील महिलांवरील अत्याचार मोदींना दिसत नाही? खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर झालेल्या महिला खेळाडूंच्या लैंगिक अत्याचारांचे आरोप नजरेआड करून त्यांना पुन्हा खासदारकीचे तिकीट देण्याच्या तयारीत भाजप आहे?

भाजपने असे आरोप असणाऱ्यांना स्वत:कडील वॉशिंग मशीनमध्ये स्वच्छ धुवून काढले आहे का? पंतप्रधान पदावरील व्यक्तीने राज्यातील विरोधी गटातील मान्यवर नेत्याला ‘भटकती आत्मा’ म्हटले आहे. हे भीतीचे नाही, तर कशाचे लक्षण? विरोधक वेताळ बनून भाजपच्या खांद्यावर बसले तर नाहीत ना? एकंदरीत उरलेल्या निवडणूक प्रचारात भाजपकडून आणि पंतप्रधान मोदींकडून कोणती भीती, कोणता बागुलबुवा दाखवला जाईल, सांगता येत नाही.

शुभदा गोवर्धन, ठाणे

राजकीय चष्म्यामुळे योग्य-अयोग्य कळेनासे

प्रज्वल रेवण्णा प्रकरणात भाजपकडून अप्रक्षरीत्या डावे- उजवे होताना आणि त्यामुळे संबंधितांची पाठराखण होताना दिसते. यामुळे भाजपचे ‘पार्टी विथ अ डिफरन्स’ हे बिरुद गळून पडले आहे. आज भाजपत ४० टक्के नगरसेवक, आमदार, खासदार अन्य पक्षांतून आयात केलेले आणि एका रात्रीत पावन करून घेतलेले आहेत. त्यामुळे त्यांचा भ्रष्टाचार व अपप्रवृत्तींना अभय मिळत आहे ही बाब गंभीर आणि धोकादायक आहे. प्रत्येक गोष्टीकडे राजकीय चष्म्यातून पाहण्याची सवय लागली की चांगले-वाईट, नैतिक-अनैतिक, खरे-खोटे, योग्य-अयोग्य यांच्या सीमारेषा गळून पडतात आणि प्रज्वल रेवण्णासारख्या दुराचारी व्यक्तींना संरक्षण मिळते. त्यामुळे भाजपने सदाचार, उच्च विचार, नैतिकता, देशभक्ती, संस्कृती यांचा टेंभा मिरविणे सोडून द्यावे.

डॉ. वि. हे. इनामदार, पुणे

खरी परीक्षा उत्तर भारतात

‘महाराष्ट्र, बिहारवर भाजपची मदार’ ही बातमी (लोकसत्ता- १ मे) वाचली. राजकारणाबद्दल फारसे ज्ञान नाही व कुठलेही भाकीत करता येणे शक्य नाही, असे असूनही यातील तर्क पटत नाही. सत्तेवर असलेल्या पक्षाचे प्राथमिक उद्दिष्ट- असलेली सत्ता कायम राखणे हेच असू शकते. स्वबळावर कमीत कमी २७२ जागा मिळवणे हेच भाजपचे प्रथम उद्दिष्ट असेल. भाजपला २०१९ मध्ये महाराष्ट्रात २३ व बिहार मध्ये १७ जागा मिळाल्या होत्या. जवळपास तेवढया जागा कायम राखणे त्यांना आवश्यक आहे. यात पाच-दहा जागा कमी झाल्या तर एकूण जागा ३०३ वरून २९३ होतील इतकेच. भाजपची खरी परीक्षा उत्तर भारतात आहे. तेथे अनेक ठिकाणी त्यांनी पैकीच्या पैकी जागा जिंकल्या होत्या. २०२४ मध्ये हा चमत्कार पुन्हा होईल का हे माहीत नाही; पण तो झाला तर भाजपच्या कमीत कमी २७२ जागा व केंद्रातील सत्ता निश्चित आहे. तसे झाले तर एनडीएतील व इतर पक्षही त्यांना पाठिंबा देतील. कारण जगाचा नियम जे जिंकतात ते पांडव व जे हरतात ते कौरव हाच आहे.

प्रमोद पाटील, नाशिक

लवासातील शेतकऱ्यांसाठीही अस्वस्थ?

‘माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ -शरद पवार’ ही बातमी (लोकसत्ता- १ एप्रिल) वाचली. शरद पवार म्हणतात ते खरे आहे. पण लवासामधील शेतकऱ्यांवर वरवंटा फिरवला त्यांच्यासाठी पवार यांचा आत्मा अस्वस्थ आहे? गोवारी समाजाच्या मोर्चावर केलेल्या गोळीबाराबद्दल पवार साहेबांचा आत्मा अस्वस्थ आहे? आपण कृषिमंत्री असतानासुद्धा हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्यासाठी पवार यांचा आत्मा अस्वस्थ आहे? अगदी अलीकडील मावळमधील शेतकऱ्यांवरील गोळीबारप्रकरणीही त्यांचा आत्मा अस्वस्थ आहे? नरेंद्र मोदी कितीही काहीही म्हणू देत, पण पवार साहेबांचा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ आहे हे मात्र शंभर टक्के खरे.

डॉ. संजय पालीमकर, दहिसर (मुंबई)

गेलेले जीव थोडेच परत येणार?

भांडुपमध्ये महापालिकेच्या ‘सुषमा स्वराज प्रसूतिगृहा’त टॉर्चच्या उजेडात करण्यात आलेल्या प्रसूतीची बातमी वाचली. महापालिकेच्या आरोग्य विभागाचा सावळा गोंधळ यामुळे चव्हाटयावर आला. मुंबईच्या कित्येक भागांत वीजपुरवठा अनियमित असतो. हे ‘विकासा’चे लक्षण आहे का? परंतु कोणत्याही रुग्णालयात, प्रसूतिगृहात जनरेटरची पर्यायी व्यवस्था असणे अत्यावश्यक आहे. घटनेची चौकशी करण्यात येईल, त्यासाठी समिती वगैरे स्थापन केली जाईल, पण त्यामुळे गेलेले जीव थोडेच परत येणार आहेत?

नीता शेरे, दहिसर (मुंबई)

सुरक्षितता ही प्रवाशांचीही जबाबदारी

‘लोकलमधून पडून तीन महिन्यांत १३९ बळी’ ही बातमी गंभीर आहे. लोकलच्या फेऱ्या वाढवा असे म्हणणे सोपे असले तरी ते शक्य आहे का याचाही विचार व्हायला हवा. त्यामुळेच गच्च भरलेल्या डब्यात चढायचे की नाही याचा विचार प्रवाशांनी ही करायला हवा. एखादी लोकल सोडता येईल एवढा वेळ हाताशी ठेवण्याची सवय करायला हवी. मुंबईतील वाढती लोकसंख्या बघता लोकलची गर्दी कमी होईल अशी आशा नाही त्यामुळे प्रवाशांनी स्वत:चा जीव धोक्यात न घालता प्रवास करणे महत्त्वाचे आहे. दारात लटकणे असो वा रूळ ओलांडणे टाळणे आपल्याच हाती आहे. माया हेमंत भाटकर, चारकोप (मुंबई)

मराठीतील सर्व स्तंभ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Readers comments on loksatta editorial readers reaction on loksatta articles zws 70