… या महिला क्रिकेटपटू देशात महिला सबलीकरणाचे केवळ एक दालन ठरतात. इतर अनेक दालने बंदच आहेत…
‘इट्स जस्ट अ गेम… ’ या चार इंग्रजी शब्दांनी रविवारी नवी मुंबईत झालेल्या महिला विश्वचषक अंतिम सामन्याचे वर्णन करणे हे भारतीय क्रिकेटपटूंप्रति विलक्षण अन्याय्य आणि कदाचित क्रूरही ठरेल. अश्रू, घाम सांडून नि हाडे, स्नायूंवर अनन्वित ताण देऊन; काही सामन्यांमध्ये पराभव पचवून; खराब कामगिरी वा दुखापतीमुळे विस्कटलेली संघाची घडी पुन:पुन्हा बसवून; प्रत्येकीने वैयक्तिक सुखदु:ख आणि यशापयश पचवून अंतिमत: संघासाठी आणि देशासाठी विजयी उद्दिष्ट ठेवून भारतासाठी पहिलेवहिले महिला जगज्जेतेपद खेचून आणले.
नैराश्याचे क्षण अनेकींच्या पदरी आले. पण ते नैराश्य जोजवत या बसल्या नाहीत. उपान्त्य सामन्याची मानकरी ठरलेल्या जेमिमा रॉड्रिग्जला या स्पर्धेतील काही सामन्यांतून वगळण्यात आले होते. त्यातून तिचा निर्धार पक्का होत गेला. अंतिम सामन्याची मानकरी ठरलेल्या शफाली वर्माचा मूळ संघातच समावेश नव्हता. सलामीवीर प्रतीका रावळला दुखापत झाल्याने स्पर्धेतून माघार घ्यावी लागली, त्यामुळे देशात कुठेतरी स्थानिक क्रिकेट खेळत असलेल्या शफालीला ऐनवेळी पाचारण करण्यात आले. तिने जराही विचलित न होता अंतिम सामन्यात नि विश्वविजेतेपदात निर्णायक भूमिका बजावली. या स्पर्धेत भारतीय संघाला मधल्या टप्प्यात सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला, तेही प्रत्येक सामन्यात सुस्थितीत असताना. त्यातून आत्मविश्वासाला धक्का न लावता सखोल आत्मपरीक्षण झाले. त्याचे श्रेय कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि प्रशिक्षक अमोल मुझुमदार यांना. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मनधाना या संघातील दोन प्रमुख खेळाडू. उपान्त्य आणि अंतिम सामन्यात त्या भारतीय डावात शेवटपर्यंत न टिकताही समाधानकारक धावसंख्या उभारणीत खंड पडला नाही. कारण या दोघांपलीकडे गुणवत्ता आणि मानसिकता शाबूत ठेवण्याचे प्रयत्न महिला क्रिकेटमध्ये आवर्जून झाले, त्याचीच ही पावती. तीन-तीन पराभव पाहावे लागूनही हार न मानता मोक्याच्या सामन्यांमध्ये उभ्या राहिलेल्या या चमूच्या कणखर मानसिकतेचे विश्लेषण व्यवस्थापनशास्त्राच्या अभ्यासक्रमांमध्ये आवर्जून समाविष्ट करावे अशा तोडीचे. पाश्चिमात्य विद्यापीठांमध्ये अशा प्रकारचे अभ्यास होत राहतात, आपण अद्याप त्या दिशेने सरकलेलो नाही. महिला क्रिकेटने आजवर केवळ गौरबहुल विश्वविजेतेच पाहिले होते. प्रथम इंग्लंड, बहुतेकदा ऑस्ट्रेलिया नि एकदा न्यूझीलंड. भारत हा रूढार्थाने पहिला गौरेतर विश्वविजेता. भारतीय महिला अंतिम टप्प्यावर यापूर्वी दोन वेळा पोहोचल्या, पण विश्वविजेतेपदाने हुलकावणी दिली. यावेळी तसे झाले नाही. तसे होणार नव्हते.
याचे कारण प्रत्येक सामन्यात आधीच्या सामन्यातील त्रुटींमधून हा संघ शिकत गेला. सुरुवातीस श्रीलंका, पाकिस्तानविरुद्धचे सामने जिंकले, त्यात सफाई नव्हती. मग सुरू झाली तीन पराभवांची कष्टप्रद मालिका. प्रथम दक्षिण आफ्रिका, मग ऑस्ट्रेलिया आणि अखेरीस इंग्लंड. याचा अर्थ सुरुवातीच्या पाच सामन्यांमध्ये कामगिरी अपेक्षित नव्हती. तरीदेखील सहाव्या सामन्यात विजय मिळवून हा संघ उपान्त्य फेरीत पोहोचला. तेथे पुन्हा तोच ऑस्ट्रेलियाचा संघ नि अंतिम फेरीत तोच दक्षिण आफ्रिकेचा संघ. यावेळी मात्र आधीच्या सामन्यांतील चुकांची पुनरावृत्ती घडली नाही. याचे कारण शारीरिक कौशल्यापेक्षाही मानसिक लढाई या मुलींनी, महिलांनी जिंकलेली होती. विश्वचषकासारख्या प्रदीर्घ स्पर्धेत प्रत्येक सामन्याचे प्रत्येक दिवशी वेगवेगळे गणित असते. प्रत्येक दिवशी नवी ऊर्जा, नवे डावपेच वापरताना, आधीच्या दिवसांची रडगाणी उगाळायची नसतात. त्यातही उल्लेखनीय ठरला भारताचा उपान्त्य फेरीतील ऑस्ट्रेलियाविरुद्धचा विजय. ऑस्ट्रेलियाने महिला क्रिकेटमध्ये जो दबदबा निर्माण केला, त्यास अखिल क्रीडाविश्वात तोड नाही. या संघाच्या नावावर जितकी विश्वविजेतेपदे आहेत, तितकी म्हणजे सात इतर तीन विश्वविजेत्यांची (इंग्लंड, न्यूझीलंड आणि आता भारत) एकत्रित करूनही भरत नाहीत. विशेष म्हणजे २०१७नंतर हा संघ पहिल्यांदाच पराभूत झाला. त्याही वेळी त्यांना हरवताना समोर भारतीय संघ होता, नि याही वेळी. पण तो भारतीय संघ आणि हा भारतीय संघ यांत फरक होता. उलट परवा नवी मुंबईत झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा संघ मात्र ओळखू येत नव्हता. अनेक क्षुल्लक चुका, मोक्याच्या वेळी गळपटणे असे एरवी खास भारतीय म्हणून हिणवले गेलेले ‘गुण’ त्या संघात दिसत होते. यात प्रतिस्पर्धी संघाचा म्हणजे भारताचा वाटा होताच. दडपणाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ आला होता नि त्यांस चुका करणे भाग पाडले जात होते. भारतीय संघाचा खेळ निर्दोष नव्हता, पण निर्णायक क्षणी तो उंचावेल किंवा किमान घसरणार नाही याचे भान आपल्या संघाने राखले. अंतिम सामन्यावर मुंबई, महाराष्ट्रावर आसूड ओढणाऱ्या अवकाळी पावसाचे सावट होते. तरीदेखील भारतीय संघाची लय आणि एकाग्रता भंगली नाही. त्या निकषावर दक्षिण आफ्रिकेचा संघ कमी पडला.
हरमनप्रीतच्या २०२५मधील या संघाची तुलना कपिलदेव यांच्या १९८३मधील संघाशी होणे स्वाभाविक. त्या अजिंक्यपदाने भारतीय आणि जागतिक क्रिकेटचा पोत बदलला. वेस्ट इंडिजसारख्या एके काळच्या मातबर संघाची सद्दी कायमची सरली. पण ही तुलना टाळणेच हितकारक. दोन्ही विजयांचे परिप्रेक्ष्य वेगळे नि खुमारी निराळी. १९८३मधील त्या विजयाने भारतात क्रिकेट ‘बदलले’. पण ते खरेच ‘सुधारले’ का, आणि ‘सुधारणा’ म्हणजे नक्की काय अपेक्षित याचाही विचार व्हावा. सर्वसामान्य क्रिकेटप्रेमी या खेळाकडे अधिक संख्येने वळले, तसेच राजकारणीही वळले नि कॉर्पोरेट विश्वही. यातून खेळाची नि खेळाडूंची श्रीमंती वाढली, पण भारताचे प्रगतीपुस्तक दीप्तिमान झाले असे छातीठोकपणे सांगता येत नाही. उलट इतर क्रीडाप्रकारांकडे यातून दुर्लक्ष होत गेले. ऑलिम्पिकमध्ये भारतीय तारे थोडेफार लुकलुकू लागले, त्यावेळी भारतीय क्रिकेटचे नैराश्यपर्व सुरू होते हा योगायोग नाही. आज पुरुषांच्या क्रिकेटमध्ये ऐश्वर्य आहे, तशाच अपप्रवृत्तीही आहेत. त्याचे अपश्रेयही १९८३मधील विजयास द्यावे काय? भारतीय महिलांच्या यशाकडे त्यामुळेच स्वतंत्र आणि वेगळ्या नजरेतून पाहावे लागेल. मोगा, रोहतक, बोकाखात (आसाम), घुवारा (उत्तर प्रदेश), इरामल्ले (आंध्र प्रदेश), रोहरू (हिमाचल प्रदेश) ही यांतील काहींची जन्मगावे, जी नावेही कुणी ऐकलेली नसतील. आग्रा, सांगली, देहराडून या शहरांना किमान इतिहास तरी आहे. ही गावे/शहरे वगळता विद्यामान संघातील फारच थोड्या मुंबईकर, दिल्लीकर आहेत. महिलांचे क्रिकेट देशभर कसे झिरपले आहे, हे दर्शवणारे हे वास्तव. यांतील अनेकींची स्वतंत्र यशोगाथा आहे, पण त्यामागे त्यांची व त्यांच्या पालकांची कष्टगाथाही असेल. या महिला क्रिकेटपटू देशात महिला सबलीकरणाचे केवळ एक दालन ठरतात. इतर अनेक दालने बंदच आहेत. ज्या दिवशी देशभर महिलांच्या पहिल्यावहिल्या विश्वविजेतेपदाचा जल्लोष सुरू झाला, तेथे महाराष्ट्रासारख्या राज्यात डॉक्टर संपावर गेले, कारण त्यांच्यातील एका डॉक्टर भगिनीस पुरुषी अन्याय आणि अत्याचारांना कंटाळून आत्महत्या करावी लागली! डॉक्टर असो वा आणखी कुणी, स्वत:ची ओळख, स्वत:चा रोजगार, स्वत:ची प्रतिष्ठा मिळवण्यासाठी, राखण्यासाठी, संवर्धित करण्यासाठी महिलांना या देशात आजही संघर्ष करावा लागतो. एके काळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला (आयसीसी), भारतीय क्रिकेट मंडळास (बीसीसीआय) महिला क्रिकेटचे पालकत्व स्वीकारण्यास भाग पाडावे लागले. त्याच्या आधीची लढाई आलू बामजी, डायना एडल्जी, शुभांगी कुलकर्णी, शांता रंगस्वामी अशा सरस महिला क्रिकेटपटूंना स्वत: लढावी लागली होती. क्रिकेटमधील विश्वविजेतेपदाचे क्षण या संघर्षवाटेतले लखलखते दिवे ठरतात. म्हणून सुखावून जातात. पण त्यापलीकडच्या व्यापक, अप्रकाशित अंधाराचे वैश्विक भान विश्वविजेतेपदाच्या जल्लोषात हरपू नये ही आशा. ‘लोकसत्ता’ परिवारातर्फे भारतीय महिला संघाचे मन:पूर्वक अभिनंदन!
