‘ऑपरेशन ब्लू स्टार’ला ४० आणि मुंबईवरील ‘२६/११’च्या हल्ल्यास १७ वर्षे लोटल्यावर त्याविषयी बोलणाऱ्यांनी, त्या वेळी आपण काय केले हेही सांगावे…

अनुकूलता प्रत्येकासाठी आनंददायी असली तरी एखादी व्यक्ती प्रतिकूलतेचा सामना कशी करते त्यावरून तिचे चारित्र्य आणि चाल यांचे दर्शन घडते. हे सत्य लागू केल्यास माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांचे स्वभाव-वास्तव सध्या त्यांच्या विधानांतून समोर येते. त्यांनी अलीकडेच २६/११ चा दहशतवादी हल्ला, इंदिरा गांधी यांस ज्यामुळे प्राण गमवावे लागले ते ऑपरेशन ब्लू स्टार आदींबाबत काही भाष्य करून स्वपक्षाची कोंडी केली. काँग्रेस पक्षात जी काही अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्त्वे आहेत त्यात चिदम्बरम हे एक अव्वल. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर कालात काँग्रेस या एकमेव पक्षाने राजकीय पैस व्यापलेला होता. त्यामुळे विविध क्षेत्रांतील गुणवान साहजिकच त्या पक्षाकडे आकृष्ट झाले. नंतर प्रदीर्घ काळ सत्ता त्याच पक्षाहाती राहिल्याने हा गुणवंतांचा प्रवाह काँग्रेसकडे अव्याहत होता. एकाच वेळी जमीनदारी वृत्तीचे आणि त्याविरोधात भूमिका असणारे, भांडवलशाहीवादी आणि त्याच वेळी कामगार क्रांतीची भाषा करणारे, डावे आणि उजवे असे परस्परविरोधी घटक त्या पक्षात आनंदाने, सुखसमाधानाने वाढले. चिदम्बरम यातील पहिल्या गटातील. अत्यंत बुद्धिमान, यशस्वी आणि त्याच वेळी असे बुद्धिमान आणि यशस्वी नसलेल्यांविषयी घृणा असलेले. त्यांची स्वत:ची अशी एक बौद्धिक दहशत होती आणि त्या दहशतीचे ओझे अनेक सामान्य काँग्रेसजनांनी आयुष्यभर वाहिले. जोपर्यंत काँग्रेसची सद्दी होती तोपर्यंत चिदम्बरम यांच्यासारख्यांचे फावले. तथापि काँग्रेसच्याच गलबताचे शीड राजकीय वादळात पार फाटून गेल्यानंतर चिदम्बरम यांच्यासारख्यांचे कोडकौतुक करणार कोण? तसे ते होईनासे झाल्याने काँग्रेसमधील अनेक बुद्धिमान सध्या सैरभैर झालेले दिसतात. त्यातून निर्माण झालेल्या वावदूकतेवर त्यामुळे भाष्य आवश्यक ठरते.

ऑपरेशन ब्लू स्टार टाळता आले असते असे चिदम्बरम म्हणतात. ते खरे आहे. काळाच्या ओघात जे घडून गेले त्या इतिहासावर वर्तमानात भाष्य करताना बरेच काही करता आले असते असे म्हणण्याची सोय असते. हा विषय त्यातील. राजकीय सोयीसाठी बिगरराजकीय व्यक्तींस हाताशी धरले की काय होते याचे ऑपरेशन ब्लू स्टार हे उदाहरण. जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचा भस्मासुर राजकारणातून तयार झाला आणि अखेर तोच तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या डोक्यावर हात ठेवू लागल्यावर त्याचा नि:पात आवश्यक ठरला. जे झाले ते त्यावेळच्या राजकारणातून हे नि:संशय. पंजाबचे प्रतापसिंग केरॉ, झैलसिंग आदींच्या राजकारणाची परिणती या भिंद्रनवालेस खतपाणी घालण्यात झाली. त्यावर मार्क टली, सतीश जेकब यांच्यापासून अनेकांनी विस्ताराने लिहिलेले आहे. चिदम्बरम यांच्यासारख्या ग्रंथप्रेमीने ते साहित्य वाचलेलेच असणार. आज सहस्राचंद्रदर्शनी वयात असलेले चिदम्बरम पंजाब आणि शीख राजकारणातील हा दुर्दैवी कालखंड आकारास येत असताना ऐन चाळिशीत होते. या राजकारणातून १९८४ साली ३१ ऑक्टोबरला श्रीमती इंदिरा गांधी यांची हत्या झाली आणि सत्तासूत्रे राजीव गांधी यांच्या हाती आली. त्या वेळी चिदम्बरम यांनी प्रथम मंत्रीपद चाखले. राजीव गांधी यांनी त्यांना उपमंत्री केले. त्या वेळी कधी त्यांनी आपल्या पंतप्रधानांस ‘‘आपल्या मातोश्रींचे चुकले’’ असे सांगितल्याचा इतिहास नाही. त्यानंतर जवळपास प्रत्येक काँग्रेस सरकारात, तसेच १९९६ पासून ‘तमिळ मानिला काँग्रेस’मध्ये प्रवेश केल्याने देवेगौडा, गुजराल आदींच्याही सरकारांत चिदम्बरम मंत्री होत गेले आणि त्यांची राजकीय पदोन्नतीही होत गेली. त्या वेळी कधीही, अगदी पंतप्रधानपदी मनमोहन सिंग यांच्यासारखी शीख व्यक्ती असतानाही, चिदम्बरम यांनी या विषयावर अवाक्षर काढले नाही. तेव्हा आता असे अचानक काय घडले की त्यांना पश्चातबुद्धीने सुमारे चाळीस वर्षांपूर्वीच्या स्वपक्षीय प्रमादांचे स्मरण व्हावे?

त्यांना पश्चातबुद्धी झालेला दुसरा मुद्दा म्हणजे २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याबाबत. ज्या वेळी २६ नोव्हेंबर २००८ रोजी हा हल्ला झाला त्या वेळी देशाच्या गृहमंत्रीपदी पोशाखी शिवराज पाटील चाकूरकर हे होते. त्यांची कार्यशैली, गती आणि स्वमग्न वृत्ती लक्षात घेता हा कसोटीचा क्षण त्यांच्यासाठी फारच परीक्षा घेणारा ठरला असता. त्यात ते उत्तीर्ण/अनुत्तीर्ण होण्याआधीच पक्षाने त्यांच्याकडून गृहमंत्रीपद काढून घेतले आणि त्या पदी चिदम्बरम यांची वर्णी लागली. पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे ते सरकार सत्ताकेंद्री संघर्षाच्या वजनाने आधीच वाकलेले होते. त्या वेळी पंतप्रधानपद जरी सिंग यांच्या हाती होते तरी राजकीय सर्वाधिकार सोनिया गांधींकडे होते. त्यामुळे सिंग मंत्रिमंडळातील सोनिया निष्ठावान पंतप्रधानांपेक्षा सोनिया यांनाच अधिक मान देत. तत्कालीन अर्थमंत्री प्रणब मुखर्जी हे अशांतील एक. सिंग हे मुखर्जी यांना राजकारणात आणि अन्यत्रही कनिष्ठ. सिंग शासकीय सेवेत असताना त्यांच्या महत्त्वाच्या पदोन्नतीचा आदेश मुखर्जी यांच्या स्वाक्षरीने अमलात आला, हे वास्तव. त्यामुळे ‘आपण ज्यास नेमले त्याच्या हाताखाली काम करणे’ मुखर्जी यांस कायमच जड गेले. ते सिंग यांचा अप्रत्यक्षपणे अनादर करत. अशा काळात चिदम्बरम हे मंत्रिमंडळात होते. परंतु त्यांनी कधी याविषयी भाष्य केले वा मुखर्जी यांच्या कृतीबाबत नाराजी दाखवल्याची नोंद नाही. अशा वातावरणात २६/११ घडल्यानंतर पाकिस्तानला ‘चोख प्रत्युत्तर’ द्यायला हवे अशी भावना सरकारमध्ये प्रबळ असूनही तशी कृती सिंग सरकारकडून घडली नाही; हे सत्य. अशा चोख प्रत्युत्तरी कृतीच्या आड आंतरराष्ट्रीय दबाव नव्हता असे म्हणता येणार नाही. त्याआधीही राजीव गांधी पंतप्रधानपदी असताना अमेरिकेने भारत-पाकिस्तान तणाव कमी व्हावा यासाठी उभयतांवर दबाव आणला होता आणि पंतप्रधानपदी नरसिंह राव असतानाही अणुचाचण्या करण्यास अमेरिकेचा विरोध होता. हे असे होत असते. आताही भारत-पाकिस्तान युद्ध आपल्या दबावामुळे कसे थांबले याची दर्पोक्ती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प नित्यनेमाने करतच आहेत. त्यांच्या विधानात तथ्य किती हे फक्त ते आणि आपले सर्वोच्च सत्ताधीशच सांगू शकतील. परंतु हे सत्य काही कालानंतर अमेरिकेतून उघड होईलच होईल. कारण सरकारी कागदपत्रे ‘खुली’ करण्याची तेथील परंपरा. त्यानुसार मुंबईवरील हल्ल्यानंतर अमेरिकेने भारत/ पाकिस्तानविषयी घेतलेल्या भूमिकेवरही प्रकाश पडेल.

असे असताना चिदम्बरम यांनी त्यावर आता भाष्य करून काय मिळवले, हा प्रश्न. बरे, पाकिस्तानवरील प्रत्युत्तरी हल्ला सोनिया गांधी यांनी रोखला असे त्यांस सुचवावयाचे असेल तर त्यांनी ते तरी प्रामाणिकपणे बोलण्याची हिंमत दाखवावी. तेही नाही. खरे तर त्याही वेळी चिदम्बरम सरकारात होते आणि शिवराज पाटील यांस पायउतार व्हावे लागल्याने गृहमंत्रीपदही त्यांच्याकडे होते. त्या काळात त्यांनी कधी पाकिस्तानला धडा शिकवण्याची भाषा केली होती काय? तशी ती केल्याचा जाहीर दाखला तरी नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकांत वा पंतप्रधान मनमोहन सिंग यांस पत्र लिहून त्यांना ती करण्याची सोय त्या वेळीही होती. त्या वेळी आपण ही भूमिका का घेतली नाही, घेतली असल्यास कोणासमोर घेतली, त्याच्या काही लेखी नोंदी आहेत किंवा काय इत्यादींबाबतही चिदम्बरम यांनी काही भाष्य केल्यास जनतेचे प्रबोधन होईल आणि माजी गृहमंत्र्याच्या हेतूंमागील प्रामाणिकपणाबाबतही कोणी शंका घेणार नाही. तसे न करता एका घटनेस चार दशके आणि दुसरीस १७ वर्षे उलटल्यानंतर त्याविषयी भाष्य करण्यात कोणते शहाणपण आणि कोणते शौर्य? पदांवर असताना त्या पदांचे सर्व भलेबुरे लाभ ओरपायचे आणि नव्याने काही मिळण्याची शक्यता नाही हे दिसल्यावर भूतकालातील भुते जोजवत चिरचिर करायची हेच यातून दिसते. बुद्धिमान चिदम्बरम यांस हे शोभणारे नाही.