सदोदित तयार असलेली राजकीय यंत्रणा, विश्वासार्ह नेतृत्व, लोकांची नाडी जाणणारा प्रचार हे सारे जाति-आधारित राजकारणाचा अंत करणारे ठरले…

बिहारच्या निकालाने भाजपचा केसरिया-भगवा झेंडा हिंदीभाषक पट्ट्यात कसा अजिंक्य, अपराजेय आहे हे पुन्हा सिद्ध केले. या विजयाच्या विश्लेषणासाठी नेहमीची शब्दकळा सोडून नवी परिभाषा शोधावी लागेल. भाजपचा हा विजय तात्कालिक नसून तो पक्षाच्या राजकीय मानसिकतेचा विजय आहे, हे लक्षात घ्यावे लागेल. कोणत्याही सुट्टीविना २४ तास काम करणारे नेते आणि त्यांच्याकडून कार्यकर्त्यांना मिळणारी प्रेरणा, हेच भाजपला अजिंक्य ठरवणारे सूत्र. ते विरोधकांकडे नाहीच. पण निवडणुकीत जिंकायचेच ही ईर्षा आणि गांभीर्य भाजपकडे आहे, तेही आज अन्य कुणाकडे नाही. भाजपच्या राजकीय यंत्रणा सदोदित कार्यरत असतात. याउलट, ‘व्होट चोरी’चे आरोप आक्रमकपणे करण्यासाठी यात्रा वगैरे काढून कुठल्यातरी दक्षिण अमेरिकी देशात राहुल गांधी गेले. तिथे कुठल्याशा विद्यापीठातील मुलांपुढेही व्होट चोरीबद्दल करवादले. जिथे निवडणूक घोषित झाली आहे, त्या बिहारमध्ये ते कैक आठवडे फिरकलेच नाहीत. असले राजकारण यशस्वी होत नसते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता आणि त्यांचा आजवरचा यशस्वी कारभार हा भाजपच्या विजयसूत्राचा महत्त्वाचा भाग. स्वत: मोदींनी बिहारमध्ये प्रचारकाळात १४ ठिकाणी प्रचंड सभा घेतल्या. एकही मोठा जिल्हा सोडला नाही. आता आलेले आकडे सांगतात की, मोदीजी जिथे जिथे गेले, तिथे कार्यकर्त्यांना त्यांनी अमाप उत्साह दिला आणि मतदारांचा विश्वास दृढ केला. बिहारचे पहिले बिगरकाँग्रेसी मुख्यमंत्री जननायक कर्पुरी ठाकूर यांना भारतरत्न दिल्यावर अनेकांनी ‘प्रतीकात्मक’ म्हणून नाके मुरडली होती; पण मोदींनी यंदाच्या प्रचाराची सुरुवात याच कर्पुरी ठाकूर यांच्या समस्तीपूरमधून केली. यालाही प्रतीकात्मक म्हणणारे म्हणोत, पण ‘एनडीए’ बिहारच्या लोकांना स्वच्छ, प्रामाणिक आणि मागासांच्या कल्याणासाठी झटणारे सरकार देणारच असा संदेश त्यातून मतदारांपर्यंत गेला. यंदा समस्तीपूरमध्ये मतदानाची टक्केवारी ७१.१४ वर पोहोचली, मोदी जिथे गेले त्या बेगुसरायमध्ये ६९.८७ तर मुजफ्फरपूरमध्ये ७१.८१ टक्के मतदान झाले, ही मतदारांच्या विश्वासाची पावती.

निवडणुकीत योग्य, नेमके मुद्दे हाती घेऊन आपला संदेश प्रभावीपणे पोहोचवणारी यंत्रणा कार्यरत ठेवण्याची भाजपची क्षमता हा विजयसूत्राचा आणखी एक घटक. केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजनांतून महिला, ज्येष्ठ नागरिक आणि वंचितांना गेले दशकभर मिळालेले लाभ लक्षणीय आहेत. जननायक कर्पुरी ठाकूर यांना त्यांच्या जन्मगावी अभिवादन करताना मोदीजींनी असेच स्वच्छ प्रशासन बिहारमध्ये मिळत राहील यावर भर दिला. लालू-काळातील ‘जंगल राज’चा उल्लेखही त्यांनी या पहिल्या सभेपासून केला; तो लोकांची नाडी ओळखणाराच म्हटला पाहिजे. कारण बिहारमधल्या पस्तिशी- चाळिशीत वा त्यापुढल्या वयाच्या लोकांना ‘जंगल राज’चा थेट अनुभव आहे आणि तुलनेने तरुण मतदारांना आपल्या वाडवडिलांनी भोगलेल्या त्या ‘जंगल राज’चे चटके पुन्हा कधीही नको आहेत.

भाजपच्या मुत्सद्दी तसेच तीक्ष्ण हल्ल्याला प्रत्युत्तर देणे विरोधकांना शक्य झाले नाही. तेजस्वी यादव यांनी गेल्या पाच वर्षांत स्वत:ची वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न जरूर केला, पण ते वडिलांच्या सावलीतून बाहेर येऊ शकले नाहीत. राजद चांगले सरकार देऊ शकते असा विश्वास त्यांच्या प्रचारातून मतदारांच्या मनात निर्माण झाला नाही. उलट, त्यांच्या पक्षातील तोंडाळ आणि मगरूर प्रवक्त्यांनी- विशेषत: दोन महिला प्रवक्त्यांनी – पक्षाची असंस्कृत तसेच बेलगाम ही प्रतिमा अधिकच दृढ केली. दुसरीकडे, भाजपचा सुशासनाचा अजेंडा अनेक मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांच्या व्यापक प्रचारातून मतदारांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवला गेला; तर राजदच्या तेजस्वींना एकट्यानेच प्रचार करावा लागला. विरोधकांपैकी कुणीही ‘जंगल राज’वरील भाजपच्या टीकेला तितक्याच ताकदीने प्रत्युत्तर देण्यासाठी पुढे आले नाही.

भाजपची संघटनात्मक ताकद हे आणखी एक असे शस्त्र आहे, ज्याला इतर कोणताही पक्ष तोंड देऊ शकत नाही. निवडणूक व्यवस्थापनात तज्ज्ञ असलेले गृहमंत्री अमित शाह अनेक आठवडे बिहारमध्ये मुक्काम ठोकून होते. त्यांनी राज्यातील सर्व २४३ विधानसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत झंझावाती आणि संघटित प्रचारयंत्रणा उभी केली. देशभरातील ९०० हून अधिक वरिष्ठ नेत्यांना दोन महिन्यांसाठी बिहारमध्ये मुक्काम ठोकायला लावण्यात आले. त्यांनी स्थानिक पक्षयंत्रणा सतत सक्रिय ठेवली. प्रत्येक घरापर्यंत ही यंत्रणा पोहोचेल असे पाहिले. याशिवाय, पक्षाला नेहमीप्रमाणे संघ परिवाराचे पाठबळही होतेच.

आघाड्यांबाबत बोलायचे झाले तर, नेहमीप्रमाणे काँग्रेस हा राजदच्या मानगुटीवरचा भारच ठरला. काँग्रेसने ६० हून अधिक जागांची मागणी करून त्या मिळवल्या, पण बहुतांश ठिकाणी काँग्रेसचा सुपडा साफ झाला. दुसरीकडे, नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील जदयू भाजपच्या सहकारी पक्षाच्या भूमिकेतून या ऐतिहासिक जनादेशासाठी पूरक ठरला. नितीश कुमार यांची राज्यातील मतदारांच्या एका विभागात चांगली प्रतिमा आहे. २० वर्षांपेक्षा अधिक काळ मुख्यमंत्री राहून त्यांनी इतिहास घडवला आहे. या विजयाने मोदी हे प्रभावी आघाडी व्यवस्थापक असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

बिहारमध्ये जातीय राजकारणाचा अंत हा या निवडणूक निकालातील सर्वात महत्त्वाचा संदेश म्हणता येईल. कोणताही ठोस अजेंडा नसताना, तेजस्वी यांनी पूर्णत: सडलेल्या ‘एमवाय’ (मुस्लीम-यादव) समीकरणावरच आशा ठेवली होती. राघोपूर या त्यांच्या कुटुंबाच्या पारंपरिक मतदारसंघातही ते अनेक फेऱ्यांपर्यंत पिछाडीवर होते; त्याबरोबरच मतदारांनी जातनिष्ठेपेक्षा सुशासनाला पसंती दिली आहे, हे त्यांच्या पक्षाच्या अत्यंत निराशाजनक कामगिरीने दाखवून दिले, ही या निवडणुकीतली सर्वांत चांगली गोष्ट आहे. त्यामुळेच येत्या काही वर्षांत बिहारचे भवितव्य बदलणार आहे.

लेखक ‘इंडिया फाउंडेशन’चे अध्यक्ष व संघ परिवारातील नेते आहेत.