‘हवेचे प्रदूषण ही सार्वजनिक आरोग्यातील मूक आणीबाणी आहे’ अशा आशयाचे विधान जागतिक आरोग्य संघटनेने सुमारे पाच-सहा वर्षे आधी केले होते. गेल्या दशकभरात भारतात प्रदुषित हवेमुळे मरणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भारतातील दिल्लीसारखी काही शहरे हवेच्या प्रदूषणामुळे मूक आणीबाणीचे आणि संचारबंदीचे भीषण वास्तव अनुभवत आहेत.
२३ जुलै २०२५ रोजी नेदरलँड या देशातील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (ICJ) जागतिक पर्यावरण आणि हवामान बदलासंदर्भात एक निकाल देताना असे नमूद केले आहे की पृथ्वीच्या हवामान प्रणालीचे संरक्षण करणे ही सर्व देशांची कायदेशीर जबाबदारी आहे. भारतात नागरिकांना हवामान प्रणालीचे संरक्षण करणे हे आपले कर्तव्य आहे असे वाटते का ? भारतातील आजचे नागरिक पुढच्या पिढ्यांना प्रदुषित हवेचे आंदण देणार आहेत का ? या आक्टोबर महिन्यात भारतातील अनेक शहरांमध्ये हवा प्रदूषित असल्याचे आढळून आले.
२१ आक्टोंबर रोजी राजधानी दिल्लीतील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ४०० पेक्षा जास्त झाला होता. म्हणजे ऐन दीपोत्सवात दिल्लीची हवा श्वास घेण्यासाठी विषारी झाली होती. दीपोत्सवाच्या आठवड्यात मुंबईच्या विविध भागात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १०६ ते ३३६ एवढा होता. म्हणजे मध्यम ते धोकादायक अशी हवा मुंबईत होती.
हेल्थ इफेक्ट्स इन्स्टिट्यूट आणि इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मेट्रिक्स अँड इव्हॅल्यूएशन यांनी प्रसिद्ध केलेल्या ‘स्टेट ऑफ ग्लोबल एअर २०२५’ या अहवालानुसार भारतात २०२३ मध्ये सुमारे २० लाख नागरिकांचा मृत्यू वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे झाला असल्याचे आढळून आले. या अहवालानुसार भारतात वायू प्रदूषणामुळे होणाऱ्या आजारांमुळे मरणाऱ्यांचे प्रमाण एक लाख नागरिकांपैकी १८६ नागरिकांचा मृत्यू असे आहे. हवेच्या प्रदूषणामुळे भारतात दरवर्षी बारा लाख चाळीस हजार लोकांचा मृत्यू होतो अशी आकडेवारी २०१७ मध्ये जाहीर करण्यात आली होती. ही आकडेवारी २०२३ मध्ये पाच लाखाने वाढली. २०२३ पेक्षा २०२५ या वर्षाची स्थिती निश्चितच गंभीर असेल. दीपोत्सवाच्या काळात मागील वर्षीपेक्षा यंदा पुण्यात हवेचा गुणवत्ता निर्देशांक मध्यम होता. मागच्या वर्षी २०१ तर यंदा १५१ एवढा होता. यंदा महाराष्ट्रात भरपूर पाऊस आला. पण पावसाचे प्रमाण कमी झाल्यावर राज्याचा हवेचा गुणवत्ता निर्देशांक १८० एवढा म्हणजे वाईट श्रेणीत होता. दीपोत्सवात पाऊस आल्याने हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी ५७ ते ९९ एवढा आहे. पण पावसाळी दिवस संपले की पुन्हा वायू प्रदूषण जलद गतीने वाढणार आहे.
वायू गुणवत्तेविषयी संशोधन करणाऱ्या स्वित्झर्लंडच्या एका संस्थेने (IQAir) प्रकाशित केलेल्या अहवालानुसार जगातील दहा प्रदूषित शहरांमध्ये पहिल्या क्रमांकावर दिल्ली आहे. पाचव्या क्रमांकावर मुंबई आहे तर कोलकता आठव्या क्रमांकावर आहे. जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या सूचीत दिल्ली एक क्रमांकावर असणे आणि पहिल्या दहा प्रदूषित हवेच्या शहरांमध्ये भारतातील तीन महत्त्वाची शहरे असणे ही बाब आपल्या पर्यावरणीय अज्ञानाचा पुरावा देणारी आहे. या सूचीत दुसऱ्या क्रमांकावर लाहोर आणि चौथ्या क्रमांकावर कराची ही पाकिस्तानातील शहरे आहेत पण प्रदूषणाच्या समस्येबाबत अजिबात सजग नसणाऱ्या नागरिकांनी आंधळेपणाने पाकिस्तानातील प्रदूषणाची चर्चा करणे म्हणजे अज्ञान आणि प्रदूषणातच सुख मानण्याची मनोवृत्ती होय.
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने २८ आक्टोबर २०२२ रोजी जाहीर केलेल्या एका अहवालानुसार भारतातील १७७ शहरांपैकी २० शहरांतील हवा अत्यंत प्रदुषित (म्हणजे श्वास घेण्यासाठी अत्यंत हानीकारक गुणवत्ता निर्देशांक २०१ ते ३००) तर २९ शहरांतील हवा प्रदुषित आढळली आहे. ७४ शहरातील हवा मध्यम आहे याचा अर्थ असा आहे की आपल्या देशातील अनेक शहरे वायुप्रदूषणाने उच्चांकी पातळी गाठण्याच्या स्थितीत आहेत. २०२१ च्या मार्च महिन्यात प्रसिद्ध झालेल्या जागतिक हवा गुणवत्ता अहवाल २०२० नुसार जगातील सर्वाधिक ३० प्रदूषित शहरांत २२ भारतीय शहरं आहेत. २०१८, २०१९ आणि २०२० या तीनही वर्षी भारताची राजधानी दिल्ली सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये अग्रस्थानी आहे. २०१९ मध्ये भारतात एक कोटी ७० लाख लोक हवेच्या प्रदूषणामुळे मरण पावले. २०२० साली दिल्लीत ५४ हजार, मुंबईत २५ हजार, बेंगळुरूमध्ये १२ हजार, हैदराबादेत ११ हजार तर चेन्नईमध्ये ११ हजार लोक हवेच्या प्रदूषणामुळे मरण पावले. पण या भयंकर आकडेवारीने भारतीय नागरिक अस्वस्थ झाले नाहीत आणि कृतिशील तर मुळीच झाले नाहीत. आरोग्यासाठी अपायकारक असलेल्या हवेमुळे भारतीय माणसांचे आयुष्यमान पाच वर्षे ते नऊ वर्षांनी कमी होत आहे.
मुलाबाळांच्या भविष्यातील सुखसमृद्धीसाठी आयुष्यभर संपत्ती गोळा करण्यासह सोयीसुविधा आणि सर्व प्रकारच्या सुखाचे नियोजन करणारे आपण सुशिक्षित भारतीय आपल्या पुढच्या पिढ्यांना जीवघेण्या प्रदुषणाचे आणि हवामान बदलाचे आंदण देणार आहोत का ?
जानेवारी २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘पृथ्वीचं आख्यान’ या पुस्तकात पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर लिहितात, “ प्रदूषणाची तीव्रता लक्षात येण्यासाठी केंद्रीय प्रदूषण मंडळ, पर्यावरण प्रदूषण निर्देशांक देत असते. त्यांनी जाहीर केलेल्या २०२१ मधील निरीक्षणानुसार, देशातील १०० अतिप्रदूषित औद्योगिक क्षेत्रांच्या यादीत महाराष्ट्रातील तारापूर, चंद्रपूर, औरंगाबाद, डोंबिवली, नाशिक, नवी मुंबई, चेंबूर, पिंपरी व महाड ही नऊ क्षेत्रं येतात. महाराष्ट्रात सुमारे ७५ हजार कारखाने असून त्यापैकी १२.५ हजार हे अतिप्रदूषण करीत आहेत. छोटी-मोठी वायूगळती सुरूच राहते. देशातील अतिप्रदूषित ९४ शहरांपैकी सर्वाधिक २० शहरं ही महाराष्ट्रातील आहेत. मुंबई, नवी मुंबई, उल्हासनगर, ठाणे, भिवंडी, बदलापूर, पुणे, पिंपरी, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, अकोला, जळगाव, औरंगाबाद, जालना, लातूर, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर या शहरांमधील हवेची गुणवत्ता मानकांनुसार वाईट आहे. नाकातोंडाला आच्छादन लावल्याशिवाय कोणत्याही शहरात चालणं अशक्य होत आहे. या शहरांमधील हवेतील धूलिकण व नायट्रोजन ऑक्साइड यांची पातळी चिंताजनक आहे.
भारतामधील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी १०१ ते २०० मध्ये असून तो कित्येक ठिकाणी ५०० पर्यंत जात राहतो. सूक्ष्म धूलिकण हे साधारणपणे एका घनमीटरमध्ये १२५ असतात. कधी कधी त्यांची घनता ५०० पर्यंत जाते. सार्वजनिक पातळीवर प्रदूषण निर्देशांक प्रदर्शितच केले जात नसल्यामुळे जनता अज्ञानात सुखी राहते. काहीही दोष नसताना सामान्य माणसांना त्यांच्या आरोग्यातून या प्रदूषणाची खूप मोठी किंमत मोजत जगावं लागत आहे. (पृष्ठ ११५,११६) या भीषण वास्तवाची जाणीव लोकप्रतिनिधींसह सुशिक्षित नागरिकांना आहे का ?
आपल्या हातातील स्मार्टफोनच्या स्क्रीनवर हवेचा गुणवत्ता निर्देशांक पाहता येतो. श्वासोच्छ्वासासाठी तरी गुणवत्ता असलेली हवा आपल्याला पाहिजे , ती मिळत नसेल तर आपण हवेच्या प्रदूषणाचा नेमका प्रश्न काय आहे ते समजून घेतले पाहिजे. पण या बाबतीतही ‘प्रगतिशील’ भारत अक्षरशः अप्रगत आहे.
एका सकारात्मक कृतिशील प्रयत्नाची दखल दोन वर्षांपूर्वीच्या दीपोत्सवानंतर काही प्रसारमाध्यमांनी घेतली होती. तमिळनाडूतील वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी या दोन गावाजवळच्या वेतांगुडी पक्षी अभयारण्यातील भारतीय पक्ष्यांसह अनेक स्थलांतरित पक्ष्यांना इजा होऊ नये म्हणून या गावांतील गावकरी गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत फटाके वाजवत नाहीत, परिणामी ऐन दिवाळीतही या अभयारण्यात पक्षी निर्भयपणे वावरतात. तमिळनाडूतील वेतांगुडीपट्टी आणि पेरिया कोल्लुकुडीपट्टी या दोन गावांतील गावकऱ्यांचा हा प्रयत्न लहानसा वाटत असला तरी हवेची गुणवत्ता राखण्यासह जैवविविधतेचे संवर्धन करण्याच्या संदर्भातील मौलिकता फार मोठी आणि ऐतिहासिक आहे. दीपोत्सवात फटाके न वाजवण्याचा निर्णय संस्कृती जतनासाठी कदाचित अप्रिय ठरणारा असेलही पण पर्यावरण संरक्षण आणि सृष्टीचे जतन केले तरच मानवाची संस्कृती आणि सभ्यता टिकून राहील हे या दोन गावांतील गावकऱ्यांना कळले असावे म्हणून हा निर्णय घेत त्यांनी हवेची गुणवत्ता राखण्यासाठी व जैवविविधतेचे संवर्धन संरक्षण करण्यासाठी आपल्यापुरता निर्णय घेत एक पाऊल अत्यंत सजगपणे आणि निर्भीडपणे उचलले आहे. असे म्हटले जाते की अ जर्नी ऑफ हंड्रेड माइल्स, स्टार्ट्स विथ अ सिंगल स्टेप. खूप लांबच्या अत्यंत खडतर प्रवासाची सुरुवात सकारात्मकतेने, निर्भयपणे आणि सत्यनिष्ठेने उचललेल्या पहिल्या पावलापासून होत असते. विनाशाकडे वेगाने धावणाऱ्या आपल्याच लोकांना धोक्याची जाणीव करून देत आपल्याला जैवविविधतेच्या- सृष्टीच्या संवर्धनासाठी आणि एकूणच पर्यावरण संरक्षणासाठी कृतिशीलतेचे पहिले निर्णायक पाऊल आता निर्भयपणे आणि सजगपणे उचलावे लागणार आहे. श्वासोच्छ्वासासाठी लागणाऱ्या हवेची गुणवत्ता राखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले तरी सामूहिक कृतिशीलतेचा सजग आविष्कार घडेल. पण हवेच्या प्रदूषणाचे अप्रिय सत्य स्वीकारून कृतिशील होण्याच्या बाबतीतही ‘मराठी’ पाऊल ‘मागेच’ अडले आहे आणि भारतीय पाऊल तर अंधश्रद्धांसह बेगडी धर्मनिष्ठांच्या बेड्यात अडकले आहे.
लेखक समीक्षक आहेत
ajayjdeshpande23@gmail.com
