लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा शुक्रवारी संपेल. देशभरातील ५४३ लोकसभा मतदारसंघांपैकी २१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील १०२ जागांवर १९ एप्रिलला मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने १६ मार्चला निवडणुकीची घोषणा केली. त्यापूर्वीच, नेमके सांगायचे तर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये झालेल्या पाच राज्यांतील निवडणुकांनंतर देशाला लोकसभा निवडणुकीचे वेध लागले होते. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी त्या दृष्टीने तयारी सुरू केली. भाजपच्या बाबतीत सांगायचे तर विशेषतः २०१४ नंतर हा पक्ष २४ तास, ३६५ दिवस निवडणुकीच्या मूडमध्येच असतो असे म्हटले जाते. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद असो किंवा सरकारी कार्यक्रम किंवा पक्षाचा कार्यक्रम, प्रत्येक व्यासपीठाचे रूपांतर प्रचारसभेत करण्यात वाकबगार आहेत. ही सगळी पूर्वपीठिका पाहता, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी आतापर्यंत प्रचारावर पक्की मांड ठोकायला हवी होती, पण तसे झाल्याचे दिसत नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फक्त मोदींबाबत बोलायचे झाले तर त्यांना अजूनही प्रचाराला इच्छित वळण लावणारे, हवे तसे ‘नॅरेटिव्ह’ सेट करता आलेले नाही. त्यांच्या विशेष कौशल्यांचा विचार करता, हे काहीसे धक्कादायक आणि बुचकळ्यात पाडणारे आहे. नाही म्हणायला ‘अब की बार ४०० पार’ आणि ‘मोदी की गॅरंटी’ या दोन घोषणा दिल्या जात आहेत. पण त्याचा म्हणावा तसा प्रभाव पडताना दिसत नाही. इतकेच नाही तर कधीकधी प्रचारादरम्यान मोदींचीच दमछाक झालेली दिसते.

हेही वाचा – ‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…

कोणत्याही विषयाला धार्मिक किंवा हिंदू-मुस्लीम किंवा राष्ट्रवादाचे वळण देणे ही मोदींच्या प्रचाराची खासियत आणि त्यांचे कौशल्यसुद्धा. त्यांनी तसा प्रयत्न अर्थातच केला. इंडिया आघाडीच्या मुंबईत झालेल्या सभेमध्ये ईव्हीएमचे कार्य, सरकारी तपास यंत्रणांचा वापर, इत्यादी मुद्द्यांबद्दल बोलताना काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शक्ती या शब्दाचा वापर केला. आम्ही कोणत्याही शक्तीला घाबरत नाही अशा अर्थाचे वक्तव्य त्यांनी केले. मोदींनी त्यातील शक्ती हा शब्द उचलून त्याला धार्मिक रूप दिले. राहुल गांधींनी शक्तीचा म्हणजे देवतेचा अपमान केला आहे, असा आरोप त्यांनी केला. देशातील प्रत्येक माता भगिनी आमची शक्ती आहे असं सांगायलाही ते विसरले नाहीत. राहुल गांधी यांनी त्याबद्दल ‘एक्स’वरून खुलासा केला, त्यानंतरही मोदी यांनी आणखी काही वेळा हा संदर्भ वापरला. पण त्याचा फारसा परिणाम होताना दिसला नाही. अखेरीस त्यांनी तो सोडून दिला.

पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर आणखी एक गंभीर आरोप केला. काँग्रेसचा जाहीरनामा ५ एप्रिलला प्रसिद्ध करण्यात आला. त्यामध्ये विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. या सर्व योजना खरोखर अमलात आणायच्या असल्यास त्यासाठी प्रचंड निधीची गरज पडेल. एवढा पैसा आणणार कुठून असा प्रश्न भाजप आणि मोदी विचारू शकले असते. कदाचित भाजपच्या इतर नेत्यांनी तसा विचार केलाही असेल. पण मोदींची प्रतिक्रिया अगदीच अनपेक्षित होती. त्यांनी या जाहीरनाम्याचा संबंध मुस्लीम लीगशी जोडला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा ठसा आहे असा आरोप केला. अपेक्षेप्रमाणे काँग्रेसने तातडीने उत्तर दिले. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील हिंदू महासभेचे नेते आणि भाजपच्या प्रातःस्मरणीय नेत्यांपैकी एक असलेले श्यामाप्रसाद मुखर्जी हे स्वतः १९३९ मध्ये मुस्लीम लीगबरोबर पंजाब, बंगाल आणि वायव्य सरहद्द प्रांतामध्ये संयुक्त सरकारमध्ये सहभागी होते या इतिहासाचे स्मरण करून दिले. त्यानंतरही मोदी आणि अन्य काही नेत्यांनी काही वेळा या आरोपाचा पुनरुच्चार केला. ८ एप्रिलला काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. त्यानंतर पंतप्रधानांनी हा आरोप करणे बंद केले.

त्यानंतर मोदींनी विरोधकांच्या आहाराकडे लक्ष वळवले. प्रचारादरम्यान राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी हेलिकॉप्टरमधून प्रवास करताना सहकाऱ्याबरोबर मासे खात असल्याची ध्वनिचित्रफित समाजमाध्यमांवर पोस्ट केली. त्यावरून मोदींनी विरोधक श्रावणात मटण, मासे खातात अशी टीका करत त्यांच्यावर मुघली मानसिकतेचे असल्याचा आरोप केला. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर येथे १२ एप्रिलला झालेल्या सभेत त्यांनी हा आरोप केला. आता श्रावण नसतानाही मोदींनी श्रावणाचा उल्लेख केला, त्याचा संदर्भ मागील वर्षी सप्टेंबरमध्ये लालूप्रसाद यादव यांनी त्यांच्या निवासस्थानी राहुल गांधी यांच्यासाठी मटण केले होते त्याचा असू शकतो. पण मोदींच्या या आरोपामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. मटण, मासे खाणारी व्यक्ती आणि मुघली मानसिकता यांचा संबंध काय हा प्रश्न आहेच. शिवाय मुघली मानसिकता म्हणजे काय, श्रावणात किंवा अन्य कोणत्याही महिन्यात मांसाहार केला तरी कोणत्याही जाती-धर्माच्या माणसाला हीन लेखण्याचा अधिकार मोदी किंवा अन्य कोणालाही कसा मिळू शकतो? अखेरीस हाही मुद्दा मोदींना फारसा ताणता आला नाही.

हेही वाचा – बहुसंख्य हिंदू तर मांसाहारीच!

लोकसभा निवडणूक प्रचाराचे वारे वाहू लागण्यापूर्वीच, इंडिया आघाडीचा महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या द्रमुकचे नेते आणि तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविरोधात केलेल्या वक्तव्यावरून भाजपने त्यांच्यावर आणि इंडिया आघाडीवर भरपूर टीका केली होती. मात्र, त्यावरून अपेक्षित ध्रुवीकरण झाल्याचे दिसत नाही. कर्नाटकमधील मैसूर येथे १४ एप्रिलला झालेल्या प्रचारसभेत मोदींनी काँग्रेसवर राम मंदिर उद्घाटनाचे निमंत्रण नाकारल्यावरून टीका केली. विरोधी पक्ष सनातन धर्म नष्ट करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपांचा त्यांनी पुनरुच्चार केला.

बारकाईने पाहिले तर आतापर्यंत राम मंदिर, अनुच्छेद ३७०, सनातन धर्म, काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मुस्लीम लीगचा प्रभाव असल्याचा आरोप, मांसाहार असा कोणताही मुद्दा मोदींच्या मदतीला येताना दिसत नाही. एकीकडे विरोधकांनी बेरोजगारी आणि महागाईचा मुद्दा धरून ठेवला आहे. दुसरीकडे मोदींना प्रचाराला हवे तसे वळण देण्यात आतापर्यंत तरी यश आलेले नाही. त्यामुळे त्यांना आतापर्यंत तरी ‘नॅरेटिव्ह’ने हुलकावणी दिली आहे असे म्हणावे लागेल.

nima.patil@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pm narendra modi not got important topics against opposition this year ssb
First published on: 18-04-2024 at 08:47 IST