श्रीकांत विनायक कुलकर्णी
सत्यघटना, दंतकथा, इतिहास, पुराण, लोकोत्तर व्यक्तिमत्व, थोरामोठ्यांची आत्मचरित्र आदी कशावरही काही नवीन कलाकृती निर्माण करताना, आवर्जून अन ठसठशीतपणे नमूद केली जाणारी एक अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे त्या निर्मितीत घेतली गेलेली क्रिएटिव्ह लिबर्टी अर्थात कलाकाराचं स्वातंत्र्य. कलाकाराच्या या स्वातंत्र्याबाबत असं म्हणता येइल की, मूळ आशयाला व गाभ्याला धक्का न लावता, सादरीकरणात सहजता यावी, सुसूत्रता यावी, मूळ विषयच अधिक उत्कटतेनं अधोरेखित व्हावा म्हणून काही काल्पनिक प्रसंग वा बारकावे पेरण्याची निर्मात्यानं घेतलेली मोकळीक. ही अशी थोडीफार मोकळीक आवश्यक असतेच अन ती घेणं अन ती घेतलीये हे नमूद करणं हे योग्यच, कारण, नाहीतर कदाचित रंजकता थोडी कमी होऊन निर्मिती रुक्ष होण्याची शक्यता असते. ती निर्मिती केवळ एक माहितीपट ठरू शकते अन त्यातलं अर्थकारण पार कोलमडू शकतं. अर्थात साधा माहितीपटसुद्धा मनाची पूर्ण पकड घेत, प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवेल असा बनवण्याची क्षमता असलेली मंडळीही जगात आहेत. तर, रंजकतेत भर घालणाऱ्या या क्रिएटिव्ह लिबर्टी अर्थात कलाकाराच्या स्वातंत्र्याचा विचार मनात घोळत असताना जे विचार मनी येत गेले ते ही चक्क रंजकच होते, अन तेच खाली एखाद्या स्वगतासारखं मांडू पाहतोय. मांडणी विस्कळीत वाटली तर मी नकळत घेतलेले लेखनस्वातंत्र्य म्हणून आपण मोठ्या मनानं मोकळीक द्याल असा विश्वास वाटतोय.

या अभिव्यक्तीतल्या मोकळीकीची सुरवात पार आमच्या देवादिकांच्या रुपांपासून होते. पूर्वी जेव्हा छायाचित्र नव्हती, चित्रही नव्हती, मूर्तीही नव्हत्या त्यावेळी आमच्या देवादिकांच्या प्रतिमा, त्यांची रुपं कशी काय ठरत व कालौघात रुजत, ठसत गेली असावीत? मौखिक वर्णनांतून असतील तर तसे उल्लेख आमच्या वेदोपनिषदांत निश्चितच उपलब्ध असायला हवे, पण ते नाहियेत. उदाहरणार्थ, सूर्य तेजस्वी आहे असं वर्णन आहे म्हणजे तो सहस्त्ररश्मी आहे हे ही सयुक्तिकच, पण त्याचं नंतर कुणी केलेलं प्रतीकात्मक अभिव्यक्त रुप वा रुपात्मक वर्णन मात्र विचार करायला भाग पाडतं. बरेच ठिकाणी सूर्याच्या, गोल चेहेरा अन सभोवताली ज्वाळांच्या रुपात फाकणारी प्रभावळ असलेल्या, ओतकाम केलेल्या धातूच्या प्रतिमा पहायला मिळतात. त्यात तीन तपशील खास करून आढळतात – कपाळावर उर्ध्वपुंड्र (इंग्रजी यू आकाराचं गंध), तरतरीत नाक अन भरदार पिळलेल्या मिश्या. आता या मिश्या असण्याचं वर्णन कुठे आहे? का व कश्या आल्या असाव्यात या मिश्या? बरं, इतर अवतार, जसे की श्रीराम व श्रीकृष्ण हे ही सूर्याप्रमाणे देवच होते, पुरुष होते, तेजस्वी होते, कर्तबगार होते, त्यांची नाकंही तरतरीत व त्यांनीही उर्ध्वपुंड्र धारण केलंय पण त्यांना मात्र मिश्या नाहीत आणि सूर्याला अगदी आवर्जून मिश्या दाखवल्या आहेत, हे असं का हा प्रश्नही पडू नये इतकं ते आपल्या जनमानसात रुळलंय.

Godfather of artificial intelligenceGeoffrey Hinton
‘एआयकडून मानवी अस्तित्वाला धोका’, ‘AI’चे जनक डॉ. जेफ्री हिंटन का व्यक्त केली चिंता?
swati maliwal assault case video
VIDEO : “…तर मी तुझी नोकरी खाईन”; मारहाण होण्यापूर्वी स्वाती मालिवाल यांच्याबरोबर काय घडलं?
loksatta analysis telangana police closure report claim rohit vemula was not a dalit
विश्लेषण : रोहित वेमुला दलित नव्हता? तेलंगणा पोलिसांच्या क्लोजर रिपोर्टमधील दाव्याने खळबळ का उडाली?
Artificial General Intelligence (AGI)
AI आणि AGI मध्ये काय आहे फरक? लोकांना या नव्या तंत्रज्ञानाची भीती का वाटते?
loksatta editorial on rare russian books vanishing from libraries across europe
अग्रलेख : पुष्किनचे रहस्य
magic of generative ai magic of generative technology
कुतूहल : जनरेटिव्ह तंत्रज्ञानाची कमाल
right to freedom under article 19 of the indian constitution
संविधानभान : स्वातंत्र्य आहे; पण..
Broadcaster Science Inculcation of scientific approach in India Prof R v Sowani
विज्ञान प्रसारकाची जन्मशताब्दी..

हेही वाचा : मतदान राजा, तुकडोजी महाराज म्हणतात, नीट विचार करून मत दे…!

इथे अभिव्यक्तींवर बहुदा भौगोलिक संदर्भ अन धारणांचा स्थळकाळानुरुप बदलत जाणारा प्रभाव असावा असं वाटतं. तसं पाहता, काळात जेव्हढं मागे जावं तेव्हढा मानव हा जास्तीत जास्त नैसर्गिक स्वरुपात आढळतो अन जसजसं आधुनिक काळात येतो तसतशी निसर्गाशी नाळ तुटत जाताना आढळते. इतकंच नाही तर, दळणवळण वाढल्याने जगातील विविध भागातले संस्कार, धारणा यांचीही सरमिसळ आढळते. पाश्चात्य पुराणातली बहुतांश सारी पात्रं, अगदी येशू ख्रिस्तसुद्धा, ही भरघोस दाढीमिश्याधारी आढळतात तर पौर्वात्य पुराणातली असुर मंडळी सोडली तर सारी पात्रं ही ‘क्लिन शेव्हन’ आढळतात. दाढीमिश्या असणं हे स्वाभाविक आहे, नसणं हे थोडं विस्मयकारक आहे. यामुळे संभाजी भिडेंचा रामाला मिश्या असाव्याच हा आग्रह विनोदी वाटला तरी तसा अप्रस्तुत म्हणता येणार नाही. तसंच, श्रीमद्भग्वदगीतेच्या छापील प्रतींवर श्रीकृष्ण अन अर्जुन यांचं गीतोपदेशासमयीचं चित्र हटकून आढळतं. त्यात बऱ्याच ठिकाणी या दोघांचीही केवळ आभूषणंच नव्हे तर चिलखतंही सोन्याची दाखवली गेलेली आढळतात, गदासुद्धा सोन्याच्या व रत्नजडीत असतात, नशीब की तलवारी अन बाण सोन्याचे दाखवत नाहीत ते. प्रचलित चित्रांतील त्या काळातील मुकुट, दागिने, आभूषणांच प्रमाण बघता त्याकाळची बहुसंख्य प्रजा ही अहोरात्र केवळ सुवर्णालंकारच घडवत असावी असं वाटून जातं. अर्थातच तेवढ्या खाणी, शुद्धिकरणाचे, ओतकामाचे कारखानेही हारीने असावे असं वाटतं. ही सारी तात्कालीन चित्रकारांनी अन त्यांच्या मार्गदर्शकांनी घेतलेल्या क्रिएटिव्ह लिबर्टी अर्थात कलाकाराच्या स्वातंत्र्याची उदाहरणं.

आपल्याकडील देवादिकांच्या आजच्या प्रचलीत रुपांचं श्रेय जर कुणाला द्यायचंच झालं तर ते बहुदा राजा रवी वर्मा या विश्वविख्यात चित्रकाराला देता येइल. छायाचित्रणाचा अन स्वस्त पुनर्मुद्रणाचा शोध लागण्यापूर्वी घराघरात पूजले जायचे ते देवदेवतांचे अन यंत्रांचे विविध धातूंचे टाक. राजा रवी वर्माने आपली कल्पनाशक्ती वापरून अनेक पौराणिक प्रसंग व देवादिकांची अत्यंत सुंदर अन सात्विक अशी चित्रं रेखाटली. त्याच्यावरील तात्कालीन पाश्चात्य अन आधुनिक प्रभावामुळे या चित्रांत आमच्या देवी या पाचवारी साडीत अन देव हे ‘क्लिन शेव्हन’ रुपात अवतरले. लिथोग्राफ या तंत्राचा वापर केल्याने या चित्रांच्या रंगीत पुनर्मुद्रित प्रती देशाच्या कानाकोपऱ्यातच नव्हे तर लोकांच्या मनामनांमध्येही पोहोचल्या. रवी वर्मांनी कल्पिलेलं देवादिकांचं रुप हे अश्या रितीनं भारतभर एक प्रमाण रुप म्हणून रुढ झालं. त्यांनी घेतलेलं कलास्वातंत्र्य हे कालौघात एक मापदंड वा पुढील सर्व कलाकृतींचा मूळ साचा, एकप्रकारे ‘टेमप्लेट’ ठरलं.

हेही वाचा : ‘अमेरिकन ड्रीम’ दु:स्वप्न का ठरत आहे?

हे सारं डोक्यात यायला कारण झालं ते आत्ताच झळकलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील बहुचर्चित चरित्रपटाचं. त्यातील काही प्रसंग हे कल्पित आहेत, अन मुळातच निर्मात्यानं आपण अशी मोकळीक घेतल्याचं नमूद केल्यानं त्यात खरंखोटं करायचा प्रश्नही उद्भवत नाही. हेच लागू पडतं काही काळाआधी येऊन गेलेल्या बाजीराव पेशवे वा तानाजी मालुसरे यांच्यावर बेतलेल्या आणि तत्सम इतर अनेक चरित्रपटांनाही. प्रश्न निर्मात्यानं घ्यावयाच्या स्वातंत्र्याचा नसतो. असलाच तर सत्याशी वा वास्तवाशी कुठे अन कितपत फारकत घेतली गेली हे नमूद करण्याचं कायदेशीर बंधन घातलं जावं की नाही याचा असतो. आम्ही प्रेक्षकांनी जे दाखवलं गेलंय तेच सत्य मानून एक वेगळाच वा प्रसंगी विडंबित इतिहास प्रमाण मानावा की नाही याचं तारतम्य बाळगण्याचा असतो. कुणाच्या प्रेमादराखातर एखादी निर्मिती करताना नकळत इतर कुणाचा अनाठायी द्वेष वा राग तर वाढीस लागत नाहीये ना हे भान बाळगण्याचा असतो. मुळात चरित्रपट हे प्रेरणादायी असतात त्यामुळे प्रेक्षकांनी खरोखर काही प्रेरणा घेणं अपेक्षित असावं वा केवळ एक कौतुक वा मनोरंजनाचा विषय म्हणून पहावं हाही प्रश्न पडावा. चित्रपट किंवा कलाकृती या केवळ एखाद्या विशिष्ट व्यक्तीच्या मनात एखाद्या गोष्टीविषयी एका ठरावीक मनोवस्थेत उमटलेल्या भावनांचं व्यक्त रुप असतात, पूर्णपणे सापेक्ष असतात. चित्रपट वा कलाकृती या जरी घडणाऱ्या इतिहासाच्या साक्षीदार असल्या तरी इतिहासाच्या अभ्यासाला अन खुद्द इतिहासाला पर्याय ठरत नाहीत. कलाकृती या केवळ कलाकृती म्हणूनच पहाण्याचं, अगदीच नाहीतर, गांभीर्याचं अस्तर असलेलं थोडंसं उच्च कोटीचं, पण मनोरंजन म्हणूनच पाहण्याचं भान बाळगण्यातच कि्रएटिव्ह लिबर्टीचं अर्थात कलाकाराच्या स्वातंत्र्याचं चांगभलं असणार आहे.

sk3shrikant@gmail.com