ज्युलिओ एफ. रिबेरो

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राहुल गांधी यांचे नाव गेल्या आठवड्यापासून राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी आले. सत्ताधारी पक्षानेच संसदेचे कामकाज रोखण्याचा प्रकार गेल्या आठवड्यात घडला. राहुल गांधी यांनी त्यांच्या अलीकडल्या ब्रिटन-भेटीत त्यांनी केलेल्या ‘राष्ट्रविरोधी’ वक्तव्याबद्दल माफी मागावी, यासाठी सत्ताधारी पक्षाने संसदेचे कामकाज रोखून धरले. आता राहुल गांधी यांच्याच आणखी एका वक्तव्याचे प्रकरण ताजे झाले. सुरुवातीलाच स्पष्ट करतो की , ही अशी वक्तव्ये करण्याची काही गरज नसते, ती टाळली पाहिजेत कारण ती भडकाऊ आणि अक्षम्य आहेत, असे माझे व्यक्तिगत मत आहे.

राजकारणी लोक त्यांच्या विरुद्ध जाणाऱ्या शब्दांना वाटेल तसे वाकवतात, त्यांच्यासाठी ते फार सोपे असते. पण असल्या राजकारणातून मतलबीपणा आणि खुशमस्करेगिरीलाही प्रोत्साहन मिळत राहाते. ‘इंदिरा इज इंडिया’सारखे विधान हे इंदिरा गांधी खुशमस्कऱ्यांना किती प्राधान्य देत होत्या याचेच निदर्शक ठरले होते. भाजपमध्येही आज हेच चालू आहे असे मी म्हणू शकत नाही, परंतु एवढे मात्र मी खात्रीने सांगेन की, भाजपची प्रचारयंत्रणा आजघडीला सर्वांत कार्यक्षम आहे. इतकी की, भाबड्या जनतेचा धादांत असत्यावरही विश्वास बसावा.

एकच असत्य शंभरदा सांगितले की ते सत्य वाटू लागते, या गोबेल्स-तंत्राचा अवलंब अशा कार्यक्षम प्रचारयंत्रणेकडून होत असतो. मग काळ्याचे पांढरे आणि पांढऱ्याचे काळे करण्यास काहीही तोशीस पडत नाही. राहुल गांधी यांनी तर भाजपच्या प्रचारयंत्रणेला मोठाच दारूगोळा पुरवला आहे.

दाढी आता काळी-पांढरी झाली असली, तरी माझ्या मानाने राहुल गांधी तरुणच. तर या तरुण माणसाने लंडनमध्ये ‘चॅटहम हाउस’ या संस्थेतील प्रकट मुलाखतीत काही विधाने केली. ते म्हणाले : ‘‘भारतातील लोकशाही ही जगासाठी सार्वजनिक हिताची बाब आहे. भारतीय लोकशाही ही भारताच्या भौगोलिक सीमांपुरती बद्ध नाही. जर भारतीय लोकशाही कोलमडून पडली तर माझ्या मते, जगातील लोकशाहीसाठी तो घातक धक्का असेल. त्यामुळे हा विषय आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आमचे प्रश्न आम्ही सोडवूच. पण तुम्हाला हे ल२ाात आले पाहिजे की, या प्रश्नाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटणारे आहेत.” . साधारण याच विषयावर राहुल गांधी केम्ब्रिज विद्यापीठातही बोलले, त्या भाषणातील विधाने मात्र बालीश होती. शिखांना दुय्यम नागरिक म्हणून आपल्या सरकारकडून वागवले जाते असे विधान तर केवळ तथ्यहीनच नव्हे, हे विधान धोकादायकही आहे!

पण राहुल जे काही बोलले, त्यात ‘राष्ट्रविरोधी’ असे काही कुणाला दिसले काय? तरीही ‘गोबेल्स तंत्रा’ने असे असत्यकथन पसरवण्यात आले की, राहुल गांधी यांनी परदेशात जाऊन भारतात परकीय हस्तक्षेप हवा असल्याची मागणी केली. राहुल असे काहीही बोलले नाहीत, कदाचित थोडेफार त्या अर्थाचे बोलले असते तरी संसद बंद पाडण्यात हशील होते. पण राहुल यांचे वक्तव्य विपर्यस्त पद्धतीने वापरले गेले. त्यातून बहुधा सत्ताधारी पक्षाला हवे होते ते मिळाले… बाकीच्या वादग्रस्त विषयांना विराम!

पण मुळात, भारतातल्या लोकशाहीच्या स्थितीबद्दल आणि भाजपसारख्या प्रतिपक्षाबद्दल परदेशात जाऊन बोलण्यापेक्षा राहुल गांधी यांनी, ही लोकशाही वाचवण्यासाठी नरेंद्र मोदी यांच्यासारखे तगडे प्रतिस्पर्धी असूनही यश मिळवण्याच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित केलेले बरे. निवडणूक प्रचाराच्या धुमाळीत आपण कसे उतरायचे, याचा विचार राहुल यांना करावाच लागेल. कारण त्यांचा पक्ष ईशान्येकडील ज्या दोन राज्यांत गेली काही दशके सत्तेमध्ये होता, तेथेही आताशा हरतो आहे.

‘भारत जोडो यात्रा’ हा चांगला प्रयत्न होता. तळागाळापासूनच्या संघटना बांधणीची शक्यता या यात्रेमुळे दिसू लागली होती. पण हे काम करण्याऐवजी राहुल गांधी लंडन आणि केम्ब्रिजला निघून गेले. पक्षाची वाढ तालुक्यांपासून राज्यापर्यंत आणि मग केंद्रापर्यंत करण्याचे काम भाजपने वर्षानुवर्षे केलेले आहे आणि आता तो पक्ष राजकीय पटल व्यापणारा ठरतो आहे. त्या अढळपदावरून भाजपला हटवण्यासाठी केवळ ‘विरोधकांची एकजूट’ हे उत्तर असू शकत नाही.

भाजपला सत्ताच्युत केल्याखेरीज विरोधी पक्षीयांचे नष्टचर्य संपणार नाही. आज ना उद्या ईडी, सीबीआय किंवा प्राप्तिकरवाले किंवा आणखी कोणी या विरोधी पक्षीयांच्या दारी पोहोचू शकतातच. भाजपने खेळाचे नियमच बदलून टाकले आहेत. ‘हमाम मे सब नंगे’ या न्यायाने काँग्रेस अथवा नंतर सत्तेत आलेल्या अन्य पक्षांनी आजवर कधीही, केंद्रीय तपासयंत्रणांचा असा राजकीय विरोधकांना जेरीस आणण्यासाठी वापर केला नव्हता, पण आता तो होऊ लागलेला आहे.

आणि तोही अगदी मोठ्याच प्रमाणावर! ज्यांना लोक भ्रष्ट म्हणून ओळखत होते, ते भाजपमध्ये आले आणि त्यांच्यामागचा तपासयंत्रणांचा ससेमिरा संपला. अर्थात, या अशा ‘शांत झोप लागण्यासाठी’ भाजपमध्ये यावे लागणाऱ्यांची संख्या बरीच असल्याने या अशा नवागतांचाच भरणा भाजपमध्ये वाढू शकतो हेही खरे, पण आपला तो विषय नाही.

विरोधी पक्षांनी टिकायचे आणि वाढायचे कसे, यासंदर्भात ‘आप’ कडे पाहावे लागेल- कारण ज्या पक्षातून एकही आमदार फुटून भाजपकडे गेलेला नाही, असा डाव्या पक्षांखेरीज दुसरा पक्ष आाप हाच आहे, बाकीच्या साऱ्याच पक्षांमधून गळती झालेली आहे. काँग्रेसमधून तर मोठ्या संख्येने ‘गयारामां’चे गमन झालेले आहे. भाजपकडे निधी भरपूर आणि केंद्रीय यंत्रणाही अधीन, त्यामुळे तेथे आलेल्यांचे छान चालले असावे. पण त्याआधीची अनेक वर्षे यातले काहीच नसतानापासून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना भाजपने कायम राखले आहे. आजचे ‘आयाराम’ उद्या भाजपची सत्ता गेल्यास भाजपही सोडतील.

आता परदेशात जाऊन भारताची केलेली बदनामी’ या विषयाबद्दल. त्या बाबतीत विद्यमान पंतप्रधान आघाडीवर आहेत! देशात असताना जवाहरलाल नेहरू अथवा त्यांच्या घराण्यातील कोणा ना कोणाला ते दूषणे देतच असतात. पण परदेशांतही, आपण सत्तेवर येण्याआधी भारतात कसे काहीच झाले नव्हते, भारताची प्रगती कशी २०१४ मध्ये स्वत:स पंतप्रधानपद मिळाल्यानंतर सुरू झाली, हे तर त्यांनी अनेकदा सांगितले आहे.

मोदी चोवीस तास, एकही सुट्टी न घेता काम करतात हे खरे, त्यांनी बरेच काही करून दाखवले आहे- विशेषत: पायाभूत प्रकल्पांचा विकास मोदी यांच्या काळात झपाट्याने होतो आहे. पण ते अथवा त्यांची ती कार्यक्षम प्रचारयंत्रणा यांनी सत्तर वर्षांत काहीच झालेले नसल्याचे वारंवार सांगणे मात्र तथ्यहीन आहे. विकास ही निरंतर प्रक्रिया असल्यामुळे, १९४७ पासून विकास होतोच आहे आणि मोदींनी पद सोडल्यानंतरही होत राहणार आहे.

मी कधीही परदेशी राष्ट्रप्रमुख वा सरकारप्रमुखाला भारतात येऊन, त्यांच्या देशातील राजकीय प्रतिपक्षाबद्दल उणेदुणे बोलताना पाहिलेले नाही. मग आपलेच पंतप्रधान म्हणा किंवा विरोधी पक्षातील राहुल गांधी म्हणा… अशी अशोभनीय वक्तव्ये परदेशांमध्ये जाऊन का करतात?

यात खरे नुकसान होते आहे ते नागरिकांचे, यात काहीही चुकले नसलेल्या सामान्यजनांचे. ज्या संसदेला आपण ‘लोकशाहीचे मंदिर’ मानतो, ती आठवडाभर कामकाजाविना राहाते. चर्चा होत नाहीत. हे का? तर अहंकारापायी… पुढे हेच राजकारण तातडीने अपात्र ठरवण्यापर्यंत गेल्याचे आपण पाहातो आहोत. या अशा कारवायांमुळे अहंकार जरूर सुखावतील, पण संसद कशी काय चालेल?

( समाप्त )

मराठीतील सर्व विशेष लेख बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rahul gandhi is at focus of todays politics but when will common citizen will come asj
First published on: 28-03-2023 at 10:34 IST