ठाणे : राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार आणि अजित पवार समर्थक असे दोन गट पडले आहेत. ठाण्यातील राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक नेमके कोणत्या गटात आहे, हे स्पष्ट होत नव्हते. परंतु बुधवारी शरद पवार यांच्या बैठकीत २० माजी नगरसेवक उपस्थित असल्याचे कळते आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाल्यानंतर अजित पवार यांनी शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. दोन्ही गटाने बुधवारी वेगवेगळ्या ठिकाणी बैठक आोजित केली होती. यामध्ये शरद पवार यांची मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण सभागृहात आणि अजित पवार यांच्या गटाची मंत्री छगन भुजबळ यांच्या वांद्रे येथील संस्थेच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती. या दोन बैठकांपैकी कोणत्या बैठकीस जावे अशी संभ्रमावस्था राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये होती.

हेही वाचा – आव्हाड यांच्या मतदारसंघात अजित पवार यांना शुभेच्छा देणारे फलक

शरद पवार यांना पाठिंबा देण्यासाठी आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या नेतृत्वाखाली ठाणे, कळवा, मुंब्रा येथील हजारो कार्यकर्त्यांना घेऊन ९१ बसगाड्या मुंबईला रवाना झाल्या होत्या. अजित पवार यांच्या समर्थकांचीही वाहने वांद्रेच्या दिशेने रवाना झाली होती. ठाण्यात राष्ट्रवादीचे ३४ तसेच एक अपक्ष असे ३५ नगरसेवकांचे संख्याबळ होते. त्यातील पाच माजी नगरसेवकांनी काही महिन्यांपूर्वीच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. तर मुंब्य्रात मुंब्रा विकास आघाडी स्थापन करण्यात आली असून त्यात राष्ट्रवादीचे आठ माजी नगरसेवक असल्याचा दावा केला जात आहे. ठाण्यातील २० माजी नगरसेवकांची साथ आव्हाडांना असल्याचा दावा त्यांच्या समर्थकांनी केला. तर २० पैकी १९ प्रभाग अध्यक्षदेखील आव्हाड यांच्यासोबत असल्याचे सांगितले गेले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 former corporators of ncp from thane attended sharad pawar meeting ssb