कल्याण – डोंबिवली परिसरात कुटुंबीयांसमवेत राहत असलेल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळून नेऊन तिच्यावर एक्सप्रेसमधून प्रवास करताना कसारा ते अकोला प्रवासा दरम्यान लैंगिक अत्याचार करणाऱ्या अकोला जिल्ह्यातील शेकापूर गावातील तरूणाला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी दिली.
गजानन सदाशिव चव्हाण (२०) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे. तो मूळचा अकोला जिल्ह्यातील शेकापूर गावचा रहिवासी आहे. मागील दहा दिवसापूर्वी डोंबिवली परिसरात कुटुंबीयांसमवेत राहत असलेल्या एका १६ वर्षाच्या मुलीला गजानन चव्हाण याने फूस लावून आपल्या गावी पळवून नेले. या अपहरण प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. या मुलीला गजानन कल्याण रेल्वे स्थानकातून एक्सप्रेसमधून अकोला जिल्ह्यातील आपल्या गावी नेत होता. एक्सप्रेसमधून प्रवास करत असताना गजानन याने अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. अकोला येथे गेल्यानंतर तरूणाच्या पालकांना काय घडले हे माहिती नव्हते. ही मुलगी कोण याचे उत्तर तो देऊ न शकल्याने कुटुंबीयांनी त्याला घरातून हाकलून दिले.
तो पीडित मुलीला घेऊन अकोला रेल्वे स्थानकात आला. त्याने मुलीला अकोला रेल्वे स्थानकात परतीच्या प्रवासासाठी सोडून दिले. स्वत: घरी निघून गेला. पीडित अल्पवयी मुलगी अकोला रेल्वे स्थानकात एकटीच असल्याचे अकोला रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास आल्यावर पोलिसांनी तिची चौकशी केली. त्यानंतर तिच्याबाबतीत घडलेला तिन पोलिसांसमोर कथन केला. याप्रकरणाची अकोला रेल्वे पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. ही मुलगी कल्याण परिसरातील असल्याने याप्रकरणाची माहिती कल्याण लोहमार्ग पोलिसांना दिली. हा गुन्हा कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याकडे वर्ग केला. अकोला पोलिसांच्या सहकार्याने पीडित मुलगी सुखरूप डोंंबिवलीतील घरी परतली.
कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरी कांदे यांनी याप्रकरणातील तरूणाचा शोध घेण्यासाठी तपास पथक तयार केले. लोहमार्ग पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे मुलीचे अपहरण करणारा इसम हा अकोला जिल्ह्यातील शेकापूर येथील रहिवासी असल्याचे निष्पन्न केले. त्यानंतर त्याच्या गाव हद्दीत पाळत ठेऊन त्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी स्थानिक पोलिसांच्या साहाय्याने अटक केली. या तरूणावर कल्याण लोहमार्ग पोलिसांनी अपहरण, जबरदस्तीने लैंगिक अत्याचार, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा या कायद्याने गुन्हे दाखल केले आहेत.
याप्रकरणाचा तपास लोहमार्ग पोलिसांनी सुरू केला आहे. न्यायालयाने गजानन चव्हाण याला पोलीस कोठीडी सुनावली आहे. सबळ पुरावे जमा करून या तरूणाला कठोर शिक्षा होईल यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.