बदलापूरः सोमवारी अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडत संपन्न झाल्यानंतर बुधवारी दोन्ही पालिकांच्या प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिला आरक्षण सोडत काढण्यात आली. या सोडतीनंतर निवडणुकांचे चित्र जवळपास निश्चित झाले असून अनेकांनी तयारीला सुरूवात केली आहे. काही प्रभाग महिलांसाठी आरक्षित झाल्याने इच्छूक पुरूष उमेदवारांनी पत्नीसाठी तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. दोन्ही शहरात आरक्षण सोडतीवर संमिश्र प्रतिक्रिया उटमत आहेत.

सुमारे १० वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांनंतर पहिल्यांदाच होणाऱ्या पालिका निवडणुकांसाठी अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील राजकीय पदाधिकारी सज्ज झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून निवडणुकांच्या पूर्वतयारीचा कार्यक्रम सुरू झाला आहे. काही दिवसांपूर्वी दोन्ही शहरातील प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाल्या होत्या. त्यावर सूचना आणि हरकतींनंतर नुकत्याच दोन्ही शहरांच्या अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्यात आला. त्यांना मंजुरी मिळाल्यानंतर शहरातील प्रभाग आरक्षणाची तयारी पालिका प्रशासनाने केली होती. त्यातच सोमवारी राज्यातील नगर परिषदा, नगर पंचायतींचे नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले.

या आरक्षणानुसार अंबरनाथ पालिकेचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलांसाठी तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष पद हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) महिलांसाठी आरक्षित झाले आहे. या निर्णयानंतर दोन्ही शहरातील महिला पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. मात्र नगराध्यक्ष पदासाठी गुडघ्याला बांशिंग बांधून बसणाऱ्या पुरूष इच्छुकांना मोठा धक्का बसला आहे. दहा वर्षांपूर्वी ज्यांची नगराध्यक्ष पदाची संधी हुकली अशा वजनदार माजी नगरसेवकांना पुन्हा काही वर्षे या पदासाठी वाट पाहावी लागणार आहे.

त्याच धर्तीवर बुधवारी दोन्ही नगरपालिकांच्या प्रभाग आरक्षणाची सोडत संपन्न झाली. कल्याण आणि उल्हासनगर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही सोडत पार पडली. यावेळी अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि सर्व आरक्षित प्रभागातील तसेच सर्वसाधारण महिलांच्या आरक्षणाची सोडत संपन्न झाली. या सोडतीनंतर दोन्ही शहरांमध्ये संमिश्र प्रतिक्रिया आल्या. मात्र या आरक्षण सोडतीनंतर आता निवडणुकीचे चित्र मोकळे झाले असून उमेदवारांची तयारी सुरू झाली आहे.

बदलापूर

कुळगाव बदलापूर नगरपालिकेत एकूण ४९ जागांसाठी २४ प्रभाग असणार आहेत. त्यातील २७ जागा खुल्या प्रवर्गासाठी, त्यातील १३ जागा महिलांसाठी, अनुसूचित जातीसाठी ७ जागा त्यातील ४ जागा महिलांसाठी, अनुसूचित जमातीसाठी २ जागा त्यातील एक जागा महिलांसाठी असणार आहे. नागरिकांच्या खुल्या प्रवर्गासाठी १३ जागा असून त्यातील ७ जागा महिलांसाठी घोषीत करण्यात आल्या आहेत.

अंबरनाथ

अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात ५९ जागा असून २९ प्रभाग आहेत. त्यातील अनुसूचित जातीसाठी ८ जागा आरक्षित असून त्यापैकी ४ जागा महिलांसाठी आहेत. अनुसूचित जातीसाठी दोन जागा असून त्यापैक १ जागा महिलेसाठी आरक्षित आहे. नागरिकांचा मागास प्रवर्ग यासाठी १६ जागा आरक्षित असून त्यातील ८ जागा महिलांसाठी आरक्षित आहेत. तर ३३ जागा सर्वसाधारण असून त्यातील १७ जागा या महिलांसाठी आरक्षित आहेत.