अंबरनाथः अनधिकृत शाळांचा विषय अंबरनाथ तालुक्यात चर्चेत असताना एका खासगी शाळेतील लिपीकाने आपणच मुख्याध्यापक असल्याचे भासवत शाळेच्या विद्यार्थ्यांचे शालेय शुल्क गोळा करत आपल्याच खात्यात जमा करून अपहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी येथील ओम साई इंग्लिश शाळेच्या लिपिकाने हा प्रताप केला आहे. याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबरनाथ तालुक्यात गेल्या काही वर्षात झपाट्याने नागरिकरण झाले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागातही अनेक जण स्थलांतरीत झाले आहेत. अंबरनाथ तालुक्यात आणि शेजारच्या कल्याण तालुक्यात अनेक ठिकाणी चाळी उभ्या राहिल्या आहेत. या चाळींमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती राहते. गरजेनुसार इतर दुकानांसह शैक्षणिक संस्थाही येथे उभ्या राहिल्या आहेत. अशाच एका शाळेत काही दिवसांपूर्वी साचलेल्या पाण्यात विद्यार्थी शिकत असल्याचे दिसून आले होते.
अंबरनाथ तालुक्यातील कर्जत काटई मार्गावर नेवाळी नाका येथे ओम साई इंग्लिश स्कुल नावाची शाळा आहे. या शाळेते लिपिक पदावर कार्यरत असलेले मृगमल्ल अण्णामलई यांनी विद्यार्थांचे शैक्षणिक शुल्क घेतांना, शाळेत भेट देणाऱ्या पालकांना आपणच शाळेचे मुख्याध्यापक असल्याचे भासवले. शाळेला अतिरिक्त कर भरावा लागत असल्याचे सांगत पालकांकडून शैक्षणिक शुल्क गोळा केले जात होते.
मात्र शाळेचे शैक्षणिक शुल्क गोळा करतांना ते शाळेच्या खात्यात जमा झाले नाही. तर आरोपीने ऑनलाइन तसेच रोख रक्कम स्वरूपात टप्प्या टप्प्याने हे शुल्क स्वतःच्या खात्यात जमा केले. या काळात ३४ लाख ४५ हजार रूपयांची रक्कम आरोपीने स्वतःच्या बॅंक खात्यात जमा केली. शाळा प्रशासनाच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी याबाबत तपास सुरू केला. शाळेचे संचालक प्रविण अलपुरीया यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी याविरूद्ध हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर शैक्षणिक संस्थेचे शुल्क अपहार केल्याप्रकरणी आरोपी मृगमल अण्णामलई याच्या विरोधात हिललाईन पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे.