अंबरनाथ: परिवहन विभागाची कारवाई सुरू असताना पोलिसांना पाहून कारवाई टाळण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या एका चार चाकी चालकाने बेदरकार गाडी चालवल्याने अंबरनाथ पश्चिमेत अपघात झाला. सुदैवाने या अपघातात शालेय विद्यार्थ्यांना दुखापत झाली नाही. थोड्या पैशांसाठी लहान मुलांचा जीव धोक्यात घालणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध संताप व्यक्त होतो आहे. अशा अवैध वाहन चालकांवर कडक कारवाईची मागणी होते आहे.

गेल्या दोन दिवसांपासून कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी कल्याण परिमंडळ क्षेत्रात शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या अवैध वाहन चालकांवर कारवाई सुरू केली आहे. या कारवाईदरम्यान अंबरनाथ शहरात एक अपघात झाला. अंबरनाथ पश्चिमेकेतील फातिमा शाळेजवळ परिवहन विभागाची कारवाई सुरू असताना अधिकाऱ्यांना पाहून एक चार चाकी चालकाने विरुद्ध दिशेने वाहन चालवले. त्याची समोर येणाऱ्या रिक्षाला धडक बसली.

या अपघातात चार चाकीत असलेल्या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली. तर रिक्षातील प्रवाशांनाही या धडकेमुळे दुखापत झाली. परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने वाहन थांबवत विद्यार्थ्यांची चौकशी केली. तसेच संबंधित वाहन चालकावर कारवाई केली. या अपघातानंतर शालेय विद्यार्थ्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहन चालकांवर संताप व्यक्त होतो आहे.

कोणत्याही परवानगी शिवाय अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांच्या वर्तणुकीवर पालकही चिंतेत आहेत. अवघ्या काही रुपयांच्या दंडाच्या कारवाईला टाळण्यासाठी वाहन चालकाने केलेला हा प्रताप संतापजनक आहे, अशी ही प्रतिक्रिया पालकांमधून उमटते आहे.

पालकांनीही चौकशी करावी

आपल्या पाल्यांना शाळेत पोहोचवण्यासाठी ज्या वाहनांचा आपण वापर करत आहोत तो वाहन चालक, त्याचे वाहन अधिकृत आहे का याची चौकशी करावी असे आवाहन परिवहन विभागाकडून केले जाते आहे. गेल्या काही दिवसात शालेय विद्यार्थ्यांना रिक्षा, चार चाकी व्हॅन अशा वाहनांमध्ये कोंबून नेण्याचेही प्रकार दिसून आले आहेत. विद्यार्थ्यांचे जीविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीची कोणतीही वाहतूक प्रतिबंधात्मक कारवाईला पात्र आहे. मात्र पालकांनीही यात सजग राहावे असे आवाहन करण्यात येते आहे. तर वाहतूक पोलीस तसेच परिवहन विभागाने शाळेच्या परिसरात अशी कारवाई वाढवावी अशी ही मागणी पालकांकडून होते आहे.