डोंबिवली – बुधवारी सकाळी सात वाजण्याच्या दरम्यान डोंबिवली रेल्वे स्थानकात कामावर वेळेत जाण्यासाठी आणि लोकल पकडण्यासाठी प्रत्येक प्रवाशाची धडपड सुरू होती. त्यात मुंबईकडे जाणाऱ्या लोकल उशिराने धावत होत्या. एवढ्यात सीएसएमटीला कसाऱ्याहून येणारी एक अतिजलद लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात आली. जोर लावून प्रवासी डब्यात घुसत होते. तेवढ्यात एका प्रवाशाचा लोकलमध्ये चढताना पाय घसरून तो फलाट आणि लोकलचे पायदान यामध्ये पडला. त्याच्या अंगावर आणखी दोन प्रवासी पडले. पडल्यानंतर त्यांचे पाय फलाट आणि लोकल दरवाजाखाली पायदानाखाली अडकले. लोकल सुरू होण्यापूर्वी एका जागरूक प्रवाशाने त्या प्रवाशाला फलाटाच्या दिशेने ओढले आणि पुढील अनर्थकारी घटना टळली.
बुधवारी सकाळची ७.२८ मिनिटांची डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवरील ही घटना आहे. सकाळची बदलापूर-सीएसएमटी डोंबिवली रेल्वे स्थानकात येणारी ७.१८ ची, त्या पाठची कल्याण-सीएसएमटी ७.२५ ची जलद लोकल उशिराने धावत होत्या. या खोळंब्यामुळे कसाऱ्याहून सीएसएमटीकडे ७.२८ मिनिटांनी धावणारी अति जलद कसारा लोकल उशिराने धावत होती. कसारा लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाटाच्या दिशेने येत असताना वास्को द गामा पाटणा एक्सप्रेस दिव्याकडून रेल्वे मार्गिका पाचला छेदून कल्याण दिशेने धावत होती. त्यामुळे कसारा लोकल सिग्नल जवळ थांबली होती.
पाटणा एक्सप्रेस कल्याण दिशेने निघून गेल्यावर अति जलद कसारा लोकल डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक पाचवर आली. या लोकलमध्ये ७.१८, ७.२५ च्या जलद लोकलचे खोळंबलेले प्रवासी चढण्याचा प्रयत्न करू लागले.
मागच्या दोन लोकलचे प्रवासी एकावेळी अति जलद ७.२८ च्या कसारा लोकलमध्ये मिळेल तसे घुसून चढू लागले. कसारा लोकल अतिजलद असल्याने ५५ मिनिटात सीएसएमटीला पोहचते. प्रत्येक प्रवासी जोर लावून लोकलमध्ये चढत होता. तेवढ्यात एक प्रवासी लोकलमध्ये चढत असताना दरवाजातील पायदानावर घसरून फलाटावर पडला. या प्रवाशाचे पाय फलाट आणि दरवाजाखालील पायदानात अडकले.
या पडलेल्या प्रवाशाच्या अंगावर पडून आणखी दोन प्रवासी पडले. लोकल सुरू झाली असती तर हे तिन्ही प्रवासी फरफटत जाऊन नंतर रेल्वे मार्गात पडले असते. या लोकलमध्ये चढण्याच्या प्रयत्नात असलेल्या जागरूक प्रवासी श्रीकांत खुपेरकर यांनी वेळ न दवडता त्यांना पायदानात अडकलेल्या भागातून फलाटाच्या दिशेने खेचले. खुपेरकर यांच्यानंतर इतर प्रवाशांनी इतर दोन प्रवाशांना खेचून बाकड्यावर बसविले. रेल्वे सुरक्षा जवानांना तातडीने ही माहिती खुपेरकर यांनी दिली. रेल्वेचे कमांडो घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रवाशांना वैद्यकीय उपचाराची गरज विचारली. एक प्रवाशाच्या पायाला खरचटले होते. इतर प्रवाशांनाही मुका मार लागला होता आणि खरचटले होते.
या प्रवाशांनी आम्ही खासगी उपचार करून घेतो असे जवानांना सांगितले. तोपर्यंत कसारा लोकलला लोंबकळत प्रवाशांनी प्रवास सुरू केला होता. अलीकडे लोकल मार्गातील मेल, एक्सप्रेस पुढे काढण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे लोकल विलंबाने धावततात अशा तक्रारी रेल्वे प्रवासी संघटनांकडून रेल्वेच्या वरिष्ठांकडे करण्यात येत आहेत.
