डोंबिवली रेल्वे स्थानकात दिवा बाजुने पादचारी पुलाचे काम सुरू करण्यात आल्याने फलाट क्रमांक तीन आणि चार वरील छत काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे उन्हे चढू लागल्यावर प्रवाशांना रणरणत्या उन्हात उभे राहून लोकल पकडावी लागते. याशिवाय पुलाच्या कामासाठी खड्डे खोदल्याने या ठिकाणच्या निमुळत्या जागेत उभे राहून प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत.

अशाप्रकारची प्रवाशांची हालत असताना कल्याण लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे प्रचारक मात्र हातात फलक घेऊन सावलीत उभे राहून मूकपणे प्रचार करतानाचे चित्र आहे. डोंंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक पाचवर दिवा बाजुने गेल्या दोन वर्षापासून फलाटावर छत नाही. त्यामुळे प्रवाशांना उन, पावसात उभे राहून प्रवास करावा लागतो.

हेही वाचा… माणकोली परिसरातील ग्रामस्थ धूळ, वाहन कोंडीने हैराण; पोहच रस्ते तयार न करताच पूल सुरू केल्याने नाराजीचा सूर

याविषयी लोकप्रतिनिधींच्याकडे तक्रारी करूनही त्याची दखल दोन वर्षात घेतली गेलेली नाही. त्यामुळे प्रवासी उमेदवारांचा प्रचार करणाऱ्या प्रचारकांना आता तुमच्या उमेदवारांना डोंंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांंक पाचवर आणि ज्या ठिकाणी छत नाही त्याठिकाणी छत बसविण्यास सांगा, अशा सूचना करताना दिसत आहेत. प्रचारकही हसतमुखाने आम्ही तातडीने तुमचा निरोप आमच्या उमेदवारांना देतो, असे सांगून आमच्या उमेदवारांना मतदान करा, असे हळूच सांंगत आहेत.

हेही वाचा… कोकण रेल्वेची विलंबयात्रा… मतदानाला पोहोचण्याबाबत शंका!

डोंबिवली रेल्वे स्थानक सर्वाधिक वर्दळीचे स्थानक आहे. या स्थानकात सतत वेगवेगळी प्रवासी सुविधेची कामे काढली जात असल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. आता पुलाच्या कामामुळे प्रवाशांना अरूंद जागेत उभे राहून लोकल पकडावी लागते. या निमुळत्या जागेतून गर्दीमधून प्रवाशांंना वाट काढत जाण्यास मार्ग राहत नाही. त्यामुळे अनेक प्रवाशांची कोंडी होत आहे. विशेष म्हणजे ज्याठिकाणी छताचे पत्रे काढण्यात आले आहेत. तेथे महिला प्रवाशांचे डबे येतात. तेथे महिला वर्ग अधिक असल्याने पुरूष प्रवाशांना वळसा घेऊन इच्छित स्थळी जावे लागते.