कल्याण : कल्याणमधील आचार्य अत्रे रंगमंदिरात शनिवारी रात्री साडे आठ वाजता स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकाचा प्रयोग होता. परंतु, काही संघटनांनी तीव्र विरोध केल्यामुळे नाटकाच्या आयोजकांनी पोलिसांच्या सूचनेप्रमाणे नाटक सुरू होण्यास एक तास असताना नाट्यगृह, प्रेक्षक सुरक्षा, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून नाट्यप्रयोग रद्द करण्याचा निर्णय घेतला.

कल्याणमध्ये ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकाचा हा पहिलाच प्रयोग होता. प्रेक्षकांनी या नाटकाची उत्स्फूर्तपणे आगाऊ तिकीट खरेदी केली होती. कल्याणमध्ये नाटकाचा प्रयोग असल्याने नाटकाची रंगमंचावरील व्यवस्था करण्यासाठी दुपारपासून मुंबई परिसरातून नाटकाचे सामान वाहू वाहने दाखल झाली होती. वाहतूक कोंडीमुळे पुणे भागात राहणारे कलाकार दुपारीच कल्याणमध्ये दाखल झाले होते.

हा नाटकाचा प्रयोग होऊ देणार अशी भूमिका घेत काही संघटनांनी एक पत्राव्दारे स्थानिक पोलिसांना कळविले होते. शनिवारी दुपारपासून विरोध करणारे संघटनांचे कार्यकर्ते नाट्यगृह परिसरात दाखल होण्यास सुरूवात झाली होती. नाटकाला होणारा विरोध पाहून पोलिसांनी नाटक आयोजकांचे प्रतिनिधी यांच्याशी दुपारी चर्चा केली आणि नाटकाचा प्रयोग रद्द करण्याची सूचना केली. नाटकाचा प्रयोग केला तर याठिकाणी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, असे सूचित करण्यात आले.

नाटक आयोजकांचे नाटकाचा प्रयोग करण्यासाठी संघटनांच्या प्रतिनिधींशी बोलून काही मार्ग निघतो का यासाठी प्रयत्न सुरू होते. हे सर्व प्रयत्न असफल झाले. शनिवारी संध्याकाळी साडे सात वाजण्याच्या दरम्यान आयोजकांनी काही संघटनांनी प्रक्षोभक आंदोलनाचा दिलेला इशारा विचारात घेऊन नाट्यगृह, कलाकार, प्रेक्षकांची सुरक्षितता, सामाजिक गोष्टीचे भान ठेऊन ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकाचा

प्रयोग रद्द करत असल्याचे जाहीर केले. प्रेक्षकांना तिकीटाचे पैसे परत केले जाणार आहेत. बीएमएस पध्दतीने तिकीट काढलेल्या प्रेक्षकांचे तिकीट शुल्क मंगळवार, बुधवारपर्यंत त्यांच्या बँक खात्यात जमा केले जाईल, असे आयोजकांनी जाहीर केले आहे. रसिक प्रेक्षकांना झालेल्या गैरसोयीबद्दल सावरकर दर्शन प्रतिष्ठानने दिलगिरी व्यक्त केली आहे.

यापूर्वी पुणे, मुंबईत बोरिवली येथे झालेल्या या नाटकाच्या प्रयोगाला काही संघटनांनी प्रखर विरोध केल्याने प्रयोग रद्द करावे लागले होते. रंगभूमी प्रयोग परीनिरीक्षक मंडळाने दोन ते तीन वेळा हे नाटक पाहून या नाटकाला कायमस्वरूपी योग्यता प्रमाणपत्र दिले आहे, असे नाट्यसंपदा कला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

सावरकर दर्शन प्रतिष्ठानने निर्मित केलेले हे नाटक नाट्यसंपदा कला मंच सहनिर्मित आहे. वीर सावरकर लिखित ‘संगीत संन्यस्त खड्ग’ नाटकाचे दिग्दर्शन हृषिकेश जोशी यांचे आहे. निर्माता रवींद्र माधव साठे, सहनिर्माता अनंत वसंत पणशीकर आहेत. ३० कलाकारांचा संच या नाटकात आहे. बौध्द समाज आणि अनुयायी यांच्या भावना दुखावतील असे संवाद आणि दृश्ये या नाटकात आहेत, असा विरोध करणाऱ्या संघटनांचा आक्षेप आहे. अत्रे रंगमंदिराच्या व्यवस्थापनाने संगीत सन्यस्त खडग नाटकाचा प्रयोग रद्द झाल्याचे सांगितले.