Thane news:ठाण्यातील माजिवडा भागात एका महिलेला तिच्या पतीच्या मारहाणी पासून वाचविण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर एका व्यक्तीने सिलिंडरचा पाईप पेटवून पोलिसांच्या दिशेने आगीच्या ज्वाला आणि दगडफेक केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला आहे. याप्रकरणी संबंधित व्यक्तीविरोधात कापूरबावडी पोलीस ठाण्यात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. घटनेत पोलिसांच्या दुचाकीला आग दुचाकीचे लागून नुकसान झाले आहे.
ठाणे (Thane)येथील माजिवडा भागातील साईनाथ नगर परिसरात संबंधित व्यक्ती त्याच्या पत्नी आणि आईसोबत राहतो. रविवारी तो त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला बेदम मारहाण करत होता. पत्नीला मारहाण करताना त्याच्या हातामध्ये चाकू होता. याबाबतची माहिती त्याच्या आईने पोलीस नियंत्रण कक्षाला दिली. त्यामुळे कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सुरेश भिल आणि पोलीस शिपाई उमेश साळुंखे हे त्याठिकाणी दुचाकीने निघाले. पोलीस घटनास्थळी पोहचताच, त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. पोलिसांनी महिलेला विचारले असता, तिने पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलीस येण्यापूर्वी त्याने तिला जाळून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु लाईटर पेटले नसल्याने तिचा जीव वाचला. त्यानंतर
पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरु केला. त्यामुळे त्याने दगड तसेच मिळेल त्या वस्तू पोलिसांच्या दिशेने फेकण्यास सुरुवात केली. (Thane news) तो दगड उचलू लागल्याने पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ एका टेम्पोचा आडोसा घेतला. त्याचवेळी त्या व्यक्तीने घरात प्रवेश करून शेगडीपासून विलग केलेला सिलिंडर बाहेर आणला. त्याने त्याच्याकडील लाईटरने गॅस सिलिंडर जोडलेल्या पाईपच्या दर्शनी भागात पेटवून आगीच्या ज्वाला पोलिसांच्या दिशेने सोडल्या.
त्यानंतर सिलिंडर स्थानिक रहिवाशांच्या अंगावर फेकण्याची धमकी देऊ लागला. त्यामुळे नागरिक सैरावैरा पळू लागले. पोलिसांनी त्यांच्या संरक्षणासाठी त्यांच्या दुचाकीचा आडोसा घेतला. त्यानंतर त्या व्यक्तीने थेट त्या दुचाकीलाच पेटवून दिले. पोलिसांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळविले.
हत्येच्या प्रयत्ना प्रकरणी गुन्हा दाखल
या प्रकारानंतर त्या व्यक्तीने तेथून पळ काढला. याबाबतची माहिती कापूरबावडी पोलिसाच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. तसेच ठाणे महापालिकेचे अग्निशमन दलाचे पथक देखील तेथे पोहचले. याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे त्या व्यक्तीविरोधात सार्वजनिक मालमत्ता एस्तऐवज अधिनियम, १९८४ – ४ आणि भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.), २०२३ चे कलम १०९, १२१ (१), १३२, ३२४ (३), ३२४ (४) प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. त्यामुळे त्याच्याविरोधात जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.