बदलापूरः बदलापूरसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील जवळपास सर्वच तालुक्यांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत शुक्रवारी वाढ नोंदवली गेली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे उल्हास नदी किनारी असलेला चौपाटी परिसर पाण्याखाली गेला होता. चौपाटीवर असलेले खेळणी आणि परिसर पाण्याखाली गेल्यानंतर बदलापूर शहरातील सखल भागात राहणाऱ्या नागरिकांची धाकधूक वाढत असते.
मे महिन्यात सुरू झालेला पाऊस पुन्हा नव्याने जोर धरतो आहे. सुरूवातीला पश्चिम विक्षोभ आणि नंतर पूर्व मोसमी पावसाने राज्याला झोडपून काढले होते. त्यामुळे कधी नव्हे ते मे महिन्यातच बदलापुरसारख्या शहरात पूरस्थिती निर्माण झाली होती. २६ मे रोजी बदलापुरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने इशारा पातळी ओलांडली होती. जुलै महिन्यात निर्माण होणारी स्थिती पहिल्यांदाच मे महिन्यात निर्माण झाली. त्यामुळे नागरिकांसह शासकीय यंत्रणाही कामाला लागल्या होत्या. त्यानंतर पावसाची संततधार सुरू होती. मात्र नदीच्या पाणी पातळी लक्षणीय वाढ नोंदवली गेली नव्हती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून सुसू असलेल्या पावसामुळे उल्हास नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ नोंदवली गेली आहे.
शुक्रवारी सकाळपासूनच ठाणे आणि शेजारच्या रायगड जिल्ह्यात संततधार पाऊस सुरू होता. मध्येच पावसाची मोठी सर येत होती. त्यामुळे अचानक विविध ठिकाणी, रस्त्यांवर पाणी साचत होते. शुक्रवारी अंबरनाथ तालुक्यातील ग्रामीण भाग, बदलापूर आणि रायगड जिल्ह्यातील माथेरान, नेरळ, कळंब, कर्जत, खोपोली या भागात पडणाऱ्या पावसामुळे उल्हास नदीच्या उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली. गुरूवारी दुपारी १२ च्या सुमारास उल्हास नदीची पाणी पातळी १३ मीटरवर पोहोचली होती. त्यावेळी बदलापूर शहर आणि आसपासच्या परिसरातही पाऊस सुरू होता. रायगड जिल्ह्यात पाऊस होत असल्याने यात वाढ होण्याची भीती होती. दुपारी एकच्या सुमारास उल्हास नदी किनारी असलेला चौपाटी परिसर पाण्याखाली गेला होता. यंदाच्या पावसाळ्यात तिसऱ्यांदा हा परिसर पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे येथे असलेला पदपथ, खेळणी पाण्याखाली गेली होती. त्यामुळे पाणी पाहण्यासाठी बघ्यांची गर्दीही होत होती. पाण्याचा अंदाज घेण्यासाठी स्थानिक कुळगाव बदलापूर नगरपरिषदेचे अधिकारी, अग्नीशमन दलाचे जवान आणि स्थानिक पोलिसांची गस्त सुरू होती.
रस्त्यांवर पाणीच पाणी
संततधार पावसामुळे कल्याण बदलापूर रस्त्यावर विविध ठिकाणी पाणी साचत होते. फॉरेस्ट नाका ते बदलापूर प्रवेशद्वारापर्यंत बदलापुरकडे जाणाऱ्या मार्गिकेवर नाल्यांचा अभाव आहे. त्यामुळे या ठिकाणी पाणी साचते. त्यामुळे शेजारच्या इमारतींमध्ये राहणारे रहिवाशी आणि पादचाऱ्यांचा मार्गही बंद होतो. बदलापुरातील भुयारी मार्गात दुपारच्या सुमारास वाहनांची संख्या वाढल्याने कोंडी झाली होती. तर मासळी बाजाराशेजारचा स्थानकाजवळचा लहानसा भुयारी मार्ग पाण्यामुळे बंद झाला होता.