ठाणे : दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना ठाणे जिल्ह्याचा कारभार हाकत असल्याने २००९ मध्ये ठाणे लोकसभा लढविण्याची सूचना केली होती. पंरतु एकनाथ शिंदे यांनी लोकसभा निवडणूक लढण्यास नकार दिला होता, ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली. तिथे उमेदवार जाहीर होत नव्हता असा गौप्यस्फोट ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला. शिंदे यांनी नकार दिल्यानंतर बाळासाहेबांनी मला संपर्क साधला. ‘राजन लोकसभा तुला लढायची आहे, असे म्हणाले. ‘साहेब.. आपला आदेश’ इतकेच मी म्हणालो. कोणीतरी मर्द सापडला, ठाण्याची जागा लढण्यासाठी असे बाळासाहेब त्यावेळी म्हणाले. पण एकनाथ शिंदे त्यावेळी आडवे आले आणि राजन विचारे नको सांगू लागले. असा दावाही त्यांनी केला.

लोकसभेची रणधुमाळी देशात सुरू आहे. महायुतीचा ठाणे लोकसभेचा तिढा अद्यापही सुटलेला नाही. शिवसेना आणि भाजपमध्ये या जागेवरून रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराचे घोडे अडल्याची चर्चा सुरू आहे. तर दुसरीकडे इंडिया आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजन विचारे यांना संधी दिली आहे. राजन विचारे यांनी त्यांच्या इंस्टाग्राम या समाजमाध्यमावर एक ‘रील’ प्रसारित केली आहे. या ‘रील’मध्ये त्यांनी एका मुलाखतीचा काही अंश प्रसिद्ध केला आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, २००९ मध्ये लोकसभेची निवडणूक जाहीर झाली होती.

हेही वाचा…जितेंद्र आव्हाड म्हणाले, सुप्रिया सुळेंना राजकीय फायदा घ्यायचा असता तर…

शिवसेनेने राज्यातील सर्व ठिकाणाचे उमेदवार जाहीर केले होते. परंतु ज्या ठाण्याने शिवसेनेला पहिली सत्ता दिली. तेथील उमेदवारी जाहीर झाली नव्हती. ठाण्यातून लोकसभा लढवायला कोणीही तयार होत नव्हते. त्याचे दु:ख बाळासाहेबांना झाले होते. एकनाथ शिंदे यांना विचारले तुम्ही लोकसभा लढवा, कारण तुम्ही जिल्ह्याचा कारभार हाकत होते. परंतु त्यांनी साहेबांना नकार दिला. या जागेवर समोरील पक्षाचे उमेदवार संजीव नाईक होते. त्यानंतर अनंत तरे यांना विचारले ते नाही म्हटले. प्रताप सरनाईक यांनाही विचारण्यात आले. त्यांनीही नकार दिला. मग तो बॉल माझ्याकडे आला. बाळासाहेबांनी मला संपर्क साधला. ‘राजन तुला लोकसभा लढायची आहे असे बाळासाहेब म्हणाल्यानंतर ‘साहेब.. आपला आदेश’ असे मी म्हणालो. कोणीतरी मर्द सापडला ठाण्याची जागा लढण्यासाठी असे बाळासाहेब मला म्हणाले असा दावा विचारे यांनी केला.

माझे नाव समोर आल्याबरोबर हे महाशय (एकनाथ शिंदे) यांनी राजन विचारे नको असे सांगण्यास सुरूवात केली. त्यामुळे बाळासाहेबांनी पुन्हा आम्हाला बोलावून घेतले. मग बाळासाहेबांनी मला सांगितले की, ठाणे शहराची आमदारकी लढायची… परंतु त्यावेळी देखील हे (एकनाथ शिंदे) आडवे आले. बाळासाहेबांनी सरळ सांगितले. ठाण्यातून राजन विचारे लढतील आणि तुम्ही (एकनाथ शिंदे) कोपरी पाचपाखाडीतून ‌लढा असेही ते म्हणाले. त्यावेळी मी ठाण्यातून आमदारकी लढलो आणि निवडून आलो असे राजन विचारे यांनी सांगितले.

हेही वाचा…डोंबिवली : शालेय विद्यार्थ्यांना ड्रग्ज विकणाऱ्या ६५ वर्षाच्या महिलेला अटक

आमदारकीची पाच वर्षे पूर्ण होत होती. पुन्हा लोकसभेची निवडणूक लागणार होती. त्यावेळी बाळासाहेब लिलावती रुग्णालयात दाखल होते. मला रवी म्हात्रे (बाळासाहेबांचे सहाय्यक ) यांनी संपर्क साधला. ‘साहेबांनी तुला लिलावती रुग्णालयात बोलावले आहे, मी तात्काळ रुग्णालयात गेलो. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले ‘राजन तु शब्द दिला होता..’ मी साहेबांना सांगितले ‘साहेब तुमच्यासाठी आम्ही जीव देऊ.. शब्दाच काय घेऊन बसलात…’ त्यानंतर मी २०१४ मध्ये निवडणूक लढलो आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आलो असे विचारे म्हणाले. सध्या ही रील ठाण्यात प्रसारित होत आहे.