Kapil Patil, Balya Mama / नवी मुंबई : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दी.बा पाटील यांचे नाव मिळण्यासाठी मागचे पाच ते सहा वर्षे आंदोलन सुरु आहेत. येत्या ३० तारखेला विमानतळाचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. मात्र, तरीही या तारखेबाबत अद्यापही संभ्रम आहे.
जो पर्यंत कोणत्याही प्रकल्पाचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकल्पाला नाव देता येत नाही अशी प्रक्रिया असते. त्यामुळेच विमानतळाचे काम पूर्ण झाले असेल तर, दी.बा पाटील यांच्या नावाची अधिसूचना तरी काढावी अशा प्रकारची आग्रही भूमिका स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक रहिवाशी करताना दिसत आहे. या अनुषंगाने मागील तीन ते चार वर्षांपासून सर्वपक्षीय कृती समिती या नावासाठी आग्रही आहे. या सर्वपक्षीय कृती समितीची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि कपिल पाटील यांच्यात विमानतळाच्या नामकरणाच्या मुद्द्यावरुन वाद झाल्याचे दिसून आले.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा शुभारंभ सोहळा लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारसाठी हा अत्यंत महत्वाचा सोहळा मानला जात आहे. मुंबईसह राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागल्याने या पार्श्वभूमीवर होणाऱ्या नवी मुंबई विमानतळाचा शुभारंभ सोहळा अनेक अंगाने चर्चेत आला आहे.
दरम्यान या विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा.पाटील यांचे नाव द्यावे यासाठी आगरी-कोळी भूमीपुत्र समाजात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. मध्यंतरी शरद पवार यांच्या पक्षाचे खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) यांनी एक बाईक रॅली काढत या समाजातील भावनांना वाट करुन दिली. विमानतळाचा उद्धाटन सोहळा जवळ येत आहे.
परंतू, अद्याप विमानतळाच्या नामकरणाविषयी स्पष्टता आलेली नाही. त्यामुळे नामकरणाविषयीची मागणी अधिक तीव्र स्वरुपात पुढे येऊ लागली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यासंबंधीचे आंदोलन हाती घेतले होते. त्यास भाजपच्या राज्य पातळीवरील नेत्यांची उघड साथ असल्याचेही स्पष्ट होते. असे असताना अजूनही नामकरणाचा मुद्दा मार्गी लागत नसल्यामुळे भाजपचे स्थानिक नेते अस्वस्थ झाले आहेत.
नुकतीच विमानतळ नामकरणाबाबत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत खासदार सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा) आणि कपिल पाटील उपस्थित होते. या बैठकीत बाळ्या मामा यांनी ठाम भूमिका मांडली की, विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव आंदोलन केल्यावरच लागेल त्यामुळे दि.बा पाटील यांच्या नावासाठी आंदोलन करावेच लागेल. यावर प्रतिउत्तर करत कपिल पाटील म्हणाले, आंदोलन करुन विमानतळाला लगेच नाव लागणार असेल तर, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.
एकप्रकारे कपिल पाटील यांनी आंदोलन करायचे नाही अशीच भूमीका मांडली. त्यावर बाळ्या मामा म्हणाले मग आंदोलन करायचे नाही तर, तुम्ही आम्हाला शब्द द्या विमानतळाला नाव कधी लागेल. यावर कपिल पाटील यांनी २०१५ ला मी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला, त्याचा पाठपुरावा देखील केला. तुम्हाला कागद दाखवली.
प्रधानमंत्री कार्यालयापर्यंत प्रस्ताव पाठविण्याचे काम केले आहे. त्याला काही प्रक्रिया असते, असे प्रतिउत्तर दिले. याबैठकीत विमानतळाच्या नामकरणावरुन बाळ्या मामा आणि कपिल पाटील यांच्यात वाद पेटलेला पाहायला मिळाला.