Banjara Community Reservation Thane: हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा, या मागणीसाठी बंजारा समाज आक्रमक झाला आहे. शनिवारी ठाण्यात झालेल्या बैठकीत येत्या ४ ऑक्टोबरला ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ठाण्यातील मोर्चाला सेमीफायनल मोर्चा असे नाव दिले आहे. जर आम्हाला अनुसूचित जातीतील आरक्षण दिले नाही तर सबंध महाराष्ट्रभरातून बंजारा समाज मुंबईत धडक देणार आहे. त्यामुळे बंजारा समाजाच्या अनुसूचित जमातीत सामावेशासाठीचा मुद्दा पेटण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटच्या आधारावर ओबीसी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला आहे. याच अनुषंगाने, हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा जमातीचा ‘आदिम’ जमात म्हणून उल्लेख असल्यामुळे, त्यांना अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करून आरक्षण देण्याची मागणी बंजारा समाजाने केली आहे. त्या अनुषंगाने बंजारा समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून ठाण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे.

या संदर्भात माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी सांगितले की, अनुसूचित जातीमध्ये समावेश करावा, या मागणीसाठी प्रथमच बंजारा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरला आहे. आतापर्यंत ३० मोर्चे राज्यभर झाले आहेत. येत्या २९ सप्टेंबरला नांदेड, चंद्रपूर, वाशिम आणि धाराशिव येथे आणि 4 ऑक्टोबरला ठाणे, ६ ऑक्टोबरला लातूर, यवतमाळ, ७ ऑक्टोबरला परभणी आणि जळगाव, १० ऑक्टोबरला नाशिक आणि वर्धा येथे बंजारा मोर्चा काढण्यात येणार आहे.

ठाण्याचा मोर्चा सेमीफायनल

ठाण्याच्या मोर्चाला सेमीफायनल मोर्चा असे नाव दिले आहे. जर आम्हाला अनुसूचित जातीतील आरक्षण दिले नाही तर सबंध महाराष्ट्रभरातून बंजारा समाज मुंबईत धडक देणार आहे. आताचे मोर्चे म्हणजे ट्रेलर आहे पूर्ण सिनेमा अद्याप बाकी आहे. ठाण्यातील मोर्चा शंकर पवार यांच्या नेतृत्वाखाली निघणार असून याबाबत ते म्हणाले की, एसटी आरक्षणासाठी राज्यभर मोर्चा निघत आहेत. ठाण्यात किमान लाखभर बंजारा समाज या मोर्चात सहभागी होणार आहेत. त्याची पूर्वतयारी म्हणून ही बैठक घेण्यात आली होती. या बैठकीला बंजारा समाजातील महत्वाच्या कार्यकर्त्यांना बोलावण्यात आले होते. या बैठकीस चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या सरकारला आम्ही विनंती करीत आहोत की, राज्यभरातील मोर्चांची दखल घेऊन आम्हाला एसटीचे आरक्षण द्यावे असेही ते म्हणाले.