ठाणे : आनंद आश्रम काय तुमच्या बापाची मालमत्ता आहे काय? तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरले, आमदार, खासदार चोरले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांना, दिवंगत आनंद दिघे यांना चोरले, तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरत राहाल आणि आम्ही पाहत बसू हे आता विसरून जा, असा इशारा ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला दिला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पक्ष बांधणीसाठी ठाकरे गटाने राज्यात कार्यकर्ता सुसंवाद मेळावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मेळाव्याची सुरुवात आज, रविवारपासून ठाण्यात होत आहे. या मेळाव्यास खासदार संजय राऊत यांच्यासह महत्त्वाचे नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ज्या ठाण्यातून शिवसेना फुटली. त्याच ठाण्यातून कार्यकर्ता मेळावा सुरू झाल्याने या मेळाव्याकडे राज्याचे लक्ष लागून आहे. या मेळाव्यास ठाकरे गटाचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, राजन विचारे, अनंतर गिते, भास्कर जाधव, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, सुनील प्रभू उपस्थित आहेत.

मेळाव्यापूर्वी एक रॅली काढण्यात आली होती. रॅली टेंभीनाका भागात आली असता, आनंद आश्रमासमोर उभे असलेले शिंदे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यामुळे दोन्ही गटाकडून एकमेकांविरोधात घोषणाबाजी झाली. संजय राऊत यांनी टेंभीनाका येथे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण केला. त्यानंतर ठाकरे गटाचे सर्व नेते तिथून दिघे यांच्या शक्तीस्थळ या स्मारकावर गेले. परंतु राड्यामुळे ठाणे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, मेळाव्यात भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर टीका केली.

आनंद आश्रम काय तुमच्या बापाची मालमत्ता आहे काय? तुम्ही पक्ष चोरला, चिन्ह चोरले, आमदार, खासदार चोरले, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांना, दिवंगत आनंद दिघे यांना चोरले, तुम्ही प्रत्येक गोष्ट चोरत राहाल आणि आम्ही पाहत बसू हे आता विसरून जा असे भास्कर जाधव म्हणाले. उद्धव ठाकरे हे योद्धा आहेत असेही जाधव म्हणाले. तसेच ठाण्यातून

गद्दारी झाल्यानंतर ठाण्यात पहिली सभा झाली. त्यावेळी मला ठाण्यात येऊ नका असे सांगत होते. आम्ही येऊन दाखवले असेही जाधव म्हणाले. यावेळी खासदार अरविंद सावंत, माजी खासदार विनायक राऊत यांनीही शिंदे गटावर टीका केली. तर, अंबादास दानवे यांनी शिवसेनेचे नेते संपूर्ण राज्यभरात कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन करणार असल्याचे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhaskar jadhav criticism of shinde group regarding anand ashram amy