ठाणे : घोडबंदरची कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहनांना दिवसा भिवंडी मार्गे वळविण्याचे अजब निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्यानंतर संतापलेल्या भिवंडीकरांनी सोमवारी रस्त्यावर उतरुन आंदोलन केले. भिवंडीत जड अवजड वाहनांमुळे नागरिक त्रस्त असताना या निर्णयामुळे आणखी कोंडी होण्याची भिती व्यक्त करत भिवंडीतील कशेळी, काल्हेर भागातील नागरिक रस्त्यावर उतरले होते.
उरण जेएनपीए बंदरातून सुटणारी हजारो अवजड वाहने घोडबंदर, मुंबई अहमदाबाद रोड मार्गे गुजरातच्या दिशेने वाहतुक करतात. ठाणे शहरात अवजड वाहनांना निर्बंध आहेत. ठाणे पोलीस आयुक्तांच्या निर्देशानुसार, घोडबंदर शहरात अवजड वाहनांना दररोज दुपारी १२ ते ४ आणि रात्री ११ ते पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी आहे. घोडबंदर भागात मुख्य रस्त्यामध्ये सेवा रस्ता जोडणीचे काम केले जात आहे. तसेच मेट्रो मार्गिकांची कामे सुरू असून रस्त्यांची अवस्था वाईट झाली आहे. घोडबंदर घाट रस्ता अरुंद असून येथे मोठ्याप्रमाणात खड्डे पडल्याने दररोज घाटात वाहतुक कोंडी होत आहे. या वाहतुक कोंडीवरून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. दररोज मिरा भाईंदर, वसई भागातून ठाणे शहरात प्रवेश करणाऱ्या किंवा ठाण्यातून घाट मार्गे मिरा भाईंदरमध्ये प्रवास करणाऱ्या नोकरदारांना, व्यवसायिकांना त्याचा प्रचंड मन:स्ताप सहन करावा लागत आहे.
प्रताप सरनाईक यांचे निर्देश
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच ठाणे महापालिकेत एक बैठक आयोजित केली होती. या बैठकीत वाहतुक विभाग, महापालिका अधिकारी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) अधिकारी उपस्थित होते. घोडबंदर मार्गावर मुख्य आणि सेवा रस्ता जोडणीचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन एमएमआरडीएने दिले. त्यामुळे डिसेंबरपर्यंत या मार्गावर रात्री १२ ते सकाळी ६ या वेळेत अवजड वाहतुकीला परवानगी देण्यात यावी. तर दिवसा दुपारी १२ ते सायंकाळी ४ या वेळेत होणारी वाहतुक भिवंडी मार्गे वळविण्यात यावी अशी सूचना सरनाईक यांनी केली.
भिवंडीकर होणार त्रस्त
मुंबई नाशिक महामार्गाने भिवंडी, कल्याण भागातील हजारो वाहन चालक वाहतुक करतात. अवजड वाहनांची वाहतुक भिवंडी मार्गे वळविण्यासाठी ही वाहतुक मुंबई नाशिक महामार्ग, काल्हेर, कशेळी, भिवंडी-चिंचोटी मार्गे वळवावी लागणार आहे. त्यामुळे या मार्गावर घोडबंदरच्या अवजड वाहनांचा भार येऊन कोंडीची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भिवंडीकर रस्त्यावर
परिवहन मंत्र्यांच्या या निर्णयाविरोधात भिवंडी येथील कशेळी -काल्हेर भागातील नागरिक सोमवारी रस्त्यावर उतरले होते. हा निर्णय चुकीचा असल्याचे म्हणत येथील रहिवाशांनी संताप व्यक्त केला. या कालावधीत वाहतुक कोंडी झाली होती.