लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कल्याण: आगामी कल्याण लोकसभा निवडणुकीसाठी भाजप कार्यकर्ते म्हणतील तोच उमेदवार निवडण्यात यावा आणि भाजप पदाधिकाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेले मानपाडा पोलीस ठाण्याचे सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आलेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत शिवसेनेला (शिंदे गट) कोणतेही सहकार्य न करण्याचा, त्यांच्या कार्यक्रमांवर बहिष्कार टाकण्याचा निर्धार गुरुवारी कल्याण पूर्वेतील भाजपच्या विशेष मंथन बैठकीत करण्यात आला.

या बैठकीतील पदाधिकाऱ्यांचा संताप पाहता शिवसेना-भाजप मधील दरी खूपच वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमांकडे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण पाठ फिरवत आहेत. कालच्या दिव्यातील कार्यक्रमाला ते उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खासदार सुपुत्राच्या भाजप कार्यकर्त्यांची कामे अडविण्याच्या, त्यांना अडचणीत आणण्याच्या, मंत्री चव्हाण यांना पाण्यात पाहण्याच्या सुप्त हालचालींमुळे मंत्री चव्हाण यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे.

आणखी वाचा-गृहमंत्रीपद भाजपकडे असूनही पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर सत्ता काय कामाची? भाजप पदाधिकाऱ्यांचा सवाल

डोंबिवलीतील रस्ते कामे, दिव्यातील कालचा लोकार्पणाच्या कार्यक्रमावरुनही युतीधर्म न पाळता खा. शिंदे यांनी स्वतःचा इव्हेंन्ट केल्याच्या घडामोडींनी भाजप, मनसेचे कार्यकर्ते कमालीचे दुखावले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आपल्या बबड्याला आता आवरावे, अशा संतप्त प्रतिक्रिया भाजपचे दिव्यातील कार्यकर्ते काल देत होते. भाजपची संयमाची भूमिका पदाधिकाऱ्यांच्या अंगलट येऊन लागल्याने कल्याण लोकसभा क्षेत्रातील भाजप पदाधिकाऱ्यांची तातडीची एक बैठक कल्याण पूर्वेत तिसाई सभागृहात आज घेण्यात आली.

सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण, प्रदेश चिटणीस गुलाबराव करंजुले, माजी मंत्री जगन्नाथ पाटील, आ. कुमार आयलानी, माजी आ. नरेंद्र पवार, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे उपस्थित होते. विनयभंग प्रकरणातील पीडित महिलेचा पोलीस अधिकारी पती यावेळी उपस्थित होता. राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आहे. युतीधर्म पाळून जिल्हास्तरावर दोन्हीकडील कार्यकर्त्यांची कामे झाली पाहिजेत. मागील वर्षापासून भाजप कार्यकर्त्यांची कामे अडवून धरण्याचा प्रकार जिल्ह्यातील शिवसेनेच्या एका नेत्याकडून सुरू आहे. त्यात गेल्या आठवड्यात मंत्री रवींद्र चव्हाण समर्थक डोंबिवलीतील भाजप पदाधकारी नंदू जोशी यांच्यावर खा. शिंदे यांच्या दबावामुळे विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने भाजपमध्ये खासदारांविषयी तीव्र संतापाची लाट पसरली आहे.

आणखी वाचा-Mira Road Murder: “सुप्रियाताई, तुमची रंग बदलण्याची कला सरड्यालाही…”, चित्रा वाघ यांची टीका; ‘मोठ्ठ्या ताई’ असा उल्लेख करत केलं ट्वीट!

आतापर्यंत सत्तेमधील भागीदार म्हणून संयम आणि शांतता कितपत सहन करायची. सत्ता आणि गृहमंत्री पद भाजपकडे असुनही भाजप पदाधिकाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल होत असतील तर राज्यातील सत्ता काय कामाची, असा प्रश्न भाजपचे प्रदेश चिटणीस गुलाबराव करंजुले यांनी केला.

शिवसेनेवर बहिष्कार

कल्याण लोकसभेसाठी भाजप कार्यकर्ते ठरवतील तोच उमेदवार मान्य केला जाईल. अन्य कोणी उमेदवार सहन केला जाणार नाही. शिवसेना समर्थक वाद्ग्रस्त पोलीस अधिकारी बागडे यांना निलंबित केले जात नाही तोपर्यंत शिवसेनेच्या (शिंदे पिता-पुत्र) प्रत्येक कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला. या ठरावांमुळे खासदार शिंदे यांचा येणारा काळ खूप अडचणीत असण्याची चिन्हे आहेत. मनसे, राष्ट्रवादीनेही खा. शिंदे यांच्या विरुध्द जोरदार कंबर कसली आहे. बागडे यांच्या विरुध्द दोन पोलिसांनी महासंचालकांकडे तक्रारी केल्या आहेत. ही प्रकरणे धसास लावण्यासाठी भाजप पदाधिकारी सरसावले आहेत. खा. शिंदे यांनी मात्र जो मतदारसंघ शिवसेनेचा तेथे शिवसेनेचा उमेदवार असेल असे स्पष्ट केले आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bjps new trick to oppose mp srikant shinde mrj
Show comments