मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डोंबिवलीत येण्यासाठी रात्री केला बोटीने प्रवास

मुसळधार पाऊस, अपुऱ्या छत्र्या आणि त्यात मुख्यमंत्रांना सुरक्षा देताना बंदोबस्तावरील जवानांची तारांबळ उडाली होती.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी डोंबिवलीत येण्यासाठी रात्री केला बोटीने प्रवास

शिळफाटा, भिवंडी बाह्यवळण रस्त्यावरील खड्डे, त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी आणि त्यात दहीहंड्या फोडण्यासाठी गोविंदा पथके मोठ्या संख्येने एकाचवेळी रस्त्यावर आल्याने मुख्य वर्दळीच्या रस्त्यांवर झालेल्या वाहतूक कोंडीचा त्रास टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजता भिवंडी तालुक्यातील माणकोली-वेल्हे गाव ते डोंबिवली रेतीबंदर खाडी दरम्यान बोटीने प्रवास केला.

मुसळधार पाऊस, त्यात रात्रीची वेळ आणि पाण्यातून अतिमहत्वाच्या व्यक्तिचा प्रवास त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुरक्षा यंत्रणा काहीशी तणावात होती. तरीही कोणताही किंतु मनात न आणता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रात्री ११ वाजता ठाण्यातून निघून भिवंडी तालुक्यातील माणकोली-वेल्हे गाव येथे त्यांच्या सरकारी वाहनाने आले. वेल्हे गाव येथे मुख्यमंत्री आणि त्यांच्या ताफ्यासाठी एक बोट सज्ज ठेवण्यात आली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचा फौजफाटा बोटीत बसत असताना मुसळधार पाऊस कोसळत होता. अपुऱ्या छत्र्या आणि त्यात मुख्यमंत्री शिंदे यांना सुरक्षा देताना बंदोबस्तावरील सुरक्षा जवान, पोलिसांची तारांबळ उडाली होती.

रात्री साडे अकरा वाजता मुख्यमंत्री शिंदे डोंबिवली पश्चिमेतील रेतीबंदर खाडी किनारी उतरले. वेल्हे गाव ते रेतीबंदर अवघ्या १५ मिनिटाचा प्रवास आहे. माणकोली, वेल्हे परिसरातील नागरिक, विक्रेते दररोज सकाळी या बोटीने येऊन रात्री याच बोटीने घरच्या प्रवासाला निघतात.

…अन् रात्री साडेबारा वाजता मुंबईला रवाना देखील झाले –

रेतीबंदर येथे उतरल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी माजी नगरसेवक व स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांचे अतिसुरक्षेचे वाहन खाडी किनारी सज्ज होते. या वाहनातून मुख्यमंत्री शिंदे डोंबिवली मोठागाव, रेतीबंदर रस्त्याने रेल्वे फाटक ओलांडून पंडित दिनदयाळ रस्त्यावरील दीपेश म्हात्रे फाऊंडेशनतर्फे आयोजित दहीहंडी उत्सवात सहभागी झाले. मुख्यमंत्री शिंदे यांचे कार्यक्रम स्थळी आगमन होताच गोविंदा पथकांनी जल्लोष केला. गोविंदा पथकांना शुभेच्छा आणि फाऊंडेशनच्या सदस्यांचे कौतुक करुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा बोटीनेच वेल्हे गाव आणि तेथून आपल्या वाहनातून मुंबई येथे रात्री साडे बारा वाजता रवाना झाले. रात्रीच्या वेळेत बोटीतून येऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या धाडसाचा संदेश यानिमित्ताने दिला असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये होती.

प्रत्येकजण हा मुख्यमंत्री आहे –

“राज्यातील सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. येथे कोणीही लहान मोठा नाही. त्यामुळे याठिकाणी उपस्थित असलेला प्रत्येक जण हा मुख्यमंत्री आहे, असे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी कल्याण डोंबिवली पालिका हद्दीतील नागरी समस्या मार्गी लावण्यासाठी लवकरच मी स्वत: आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे येणार आहोत. येथील समस्यांची माहिती घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत.” असे आश्वासन दिले.

मराठीतील सर्व ठाणे ( Thane ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chief minister eknath shinde traveled by boat at night to reach dombivli msr

Next Story
निष्ठेचे थर आणि हिंदूत्वाचा पुकार; ठाण्यात दहीहंडीच्या थरांवरून शिवसैनिकांना साद; विचारेंच्या ‘निष्ठाहंडी’ला शिंदेसेनेकडून हिंदूत्वाचे उत्तर 
फोटो गॅलरी