उल्हासनगर : उल्हासनगरातील एका खासगी बालवाडीत एका तीन वर्षीय बालकाला कानशिलात लगावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. एका महिला शिक्षिका त्या बालकाला कविता शिकवत असताना मुलगा टाळी वाजवत नसल्याने ती शिक्षिका त्या मुलाच्या कानशिलात मारत असल्याचे दिसते आहे. याची चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारीत झाल्यानंतर संताप व्यक्त होतो आहे. याप्रकरणी रात्री उशिरा विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
आपल्या पाल्याला चांगले शिक्षण मिळावे, जगाच्या या स्पर्धेत तो टिकून राहावा म्हणून अगदी तीन वर्षांपासूनच आता चिमुकल्यांना शाळेत प्रवेश दिला जातो. खासगी बालवाडीचा पर्याय यासाठी पालक निवडतात. मात्र चिमुकल्यांच्या शिक्षणाच्या पहिल्या पायरीवरच त्यांच्यासोबत केल्या जाणाऱ्या मारहाणीमुळे विद्यार्थ्यांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण होते.
तर पालकांच्याही जीवाला घोर निर्माण होतो. या अगदी लहान वयात ज्या शिक्षकांच्या भरवश्यावर पाल्याला शाळेत सोडले जाते, तेच शिक्षक जर मारहाण करत असतील तर काय करायचे, असा प्रश्न उल्हासनगरात घडलेल्या एका घटनेवरून उपस्थित केला जातो आहे.
उल्हासनगरात एका तीन वर्षाच्या मुलाला खासगी बालवाडीत प्रवेश देण्यात आला होता. या बालवाडीतील एक चित्रफीत काही दिवसांपूर्वी समाज माध्यमांवर प्रसारीत झाली. या चित्रफितीत एक महिला शिक्षिका चिमुकल्याला कविता शिकवते आहे. तिच्या मागेच कविता बोलण्यासाठी शिक्षिका त्या बालकाला सांगते आहे. त्याचवेळी बोलताना टाळी वाजवण्याचेही सांगते आहे.
मात्र चिमुकला शिक्षिका सांगते त्याप्रमाणे टाळी वाजवत नसल्याने त्या शिक्षिकेने थेट त्या चिमुकल्याच्या कानशिलात लगावल्याचे चित्रफितीत दिसते आहे. त्यामुळे चिमुकला भेदरल्याचे दिसतो. त्यानंतरही शिक्षिका त्या मुलाला कविता बोलताना टाळी वाजवण्यासाठी आग्रह धरताना दिसते. त्यावेळी भेदरलेला चिमुकला तीच्याकडेच सांभाळून घेण्याची आर्जव बोबड्या बोलातून करताना दिसतो आहे. मात्र त्यानंतरही ती महिला शिक्षिका त्या बालकाच्या कानशिलात लगावतानाच दिसते आहे. शेवटी एका फटक्यामुळे त्या बालकाचा तोलही बिघडताना त्या चित्रफितीत दिसते आहे.
ही चित्रफित प्रसारीत झाल्यानंतर त्या महिला शिक्षिकेविरूद्घ एकच संताप व्यक्त केला जातो आहे. उल्हासनगरमध्ये शालेय बालकांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी धक्कादायक घटना आहे. याप्रकरणी संबंधित महिला शिक्षिकेवर कठोर कारवाई करण्याची मागणी होते आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. इतक्या कमी वयात एखाद्या गोष्ट जशास तशी करण्याचा शिक्षिकेचा हट्ट अमानवीय असल्याची टीकाही होते आहे.