बदलापूरः गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत उल्हास नदीची पाणी पातळी १६ मीटरवर पोहोचली होती. उल्हास नदीची इशारा पातळी १६.५० मीटर आहे. तर धोकापातळी १७.५० मीटर इतकी आहे. त्यानतंर बदलापूर शहरात पाणी शिरण्यास सुरूवात होत असते. त्यामुळे १६ मीटरवर पाणी पातळी गेल्याने कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या अग्नीशमन दलाने तसेच पोलिसांनी नदी किनारी नागरिकांना जाण्यास मज्जाव केला होता.
गेल्या दोन दिवसांपासून ठाणे जिल्ह्यासह शेजारच्या रायगड जिल्ह्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे नाले, नदी दुथडी भरून वाहत आहेत. रायगड जिल्ह्यातील कर्जत, नेरळ, माथेरान भागातून वाहत येणारी उल्हास नदी वांगणीजवळ ठाणे जिल्ह्यात प्रवेश करते. त्यानंतर ती बदलापूर, कल्याण ग्रामीण, उल्हासनगर, कल्याण असा प्रवास करत पुढे जाते. बदलापूर शहरात उल्हास नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यास शहरात पाणी शिरते. त्यामुळे शेकडो घरांमध्ये पाणी जाते. यापूर्वी २०१९ मध्ये शहराला दोनदा पुराचा फटका बसला होता. तर २००५ मध्ये शहराने महापुराचा अनुभव घेतला.
सोमवारपासून रायगड आणि ठाणे जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदीच्या पाणी पातळीत वाढ नोंदवली गेली. मंगळवारी उल्हास नदीची पाणी पातळी वाढली होती. सकाळी १३ मीटरवर असलेली नदीची पाणी पातळी सायंकाळी ५ वाजेपर्यंत पाण्याची पातळी १५.१६ मीटरवर पोहोचली होती. त्यानंतरही उल्हास नदीच्या पाणी क्षेत्रात पाऊस सुरूच राहिल्याने पाण्याची पातळी १६ मीटरपर्यंत वाढली होती. सायंकाळी सहा वाजता उल्हास नदीची पाणी पातळी १६.१० मीटर नोंदवली गेली. त्यामुळे १६.५० च्या इशारा पातळीजवळ पाणी गेल्याने शासकीय यंत्रणा कामाला लागल्या होत्या. उल्हास नदीच्या किनारी भागात राहणाऱ्या सोनिवली, रमेशवाडी येथील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली होती. त्यामुळे येथील नागरिकांना स्थलांतराच्या सूचना पालिका प्रशासनाकडून केल्या जात होत्या.
कुळगाव बदलापूर पालिकेने सुमारे २ हजार नागरिकांच्या स्थलांतरणाची व्यवस्था केली असून त्यांच्या जेवणाची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती पालिकेचे मुख्याधिकारी मारूती गायकवाड यांनी दिली आहे.