अंबरनाथ/बदलापूर : साडे दहा वर्षांनंतर होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. यात कुळगाव बदलापूर आणि अंबरनाथ अशा दोन्ही शहरांमध्ये राजकीय वारसदारांच्याच हाती सत्ता जाण्याची शक्यता आहे. अंबरनाथचे नगराध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी तर कुळगाव बदलापूरचे नगराध्यक्ष पद नागरिकांचा सामान्य प्रवर्गातील (ओबीसी) महिलेसाठी राखीव आहे. मात्र दोन्ही शहरांमध्ये महत्वाच्या राजकीय पक्षांमधून प्रस्थापीत राजकीय घराण्यातील वारसदारच या पदासाठी रिंगणात उतरणार हे जवळपास निश्चित झाले आहे. त्यात कुणी नेत्याची पत्नी आहे तर कुणी सून आहे.

ठाणे जिल्ह्यातील अ वर्ग नगर परिषदा असलेल्या अंबरनाथ आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदांसाठी मंगळवारी निवडणुकीची घोषणा करण्यात आली. या दोन्ही पालिकांमध्ये २०१५ वर्षात निवडणुका संपन्न झाल्या होत्या. त्यानंतर कोविडचे संकट, सर्वोच्च न्यायालयातील खटला या सर्वांमुळे ही निवडणूक साडेपाच वर्ष रखडली. आता साडे दहा वर्षांनंतर होणाऱ्या निवडणुकांमध्ये थेट नगराध्यक्ष निवडला जाणार आहे. मात्र त्यापूर्वीच नगराध्यक्ष पदाच्या सोडतीने प्रमुख मोठ्या नेत्यांच्या, ज्येष्ठ माजी नगरसेवकांच्या स्वप्नांवर पाणी फिरले. अनेक नगरसेवक आज ५० ते ६० दरम्यान आहेत. त्यांना नगराध्यक्ष पदासाठी आणखी पाच वर्षे वाट पाहावी लागणार आहे. त्यातच नगर परिषदांचे महापालिकेच रूपांतर झाल्यास अनेक जणांना नगराध्यक्ष पदाचे स्वप्न सोडावे लागणार आहे. मात्र या सर्व मोठ्या नेत्यांनी आता आरक्षित पदासाठी आपला महिला वारसदार उतरवण्याची तयारी केली आहे.

दोन्ही शहरांमध्ये कुणाची पत्नी तर कुणाची सून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. कुळगाव बदलापूर नगर परिषदेत शिवसेनेच्या वतीने यापूर्वीच माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका वीणा म्हात्रे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. भाजपच्या वतीने माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या पत्नी आणि माजी नगरसेविका रूचिता घोरपडे यांचे नाव चर्चेत आहे. माजी नगराध्यक्ष राम पातकर यांच्या पत्नी रती पातकरही इच्छुक असल्याचे कळते आहे. महाविकास आघाडीने अद्याप नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केलेला नाही. मात्र चर्चेतील नावांमध्ये पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या पत्नीचेच नाव चर्चेत आहे.

अंबरनाथ नगर परिषदेत शिवसेनेत अनेक नावांची चर्चा आहे. मात्र यात माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर यांचे नाव आघाडीवर असल्याची माहिती शिवसेनेतील सुत्रांनी दिली आहे. तर भाजपाकडून माजी नगराध्यक्ष गुलाबराव करंजुले यांच्या सून तेजश्री विश्वजीत करंजुले यांचे नाव चर्चेत आहे. कॉंग्रेसकडूनही माजी नगरसेवक आणि ब्लॉक अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या पत्नीचे नाव चर्चेत आहे. महाविकास आघाडीकडून अद्याप नावाची घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र प्रस्थापित नेत्याच्या पत्नी, माजी नगरसेविकांकडेच ही उमेदवारी जाण्याची शक्यता व्यक्त होते आहे.