Conflict Between Shiv Sena And BJP कल्याण – आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कल्याण डोंबिवली शहरांमधील विविध पक्षांमधील माजी नगरसेवक, पदाधिकारी आपल्या पक्षात दाखल करून घेण्यासाठी शिंदे शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच आहे. ‘ही रस्सीखेच आता होतच राहणार. ठाणे जिल्ह्यात भाजप हा येत्या दिवसात प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल’ अशी विधाने गुरूवारी भाजप नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या पक्षप्रवेशाच्यावेळी केली. त्यामुळे येत्या काही दिवसात या पक्षप्रवेशांवरून भाजप, शिंदे शिवसेनेतील संघर्ष अटळ असल्याची चिन्हे आहेत.

चार प्रभागांचा एक प्रभाग अशी रचना येत्या महापालिका निवडणूक काळात असण्याची शक्यता आहे. या नव्या प्रभाग व्यूहरचनेत आपण कसे वरचढ राहू आणि कोठल्याही प्रभागात तगड्या उमेदवाराची कमी पडता कामा नये यासाठी शिंदे शिवसेना आणि भाजपने कल्याण, डोंबिवलीतील ठाकरे गट, मनसे, काँग्रेसमधील जुने जाणते माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा लावला आहे.

शिंदे शिवसेनेतून कल्याण, डोंबिवली भाजपमधील काही माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना वेगळ्या वळणाने आपल्या पक्षात घेण्यासाठी गळ टाकले जात आहेत. आगामी पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळते की नाही या विषयावर भाजपमधील काही मंडळी वळचणीवर बसून आहेत. राज्यात सत्तेत, स्थानिक पातळीवर शिंदे शिवसेना, भाजप नेते व्यासपीठावर एकमेकांच्या गळ्यात गळे घालत असले तरी दोन्ही पक्षांमधील अंतर्गत सुंदोपसुंदी टोकाला गेली आहे. ठाण्यात वनमंत्री गणेश नाईक करीत असलेल्या विधानांवरून ते दिसते.

भाजपने शिंदे शिवसेनेतील डोंबिवलीतील काही मातब्बर आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी गळ टाकले आहेत. कल्याण ग्रामीणमधील ठाकरे, शिंदे शिवसेनेतील काही हुकमी मंडळींनी भाजपमध्ये येण्याची तयारी केली होती. पक्षप्रवेश जवळजवळ निश्चित झाल्याची चर्चा सुरू असतानाच आदल्या दिवशी ‘सुईची’ चक्रे रात्रीतून फिरली आणि या हुकुमी मंडळींनी शिंदे शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

डोंबिवली कल्याणमध्ये सुरू असलेल्या सर्व सुप्त हालचालींची माहिती शिंदे शिवसेना, भाजपच्या नेत्यांना चांगली ज्ञात आहे. या विषयावर दोन्ही पक्षाचे नेते मौन बाळगून आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष कल्याण डोंबिवलीचे. राज्यात पक्षीय वर्चस्वाची गणिते जुळविताना आपल्या शहरात भाजपचा वरचष्मा असावा यादृष्टीने प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांनी कल्याण डोंबिवली पालिकेवर भाजपचा महापौर बसविण्याचे आणि कल्याण शहर परिसर भाजपमय करण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. भाजपचे हेच विधान पकडून शिंदे शिवसेनेने मागील २५ वर्ष कल्याण डोंबिवली पालिकेवर असलेले वर्चस्व तूसभरही कमी पडू नये म्हणून आपली ताकद या भागात पक्षप्रवेशांच्या माध्यमातून लावण्यास सुरूवात केली आहे.

आतापर्यंत भाजपने शिंदे शिवसेनेतील माजी नगरसेवक, पदाधिकारी घ्यायचे नाहीत. आणि शिंदे शिवसेनेने भाजप पदाधिकारी, माजी नगरसेवकांना हात लावयचा नाही, हे सूत्र दोन्ही गटाकडून पाळले जात आहे. पालिका निवडणुका जशा तोंडावर येतील. त्यावेळी महायुतीपेक्षा पक्ष मोठा या विचारातून दोन्ही पक्षांकडून कार्यकर्ते पळवापळवीचे प्रमाण वाढेल आणि त्यात भाजप, शिंदे शिवसेनेतील संघर्ष अटळ असेल, असे राजकीय जाणकार सांगतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीने सुरू असलेल्या देश, राज्य, पालिका, ग्रामीण स्तरावरील विकास योजना पाहून इतर पक्षांमधील अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते स्वताहून भाजपकडे येत आहेत. अशा कार्यकर्त्यांचे स्वागत केले जात आहे. संघटनात्मक बांधणीसाठी असे निष्ठावान कार्यकर्ते नक्कीच पक्षाची ताकद आहेत.- नंदू परब, जिल्हाध्यक्ष, कल्याण जिल्हा भाजप.

अनेक वर्ष कल्याण डोंबिवली पालिकेत शिवसेना भाजप युतीने काम करत आहोत. संख्यात्मक बळ, विकास यामध्ये आम्ही नेहमीच पालिकेत मोठे भाऊ आहोत. आता भाजपलाही आपण मोठे भाऊ व्हावे असे वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. विकासाच्या विषयावर आम्ही जनतेच्या मनात आहोत. तोच विषय घेऊन लोकांसमोर जाणार आहोत.- राजेश कदम, उपजिल्हाप्रमुखडोंबिवली.