अंबरनाथः देशात प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहिल याचा विचार अनेकांनी केला नव्हता. मात्र आज मंदिर उभे राहिले आहे. येत्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मलंगगडाला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मलंगमुक्तीच्या वाक्याचा पुनरूच्चार केला. मलंग गडाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या राज्यस्तरीय हरिनाम सप्ताहाच्या सांगता समारंभाप्रसंगी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे बोलत होते. मुख्यमंत्र्यांनी हरिनाम सप्ताहाच्या उद्घाटनाप्रसंगी मलंग मुक्तीबाबत वक्तव्य करत खळबळ उडवून दिली होती.

कल्याण येथील मलंगडाच्या पायथ्याशी मागील आठवडाभरापासून राज्यस्तरीय अखंड हरिनाम सप्ताह सुरू होता. या हरिनाम सप्ताहाची सांगता मंगळवारी झाली. या हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलंगगडाच्या पायथ्याशी हजेरी लावली होती. यावेळी बोलतना त्यांनी मलंगगडाच्या मुक्तीबाबत अप्रत्यक्ष वक्तव्य करत तुमच्या मनात मलंग मुक्तीचे जे स्वप्न आहे ते पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, असे वक्तव्य केले होते. या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर अनेकानी टीका केली होती. यानंतर शिवसेनेचे आनंद दिघे यांच्या आंदोलनाची आठवण अनेकांना झाली होती. तर मलंगगडाचा वाद पु्न्हा एकदा उफाळून आला होता.

हेही वाचा… खंजीर खुपसणाऱ्यांचा माज उतरवू; कल्याणमधील बैठकीत शिवसेना उपनेते विजय साळवी यांचा इशारा

मंगळवारी या सप्ताह सोहळ्याच्या समारोप पार पडला. यावेळी शंकराचार्य महाराज, राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीरंग बारणे शिवसेनेचे अनेक नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्याचा पुनरूच्चार केला. कीर्तनकारांच्या माध्यमातून येणारी नवीन पिढी ही आपला धर्म, संस्कृती आणि ही चळवळ अशीच पुढे घेऊन जाणार आहे. देशात प्रभू श्रीराम मंदिर उभे राहील याचा विचार आपल्यापैकी कोणीच केला नव्हता. ते राम मंदिर आज उभे राहत असून येणाऱ्या काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मलंग गडाला मुक्ती दिल्याशिवाय राहणार नाहीत, असे खासदार डॉ. शिंदे यावेळी म्हणाले.

अफजल खानाचा कोथळा या महाराष्ट्रात दोन वेळा निघाला

स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा या महाराष्ट्रात दोन वेळा काढण्यात आला. सर्वात पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा कोथळा काढला. तर प्रतापगडावरील अतिक्रमणे सरकारने काढली तेव्हा दुसऱ्यांदा अफजल खानाचा कोथळा बाहेर काढण्यात आला, असेही डॉ. श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.