ठाणे : फ्रेंडशीप डे अर्थात मैत्री दिन अनेकजण साजरा करतात. परंतु ठाण्यात मैत्री दिना दिवशीच एक दुर्दैवी घटना घडली. फ्रेंडशीप डे साजरा करुन घरी परतणाऱ्या एका तरुणीवर काळाने घाला घातला. एका अपघातात या तरुणीचा मृत्यू झाला. या अपघातानंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुंब्रा येथील बायपास मार्गावर रविवारी रात्री ही अपघाताची गंभीर दुर्घटना घडली. मित्र आणि मैत्रिणीसोबत मैत्री दिन (फ्रेंडशीप-डे) साजरा केल्यानंतर मित्राच्या दुचाकीवरुन घरी परतणाऱ्या ठाण्यातील २१ वर्षीय तरुणीचा अपघात झाला. या अपघातात तिच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

ठाण्यातील तीन हात नाका भागात २१ वर्षीय तरुणी राहते. रविवारी मैत्री दिन असल्याने ती तिच्या मित्र आणि मैत्रिणीसोबत ठाण्यातील एका हाॅटेलमध्ये जेवण्यासाठी गेली होती. तिची मैत्रिण मुंब्रा येथे राहत असल्याने त्यांनी तिला घरी सोडण्याचा निर्णय घेतला. तिघेही एकाच दुचाकीने मुंब्रा येथे गेले. रात्री ११.१५ वाजता मैत्रिणीला घरी सोडल्यानंतर तरुणी आणि तिचा मित्र पुन्हा ठाण्याच्या दिशेने परतू लागले. त्यांची दुचाकी मुंब्रा बायपास मार्गावरील रेतीबंदर क्रमांक चार येथे आली असता, मागून भरधाव कंटेनरने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेमुळे तिचा मित्र एका दिशेला तर, दुसऱ्या दिशेला तरुणी पडली. त्याचवेळी कंटेनरचे चाक तिच्या डोक्यावरून गेले. हा अपघात इतका भयानक होता की, डोक्याचा चेंदामेंदा झाला. अपघातात तिचा मृत्यू झाला असून मित्र देखील या अपघातात जखमी झाला. अपघातानंतर कंटेनर चालक कोणतीही मदत न करता तेथून कंटेनर घेऊन निघून गेला.

अपघाताची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाल्यानंतर त्यांनी तरुणाची मदत केली. तरुणाने त्याच्या मुंब्रा येथील मैत्रिणीला अपघाताची माहिती दिल्यानंतर तिने अपघातग्रस्त तरुणीच्या पालकांना याबाबतची माहिती दिली. तिचे पालक घटनास्थळी आल्यानंतर तिचा मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले. तर तरुणाने मुंब्रा पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार, कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

या अपघातात तरुणीच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने तिच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. या अपघातात तरुणीचा मृत्यू झाला असून अपघाताप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.