कल्याण – कल्याण शहरातील जुनी आणि प्रसिध्द श्रीमती के. सी. गांधी शाळेने शाळेतील मुलींना टिकली, हातात बांगड्या घालण्यास मज्जाव, तर विद्यार्थ्यांना हाताला गंडा, कपाळाला टिळा लावण्यास बंदी केल्याचा फतवा काढल्याने पालक, विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या फतव्या प्रकरणी उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण विधानसभा संघटक रूपेश भोईर यांनी पालिका शिक्षण विभागाकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे. तर, शिक्षण विभागाने शाळेला नोटीस पाठवून खुलासा मागविला आहे.
शाळेत असा कधीही प्रकार घडला नव्हता. आता मुली शाळेत टिकली लावून गेल्या, हातात बांगड्या, हातात गंडा असला, मुलांनी कपाळाला टिळा लावला असला तर त्यांना तात्काळ शाळेच्या स्वच्छतागृहात नेऊन त्यांच्या कपाळ्यावरील टिळा पुसून काढला जातो. कपाळवरची टिकली, हातामधील बांगड्या काढून टाकण्यास सांगितल्या जातात, अशा तक्रारी पालक, विद्यार्थ्यांनी केल्या.
या प्रकरणातील तक्रारदार उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण विधानसभा संघटक रूपेश भोईर यांनी माध्यमांना सांगितले, के. सी. गांधी शाळेत अलीकडे मुलींना कपाळवरच्या टिकल्या, हातात बांगड्या, मुलांना कपाळावर टिळा, हातात गंडे बांधण्यास मज्जाव केला जात आहे. कपाळावर टिकली, टिळा असेल तर तो काढून टाकण्यास सांगितला जातो.
आपला मुलगा शाळेत गेला तेव्हा त्याच्या कपाळाला टिळा होता. त्याला तात्काळ स्वच्छतागृहात नेऊन कर्मचाऱ्याने त्याच्या कपाळावरील टिळा पुसून काढला. काही पालक, विद्यार्थ्यांनी यासंदर्भात आपल्याकडे तक्रारी केल्या. म्हणून आपण कल्याण डोंबिवली पालिका शिक्षण विभागाकडे तक्रार केली आहे.
आगामी महापालिका निवडणुकांचा विचार करून आता काही मंडळी विविध विषय उपस्थित करून आपण कसे सामाजिक करतो हे दाखविण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये किमान कोणी शाळांना ओढू नये. शहरातील जुन्या जाणत्यांनी अथक मेहनत घेऊन, पै पैसा जमा करून शिक्षण संस्था उभ्या केल्या आहेत याची जाणीव पालिका निवडणुकीसाठी इच्छुक होतकरू उमेदवारांनी ठेवावी. आणि शहरातील इतर खड्डे, रस्ते, रखडलेले पूल मार्गी लागतील यासाठी मोठी आंदोलने उभारावीत, अशी मागणी कल्याण, डोंबिवली शहरातील जु्न्या जाणत्या नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.
के. सी. गांधी शाळेत विद्यार्थ्यांना टिकली, टिळा लावण्यास बंदी केली जात असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे. यासंदर्भात शाळेला नोटीस पाठवली आहे. हा विषय शाळा व्यवस्थापन, पालक यांच्यातील सामंजस्याने मिटविला जाईल. – भारत बोरनारे, शिक्षणाधिकारी, कडोंमपा. शिक्षण विभाग.
अतिशय कष्ट, मेहनतीने शाळा संचालक, विश्वस्तांनी शाळेची उभारणी केली आहे. दर्जेदार शिक्षण शाळेत दिले जाते. निधर्मी पध्दतीने शाळेचा कारभार आहे. विद्यार्थी, पालक यांच्यात भेदभाव न करता विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढेल, शाळेचा नावलौकिक होईल या पध्दतीने शाळा व्यवस्थापक, शिक्षक काम करतात. मागील तीस वर्षातील शाळेची कामगिरी नेहमीच उत्तुंग राहिली आहे. कोणताही फतवा शाळेने काढला नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेला शाळा सर्वोच्च प्राधान्य देते. शाळा, विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यवस्थापन यांच्यात सामंजस्य राहील याची काळजी नेहमीच शाळा घेते. – मनोहर पालन, सचिव, के. सी. गांधी विद्यालय.