ठाणे शहरावर सीसीटीव्हीची नजर

ठाणे : टाळेबंदीदरम्यान घराबाहेर न पडण्याचे आवाहन करूनही ठिकठिकाणी रस्त्यांवर, चौकांत घोळके जमवणाऱ्यांवर आता ठाणे महापालिकेची बारीक नजर राहणार आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रस्ते, चौक येथे बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची गर्दी रोखण्यासाठी पालिकेने योजना आखली आहे. हाजुरी येथील नियंत्रण कक्षाशी जोडण्यात आलेल्या या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चित्रीकरण पाहून लगेच त्या ठिकाणी गर्दी हटवण्यासाठी पोलीस किंवा महापालिकेची पथके पाठवण्यात येणार आहेत.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हाजुरी येथील अत्याधुनिक नियंत्रण कक्षातील चित्रीकरण तपासले जाणार आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त विजय सिंघल यांनी सोमवारी या कक्षात जाऊन तेथील कामकाजाची व प्रभाग समितीनिहाय शहरातील मुख्य ठिकाणांच्या सीसीटीव्ही चित्रीकरणाची पाहणी केली. तसेच या चित्रीकरणामध्ये नागरिकांनी गर्दी केल्याचे आढळून आले तर तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्या ठिकाणी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. करोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी नागरिकांनी विनाकारण कोणत्या वेळी घराबाहेर पडू नये आणि नियंत्रण कक्षात कार्यरत अधिकारी कर्मचाऱ्यांनी सतर्क राहावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राला भेट देऊन तेथील करोनाच्या पार्श्वभूमीवर कामकाजाचा आढावा घेतला. या केंद्रामध्ये कोणत्या प्रकारचे दूरध्वनी येतात आणि त्यात करोनाविषयक किती दूरध्वनी असतात, याचा आढावा त्यांनी घेऊन तेथे नियुक्त केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्याचप्रमाणे मुंबई महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये असलेल्या सुविधांचा अभ्यास करून या ठिकाणी काय करता येईल याची पडताळणी करण्याच्या सूचनाही त्यांनी या वेळी दिल्या.

ठाणेकरांना घरपोच सामान सुविधा

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र शासनाने लागू केलेल्या टाळेबंदीत किराणा माल, दूध, भाजीपाला, मटण, चिकन तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली असली तरी या ठिकाणी खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. सातत्याने आवाहन करूनही गर्दी कमी होत नसल्यामुळे महापालिका प्रशासनाने आता नवा पर्याय पुढे आणला असून त्यानुसार महापालिकेने प्रभाग समितीनिहाय दुकानदारांची मोबाइल क्रमांकासह यादी जाहीर केली आहे. या क्रमांकाच्या आधारे परिसरातील दुकानदारांना मोबाइलवर फोन करून घरपोच साहित्य मागविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

करोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरात टाळेबंदी करण्यात आली आहे. त्यातून किराणा माल, दूध, भाजीपाला, मटण, चिकन तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळण्यात आली आहेत. या दुकानांमध्ये नागरिकांनी खरेदी करताना सामाजिक अंतर ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, सामाजिक अंतराचा नियम पायदळी तुडवून नागरिक दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी करीत आहेत. काही ठिकाणी नागरिक विनाकारण घराबाहेर पडत असून पोलिसांनी पकडल्यानंतर किरणा तसेच विविध वस्तूंच्या खरेदीसाठी घराबाहेर पडल्याची कारणे सांगत आहेत. त्यामुळे  पालिकेने प्रभाग समितीनिहाय दुकानदारांची मोबाइल क्रमांकासह यादी जाहीर केली आहे. माजिवाडा-मानपाडा, वर्तकनगर, लोकमान्यनगर, नौपाडा-कोपरी, उथळसर, वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा या प्रभाग समितीनिहाय यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये किराणा माल, दूध, भाजीपाला, मटण, चिकन तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांचा समावेश आहे. नागरिकांनी महापालिकेने जाहीर केलेल्या दुकानदारांच्या क्रमांकावर संपर्क साधून घरपोच मागवावे, असे आवाहन ठाणे महापालिकेचे उपायुक्तसंदीप माळवी यांनी केले.

कल्याण, टिटवाळय़ात खासगी वाहतूक बंद

कल्याण : करोना विषाणू्चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी टाळेबंदी करण्यात आली असतानाही कल्याण, टिटवाळा शहरांत अनेक नागरिक विनाकारण वाहने रस्त्यावर घेऊन फिरत असून अशा नागरिकांना रोखण्यासाठी डोंबिवलीप्रमाणेच कल्याण पूर्व, पश्चिम आणि टिटवाळा क्षेत्रात सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंदी घालण्याचा निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे. हा निर्णय दूध, किराणा, भाजीपाला, औषधे अशा जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी लागू राहणार नसल्याचे आयुक्त सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले आहे.

कल्याण, डोंबिवली या शहरांतील करोनाबाधितांची संख्या ठाणे जिल्ह्यात सर्वात जास्त आहे. असे असतानाही या शहरांत संचारबंदी आणि टाळेबंदीचे काटेकोर पालन होताना दिसत नाही. कल्याण, टिटवाळा शहरांत अनेक नागरिक सकाळपासून रात्री उशिरापर्यंत विनाकारण वाहने रस्त्यावर घेऊन फिरत असल्याचे चित्र होते. त्यामुळे या भागांत वाहतूक बंदी करण्याचा निर्णय पालिका आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी घेतला. पोलीस उपायुक्त विवेक पानसरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तसेच ही वाहने जप्त करण्यात येतील, अशी तंबीही देण्यात आली आहे.

हनुमान जयंती, उरूस, जत्रा रद्द

कल्याण :  ठाणे जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात असलेल्या अनेक गावामंध्ये चैत्र पौर्णिमा काळात हनुमान जयंती उत्सव, पीर बाबाचा उरूस आणि जत्रांचा हंगाम असतो. मात्र, यंदा करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदी आदेश दिले असल्याने आणि देशभर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे गावांमधील धार्मिक उत्सव आणि जत्रा रद्द करण्याचा निर्णय स्थानिक ग्रामपंचायतींनी घेतला आहे.

गावचे सरपंच, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांनी गावांमध्ये बैठका घेऊन सर्व धर्माच्या मंडळींना एका बैठकीला बोलावून त्यांना करोना विषाणूमुळे जगभरात होत असलेली परिस्थिती आणि त्यामुळे आपण गावची घ्यावयाची काळजी या विषयावर मार्गदर्शन केले आहे. हे म्हणणे हिंदू, मुस्लीम समाजातील मंडळींनी मान्य केले आहे. त्यामुळे या वेळी प्रथमच गावांमध्ये हनुमान जयंती, उरुसाचे उत्सव होणार नाहीत. ठाणे जिल्ह्य़ातील शहापूर तालुक्यातील शेणवे गावात ९० वर्षांपासून हनुमान जयंती आणि पीरबाबाचा उत्सव गावकरी पारंपरिक प्रथेप्रमाणे एकत्रितपणे साजरा करतात. यंदा  प्रथमच हे दोन्ही उत्सव साजरे होणार नाहीत.