डोंबिवली : डोंबिवलीतील क्रिकेटपटू श्रेयस गुरव यांची मुंबई रणजी संघात निवड झाली आहे. क्रिकेटमध्ये मास्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रेयस यांचा रणजी संघ निवडीच्या दिशेने प्रवास सुरू झाला होता. या क्षणाची श्रेयस यांचे प्रशिक्षक, सहकारी क्रिकेटपटू वाट पाहत होते. अखेर मुंबई रणजी संघात श्रेयस यांची निवड झाली.श्रेयस यांची मुंबई रणजी संघात निवड व्हावी यासाठी प्रत्येकाची इच्छा होती. अखेर त्या इच्छेप्रमाणे ही निवड झाल्याने श्रेयस यांचे क्रिकेटमधील डोंबिवलीतील ज्येष्ठ प्रशिक्षक राजन धोत्रे आणि सहकारी मित्रांनी समाधान व्यक्त केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

श्रेयस गुरव डोंबिवली पूर्वेतील सारस्वत काॅलनीमध्ये राहतात. ते स. वा. जोशी शाळेचे विद्यार्थी आहेत.बालपणापासून श्रेयस यांना क्रिकेट खेळण्याची आवड होती. इयत्ता चौथीमध्ये असल्यापासून श्रेयस यांनी डोंबिवलीतील क्रिकेट प्रशिक्षक राजन धोत्रे यांच्याकडे क्रिकेट प्रशिक्षणाला सुरूवात केली. या प्रशिक्षणातून श्रेयस यांना क्रिकेटमधील अष्टपैलु खेळाचे मार्गदर्शन मिळाले. अथक मेहनत, कष्ट करण्याची तयारी या सर्व गुणांवर मात करत श्रेयस यांनी रणजी संघातील निवडीचा मोलाचा पल्ला गाठला, असे प्रशिक्षक धोत्रे यांनी सांगितले.श्रेयस सुरुवातीला वेगवान गोलंदाज म्हणून ओळखला जायचे. नंतर त्यांनी त्यांची गोलंदाजीची पध्दत हळुहळू बदलली. आता ते स्पीनर गोलंदाज म्हणून ओळखले जातात. ते डावखुरा गोलंदाज आहेत. श्रेयस मुंबईतील कीर्ति महाविद्यालय, एमआयजी क्लबतर्फे खेळले आहेत. गेल्या वर्षभरात श्रेयस यांनी ८४ फलंदाजांच्या दांड्या गुल केल्या आहेत. हे कौतुकास्पद आहे, अशी माहिती प्रशिक्षक धोत्रे यांनी दिली.

रणजी संघात निवड झालेले श्रेयस हे तिसरे डोंबिवलीकर आहेत. यापूर्वी नीलेश कुलकर्णी, अजिंक्य राहणे यांची रणजी संघात निवड झाली होती. या दोन्ही क्रिकेटपटुंप्रमाणेच श्रेयस हे देखील रणजीमध्ये दमदार खेळी करतील, असा विश्वास त्यांच्या सहकार्यांना वाटतो. स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण, प्रशिक्षक राजन धोत्रे यांनी श्रेयस यांचे या निवडीबद्दल कौतुक केले.श्रेयस हे मेहनती क्रिकेटपटू आहेत. ते डावखुरे गोलंदाज आहेत. त्यांची मुंबई रणजीमध्ये निवड व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा होती. त्याप्रमाणे घडले. ते या निवडीला आपल्या दमदार खेळीतून न्याय देतील. त्यांना पुढे जशा संधी मिळतील त्याप्रमाणे त्यांना या खेळात उज्जवल भवितव्य आहे. राजन धोत्रे ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक, डोंबिवली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cricketer from dombivli shreyas gurav has been selected in mumbai ranji team sud 02