कल्याण : शिवसेनेच्या शिंदे गटातील एका प्रभावी गटाने महायुतीच्या कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या अधिकृत उमेदवार सुलभा गायकवाड यांचे काम करण्यास नकार दिला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण पूर्वेत महायुतीत बंडाचे वारे वाहत असतानाच, आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गुरूवारी सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कल्याणमध्ये येत असल्याने शिवसेनेतील बंडाच्या तयारीत असलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांना हा सूचक इशारा मानला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

कल्याण पूर्वेत आपण महायुतीच्या उमेदवार म्हणून सुलभा गायकवाड यांचेच काम करायचे आहे. कोणीही अपक्ष निवडणूक लढवू नये किंवा बंडखोरीचा पवित्रा घेऊ नये, अशी तंबी शिवसेनेच्या वरिष्ठांनी स्थानिकांना दिल्याचे समजते. या तंबीनंतर बंडाच्या पवित्र्यातील काही जण शांत तर काही जण अद्याप अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची जोरदार तयारी करत आहेत. सुलभा गायकवाड यांचे काम न करण्याची भूमिका शिवसेनेतील कल्याण पूर्वेतील काही माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे. या पदाधिकाऱ्यांना सुलभा गायकवाड याच महायुतीच्या उमेदवार असतील आणि मोठ्या मताधिक्याने त्या निवडून येतील, असा सूचक इशारा देण्याच्या व्यूहनितीचा भाग म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कल्याण पूर्वेत येण्याचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा…उमेदवार, पक्षीय कार्यालयांसमोरील पदाधिकाऱ्यांच्या वाहनांमुळे कल्याण-डोंबिवली शहरे वाहन कोंडीत

सुलभा गायकवाड गुरुवारी महायुतीच्या उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज भरतील. यावेळी शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी, रिपब्लिकन, इतर घटक पक्षांचे नेते, पदाधिकारी यावेळी उपस्थित असतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. महायुतीचा जनसागर गुरूवारी सुलभा गायकवाड यांचा उमेदवारी अर्ज भरताना लोटलेला असेल. तुल्यबळ असा उमेदवार समोर नसल्याने त्यांचा विजय नक्की होईल, असा विश्वास भाजपचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांनी व्यक्त केला. पती आमदार गणपत गायकवाड यांनी कल्याण पूर्व भागात केलेली विकास कामे. आपण येत्या काळात करणारी विकास कामे हा अजेंडा लोकांसमोर ठेऊन आपण या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत, असे महायुतीच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी सांगितले.

हेही वाचा…मुरबाडमध्ये महायुतीतच पदाधिकाऱ्यांची पळवापळवी, बदलापूर शिवसेना उपशहरप्रमुखाचा भाजपात प्रवेश

राज ठाकरे डोंबिवलीत

मनसेचे कल्याण ग्रामीणचे उमेदवार प्रमोद उर्फ राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे गुरुवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान डोंबिवलीत येणार आहेत. मानपाडा चौक येथून उमेदवार राजू पाटील यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या मिरवणुकीला सुरूवात होईल. ही मिरवणुक वाजत गाजत डोंबिवली एमआयडीसीतील सावळाराम महाराज क्रीडासंकुल येथे जाणार आहे. राज ठाकरे यांनी स्वताहून आपण राजू पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी येण्याची घोषणा केली आहे. यानिमित्ताने मनसेतर्फे शक्तिप्रदर्शन केले जाणार आहे.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Devendra fadnavis and raj thackeray in kalyan dombivli on thursday to file nomination papers sud 02