बदलापूर : दिवाळीच्या उत्साहात रंगलेल्या बदलापूरकरांच्या आनंदावर ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आभाळातून पाण्याने अक्षरशः पाणी फेरले. संध्याकाळी अचानक विजांच्या कडकडाटासह वाऱ्याचा जोर वाढला आणि त्यानंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. या अवकाळी पावसामुळे नागरिकांचा उत्साह ओसरला, रांगोळ्या पुसल्या गेल्या, किल्ले व कंदील भिजले आणि फटाके फोडण्याचा आनंदही ओला झाला. बाजारात असलेल्या नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
सकाळपासून शहरात उत्सवी वातावरण होते. दिवाळीच्या निमित्ताने घराघरांत स्वच्छतेची लगबग, सजावट, रांगोळ्या आणि दिव्यांनी उजळलेले अंगण अशी रंगत दिसत होती. संध्याकाळी लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू असतानाच हवामानाने अचानक बदल केला विजांचा कडकडाट, गार वाऱ्याच्या झुळका आणि अवकाळी पावसाने अनेकांचे नियोजन विस्कळीत झाले.
बदलापूरसह आसपासच्या परिसरात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. रस्त्यावर पाणी साचले, बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची धावपळ उडाली. अनेक जणांना सामान घेऊन आसरा शोधावा लागला. रांगोळ्या, किल्ले, कंदील आणि सजावटीचे साहित्य भिजल्याने मुलांचाही हिरमोड झाला. अनेक ठिकाणी किल्ले स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे मुलांनी सुट्ट्या लागल्यापासून किल्ले उभारणीचे काम केले. मात्र त्यानंतर पावसाने हजेरी लावल्याने मुलांची सर्व मेहनत पाण्यात गेली. अनेकांनी तातडीने किल्ले झाकले. मात्र तोपर्यंत पावसाने किल्ले साफ धुतले होते.
यंदाचा पावसाळा काही संपतच नाही. मे महिन्यापासून पाऊस सुरू आहे आणि आज दिवाळीतही थांबत नाही. हवामान खात्याने पावसाची शक्यता वर्तवली नव्हती, त्यामुळे कोणी तयारीही केली नव्हती, अशी भावना एका नागरिकाने व्यक्त केली.
दरम्यान, या अवकाळी पावसामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. त्यामुळे घरांमध्ये पणत्यांची संख्या वाढवावी लागली. दिवाळीच्या सणावर अशी आभाळाची नाराजी पाहून नागरिकांनी नाराजी व्यक्त केली. “रांगोळ्या पुसल्या, फटाके ओले झाले, आणि सणाचा आनंदच हरवला,” अशी खंत अनेकांनी व्यक्त केली.
तथापि, काहींनी याला सकारात्मकतेने घेत म्हटले की, “लक्ष्मीपूजनाच्या दिवशी निसर्गाचीही कृपा झाली, पावसाच्या रूपाने धनधान्याची बरसात झाली,” अशा प्रतिक्रिया काही वयोवृद्ध नागरिकांनी दिल्या.