डोंबिवली – डोंबिवली एमआयडीसी परिसरात दिनकर हाईट्स ही कल्याण डोंबिवली पालिकेच्या अधिकृत बांधकाम परवानग्या घेऊन आणि महारेराचा नोंदणी क्रमांक घेऊन उभारण्यात आली आहे, असे एका घर खरेदीदाराला सांगून या घर खरेदीदाराकडून घर विक्रीचे २१ लाख ५१ हजार वसूल करून दोन भूमाफियांनी डोंंबिवलीतील एका घर खरेदीची फसवणूक केली आहे.

विशेष म्हणजे घर खरेदी विक्रीचे बनावट कागदपत्र असताना सह दुय्यम निबंधक कल्याण क्रमांक दोन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी या कागदपत्रांची खात्री न करता हे दस्त नोंदणीकृत केले आहेत. डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभारून त्यांना महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून या इमारती घर खरेदीदारांना विकण्याचा धंदा ३५० भूमाफियांनी केला आहे. या इमारती उच्च न्यायालयाच्या रडारवर असून न्यायालयाने त्या जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले आहेत.

आता हे प्रकरण तापले असतानाच, कल्याण डोंबिवली पालिकेची इमारत बांधकाम मंजुरीची बनावट कागदपत्रे तयार करून, त्या इमारतीला महारेराचा नोंदणी क्रमांक मिळवून त्या इमारती मधील सदनिका एका घर खरेदीला ती इमारत अधिकृत आहे असे दाखवून विकण्यात आली आहे. या घर खरेदीदाराच्या हा प्रकार निदर्शनास आल्यावर त्याने मानपाडा पोलीस ठाण्यात भूमाफियांविरूध्द तक्रार केली आहे.

कुणाल राजेश बिवलकर असे तक्रारदार नागरिकाचे नाव आहे. ते नोकरी करतात. बिवलकर यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सचिन अनंत निवाते, अनिल गेमु चव्हाण यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे. निवाते हे ठाणे शहरात मानपाडा झेनिया निळकंठ प्रिन्स भागात राहतात. चव्हाण हे डोंबिवली एमआयडीसीतील विको नाका येथील नंदी पॅलेस हाॅटेल जवळील दिनकर हाईटस इमारतीत राहतात. मल्हार बिल्डकाॅन आणि दिनकर हाईटस या ठिकाणी हा फसवणुकीचा प्रकार ३ नोव्हेंबर २०२१ ते मे २०२२ या कालावधीत घडला आहे, असे पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे.

तक्रारदार कुणाल बिवलकर यांनी पोलीस ठाण्यातील तक्रारीत म्हटले आहे, की सचिन अनंत निवाते आणि अनिल गेमु चव्हाण या भूमाफियांनी डोंबिवली पूर्वेतील गोळवली भागातील सर्व्हे क्रमांक तीन आणि हिस्सा क्रमांक चार येथे दिनकर हाईट्स नावाने इमारत उभारली. या इमारतीमध्ये आपण घर पसंत केले. त्यावेळी निवाते आणि चव्हाण यांनी ही इमारत अधिकृत आहे. या इमारतीला कल्याण डोंबिवली पालिकेच्या बांधकाम परवानग्या आहेत. आणि या इमारतीला महारेराचा नोंदणी क्रमांक आहे, असे सांगितले. ही इमारत अधिकृत आहे असे समजून बिवलकर यांनी दिनकर हाईट्समधील सदनिका क्रमांक ४०७ २१ लाख ५१ हजार रूपयांना खरेदी केली.

गंगाबाई हरी भंडारी यांच्या नावाची बांधकाम मंजुरी, पालिकेची बांधकाम मंजुरीची कागदपत्रे जोडून निवाते आणि चव्हाण यांनी कुणाल बिवलकर यांना सह दुय्यम निबंधक कार्यालय कल्याण क्रमांक दोन या ठिकाणी ही सदनिका दस्त नोंदणीकृत करून देऊन विक्री केली. आपण खरेदी केलेली सदनिका ही बेकायदा इमारतीत आहे याची जाणीव झाल्यावर बिवलकर यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात जाऊन भूमाफिया सचिन निवते आणि अनिल चव्हाण यांच्या विरूध्द फसवणुकीचा तक्रार केली आहे. साहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.