डोंबिवली – अभ्यासू, कसलेला आणि मुरब्बी राजकारणी म्हणून ओळख असलेले डोंबिवली पश्चिमेतील शिंदे शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक दिवंगत वामन सखाराम म्हात्रे यांचा मुलगा अनमोल म्हात्रे यांनी काही तासांपूर्वी समाज माध्यमावर ‘आता राजकारणातील नवीन अध्यायाला सुरूवात करण्याची वेळ आली आहे,’ असा मजकूर प्रसारित केल्याने दिवंगत वामन म्हात्रे यांच्या समर्थकांसह, महिला मंडळ, महिला बचत गटाच्या महिलांसह डोंबिवली शहर परिसरातील दिग्गज ज्येष्ठ राजकीय मंडळींच्या भुवया उंचावल्या आहेत.
आपल्या अभ्यासू वृत्तीमुळे कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनावर, कोणत्याही पक्षाचा राजकारणी असो त्यांच्याशी विविध विषयांवर चर्चा करण्यात वामन म्हात्रे यांचा हातखंडा आणि हुकमत होती. पालिकेतील सत्तेची उलथापालथ करण्यात ते माहीर होते. शिवसेना-भाजपचे बहुमत असताना वीस वर्षापूर्वी वामन म्हात्रे यांच्या राजकीय खेळीमुळे कल्याण डोंबिवली पालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक पुंडलिक म्हात्रे महापौरपदी विराजमान झाले होते. यावेळी शिवसेनेतून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या वामन म्हात्रे यांचे एक मत निर्णायक ठरले होते.
राजकारण्यांना आपल्या तालावर नाचविण्याची ताकद असलेल्या शिंदे शिवसेनेतील वामन म्हात्रे यांचा मुलगा अनमोल म्हात्रे यांनी आगामी पालिका निवडणुका तोंडावर असताना अचानक राजकारणात वेगळी वाट चोखाळण्याचा निर्णय जाहीर केल्याने मग बिनसले कुठे, अशी चर्चा डोंबिवली पश्चिमेतील महाराष्ट्रनगर, प्रसाद सोसायटी, देवीचापाडा प्रभागांमध्ये सुरू झाली आहे.
आगामी पालिका निवडणुकीसाठी देवीचापाडा येथून संदेश पाटील, महाराष्ट्रनगरमधून बाळा म्हात्रे किंवा अनमोल म्हात्रे, राजूनगर, गणेशनगर भागात विकास म्हात्रे आणि त्यांच्या पत्नी उभी राहणार अशी ठोकताळ्याची कच्ची प्रभाग रचना स्थानिक शिवसेना पदाधिकाऱ्यांनी वकिली सल्ल्याने केली आहे. अनमोल यांच्या या कृतीमुळे गणेशनगर ते देवीचापाडा येथील पालिका प्रभागातील चार सदस्यांच्या निवडणूक प्रक्रियेत गोंधळ होण्याची शक्यता स्थानिक कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.
आता अनमोल म्हात्रे कोणत्या पक्षात जाणार याकडे सगळ्यांचे नजरा लागल्या आहेत. भांडुप येथील त्यांची ज्येष्ठ बहिण आणि मुंबई पालिकेतील माजी नगरसेविका जागृती पाटील यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे त्या वाटचाल करतील अशी चर्चा आहे. महाराष्ट्रनगर प्रभागातील कोकणी मतदारांचा विचार करून ते भाजपकडे जातील, अशी चर्चा आहे. याविषयी उघडपणे बोलण्यास कोणीही तयार नाही. अनमोल म्हात्रे यांनी राजकारणात वेगळी चूल मांडली तर मात्र महाराष्ट्रनगर, देवीचापाडा प्रभागात शिंदे शिवसेनेत उभी फूट पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रनगर, देवीचापाडा हे आपले हक्काचे प्रभाग असताना, त्या प्रभागात अन्य कुणाला का मदत करायची असाही एक मतप्रवाह स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्यामुळे ही वेगळ्या वाटेची बिजे रुजली असल्याची चर्चा आहे. अनमोल यांनी वेगळी वाट चोखाळली तर डोंबिवली पश्चिमेत भाजप, ठाकरे गटातील वजनदार माजी नगरसेवकांबरोबर शिंदे शिवसेनेलाही झटका बसण्याची राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
माझ्या नवीन कार्यालयाचे गोपीनाथ चौकात उद्घाटन करत आहे. त्यानिमित्ताने समर्थक कार्यकर्त्यांना संघटित करत आहे. अन्य पक्षात जाण्याचा सध्या तरी विचार नाही. – अनमोल वामन म्हात्रे, शिंदे शिवसेना पदाधिकारी, महाराष्ट्रनगर.
