डोंबिवली – डोंबिवली शहरातील एक वजनदार नगरसेवक म्हणून ख्याती असलेले, २७ गाव परिसरावर वर्चस्व असलेले शिंदे शिवसेनेचे माजी नगरसेवक आणि खासदार डाॅ. श्रीकांत शिंदे यांचे खंदे समर्थक महेश पाटील यांनी मंगळवारी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी त्यांची बहिण शिंदे शिवसेनेतील माजी नगरसेविका डाॅ. सुनिता पाटील, सायली विचारे यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला.
महेश पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदे शिवसेनेला डोंबिवली पूर्वेतील आजदे, सागर्ली, कल्याण ग्रामीण पट्ट्यात मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत. यापूर्वी महेश पाटील हे भाजपचे कार्यकर्ते होते. काही वर्षापूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मागील काही महिन्यांपासून महेश पाटील यांची शिंदे शिवसेनेत घुसमट सुरू होती. शिंदे शिवसेनेतील एक विकासपुरूष नेता आणि त्यांच्या चाणाक्याच्या चढेगिरी कार्यपध्दतीला महेश पाटील कंटाळले होते, अशी चर्चा पाटील समर्थकांमध्ये सुरू आहे.
काही महिन्यापूर्वी महेश पाटील यांनी आपल्या नवीन घरात प्रवेश केला. त्यावेळी आयोजित वास्तुशांतीच्या कार्यक्रमात आपली घुसमट महेश यांनी भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याजवळ बोलून दाखवली होती. तेव्हापासून महेश पाटील भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. परंतु, ते अचानक भाजपमध्ये उडी घेतील असे शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना वाटले नव्हते.
वामन म्हात्रे यांचा मुलगा अनमोल यांना भाजपमध्ये प्रवेश दिल्याच्या कार्यक्रमानंतर भाजप कार्यकर्त्यांना डोंबिवली पूर्व भागात या एवढाच संदेश देण्यात आला होता. पूर्व भागातून कोणता पदाधिकारी भाजपमध्ये येणार याविषयी कमालीची गुप्तता भाजपने बाळगली होती. पूर्व भागात गेल्यानंतर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण थेट महेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयात गेले. त्यावेळी महेश आपल्या डाॅक्टर बहिणीसह भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले.
रवी दादावर जीव गाणे
प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण महेश पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या परिसरात येताच, भाजपसह महेश पाटील यांच्या समर्थकांच्या मोबाईलवर मोठ्या आवाजात ‘लाख मोलाच्या जनतेचा, रवी दादावर जीव हाय रे’ हे गाणे वाजविले जात होते.
प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्या उपस्थितीत महेश पाटील, डाॅ.सुनिता पाटील, सायली विचारे आणि त्यांच्या समर्थक पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यात आला. यावेळी भाजपचे दीपेश म्हात्रे, मंदार हळबे, मंडल पदाधिकारी, ग्रामीण भाजपचे कार्यकर्ते अधिक संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेची बैठक
डोंबिवलीत शिंदे शिवसेनेचे म्होरके फोडून त्यांना भाजपमध्ये प्रवेश देण्याच्या हालचाली सुरू असताना डोंबिवली शिवसेना मध्यवर्ति कार्यालयातून शिवसेना पदाधिकाऱ्यांना तातडीने मध्यवर्ति शाखेत येण्याचे संदेश देण्यात येत होेते. या पक्षप्रवेशांमुळे शिंदे शिवसेनेत अस्वस्थता पसरली आहे.
इतर नगरसेवक रांगेत
शिंदे शिवसेनेत मानाची पदे भूषवलेले डोंबिवलीतील काही कोकणी नगरसेवक, कल्याण पूर्वेतील एक खिलाडी आणि इतर काही नगरसेवक लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे. कल्याण डोंबिवली पालिकेवर महायुतीचाच महापौर बसेल, असे खा. डाॅ. शिंदे यांनी वक्तव्य करूनही भाजप नेते भाजपचा महापौर पालिकेवर असेल यादृष्टीने कामाला लागले आहेत.
