कल्याण : दिवाळीनिमित्त एका महिलेने कल्याणमधील शिवाजी चौक परिसरातील एका सराफाच्या दुकानात दोन लाख रूपये किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केले. सोने खरेदी करून ही महिला आपल्या एक सहकारी महिलेसह इतर खरेदीसाठी शिवाजी चौक भागात आली. त्यावेळी पिशवीत ठेवलेले सोने भुरट्या चोरट्याने या महिलेची नजर चुकून चोरून नेले.

शनिवारी संध्याकाळी कल्याण पश्चिमेतील शिवाजी चौक या वर्दळीच्या रस्त्यावर हा चोरीचा प्रकार घडला आहे. नागरिक दिवाळीनिमित्त खरेदीसाठी अधिक प्रमाणात बाहेर पडले आहेत. या गर्दीचा फायदा घेत अनेक भुरटे चोर बाजारात फिरत आहेत. कल्याण, डोंबिवलीतील सराफांची दुकाने, बँकांच्या बाहेर या चोरट्यांचा वावर वाढला असल्याची माहिती आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात या चोरीप्रकरणी महिलेने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आहे.

रेखा उर्फ रेश्मा उल्हास मोरे असे तक्रारदार महिलेचे नाव आहे. त्या उल्हासनगरमधील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर नगर, चोपडा न्यायालयाजवळील परिसरात कुटुंबीयांसह राहतात. त्या गृहिणी आहेत. पोलीस ठाण्यातील तक्रारीतील माहिती अशी, की दिवाळीनिमित्त घरात सोने-नाणे असावे म्हणून तक्रारदार रेश्मा मोरे आणि त्यांची शेजारीण मैत्रिण गंगा अंकुश भालेराव या शनिवारी संध्याकाळी कल्याण पश्चिमेत शिवाजी चौक भागातील सराफाच्या दुकानात सोने खरेदीसाठी आल्या होत्या. शिवाजी चौक भागातील श्री चिंतामणी ज्वेलर्स दुकानात रेश्मा आणि त्यांच्या मैत्रिणीने सोन्याचे दागिने खरेदी केले. यामध्ये वाघ नख पॅडल २२ कॅरट आणि त्या सोबत संगमरवर स्टोन होते. असा एकूण एक ९२ हजार रूपयांचा ऐवज रेश्मा मोरे यांनी खरेदी केला होता.

सोने खरेदी केल्यानंतर दुकानातच रेश्मा मोरे यांनी खरेदी केलेले सोने हातामधील पिशवीत ठेवले. त्या दुकानातून बाहेर पडल्या. शिवाजी चौकातून त्या इतर खरेदीसाठी जात होत्या. त्या वेळेत पाळत ठेऊन असलेल्या भुरट्या चोरट्याने रेश्मा यांना काही न कळून देता त्यांचा पाठलाग करून त्यांचे हातामधील पिशवीकडे लक्ष नाही हे पाहून पाठीमागूनच पिशवीतील नव्याने खरेदी केलेली सोन्याची पिशवी अलगद काढून घेतली. आणि चोरटा पळून गेला.

पुढे काही अंतर गेल्यावर रेश्मा यांचे लक्ष आपल्या हातामधील पिशवीकडे गेले. तेव्हा त्यांना पिशवीत नव्याने खरेदी केलेला सोन्याचा ऐवज दिसला नाही. त्यांनी पिशवी तपासली सोन्याचा ऐवज त्यात नव्हता. त्या पुन्हा सराफाच्या दुकानाच्या दिशेने पिशवीतील सोन्याची पिशवी कोठे पडली आहे का हे पाहण्यासाठी माघारी फिरल्या. पण त्यांना कोठेही सोन्याची पिशवी आढळली नाही. भुरट्या चोरट्याने ती चोरून नेल्याचा संशय व्यक्त करून रेश्मा मोरे यांनी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलीस उपनिरीक्षक एस. डी. बुनगे तपास करत आहेत.