ठाणे : पुर्व द्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलाचे रुंदीकरण केल्यानंतर मुंबई-ठाणे प्रवास सुखकर होईल, असे दावे केले जात होते. मात्र आनंदनगर ते साकेत या नव्या उन्नत पुलाच्या कामामुळे पुन्हा एकदा हा पूल अरुंद झाला आहे. एक प्रकल्प पुर्ण होत नाही तोच शेकडो कोटी रुपये खर्च करुन त्याच मार्गावर आणखी एका उन्नत मार्गाचा घाट घातला गेल्याने प्रवाशांना विनाकारण वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरातून पुर्व द्रुतगती महामार्ग जातो. या मार्गावरून ठाणेकर आणि त्यापलिकडील कल्याण, भिवंडी येथील अनेक जण कामानिमित्ताने दररोज प्रवास करतात. कोपरी रेल्वे उड्डाण पुल अरुंद असल्याने वाहतूक कोंडी व्हायची. त्यानंतर पुलाचे रुंदीकरण करण्यात आले. रुंदीकरणानंतर कोंडीची समस्या मिटेल, असा दावा शिंदे आणि त्यांच्या अखत्यारितील ‘एमएमआरडीए’कडून करण्यात आला होता. प्रत्यक्षात नेमका उलट अनुभव येऊ लागला असून आनंदनगर ते कोपरी पुलाच्या मध्यभागावर नव्या उन्नत मार्गाचा घाट घालून ‘एमएमआरडीए’ने प्रवाशांचा मागे पु्न्हा एकदा कोंडीचा ससेमिरा लावला आहे.
कोपरी रेल्वे उड्डाण पुलाचे रुंदीकरण करत दोन्ही बाजूस प्रत्येकी चार अशा एकूण आठ मार्गिका तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापैकी मुंबईहून ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या दोन मार्गिकांवर आनंदनगर ते साकेत पूर्व द्रुतगती उन्नत मार्गाच्या कामासाठी मार्गरोधक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे दोनच मार्गिका वाहतूकीसाठी उपलब्ध आहेत. या कोंडीचा फटका अंतर्गत मार्गांनाही बसत आहे. ठाणे स्थानकातून गोखले रोड, राम मारुती रोडमार्गे तिनहात नाका, नितीन कंपनीमार्गे रिक्षा आणि बसगाड्यांची वाहतूक सुरू असते. ही वाहने कोंडीत अडकत आहेत. विक्रोळी कांजूरमार्ग भागातही आनंदनगर ते छेडा नगर मार्गिकेचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई ते ठाणे प्रवासाचा कालावधी दुप्पट झाल्याचे वाहनचालकांनी सांगितले.
२० मिनिटांच्या प्रवासाला एक तास
ठाणे पुर्व द्रुतगती मार्गावरील तीन हात नाका ते माजिवाड्यापर्यंत मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. या कामामुळे हा मार्ग अरुंद झाल्याने कोंडी होते. आनंदनगर ते साकेत पुर्व द्रुतगती उन्नत मार्गाची उभारणी सुरू झाल्याने कोपरी रेल्वे उड्डाण पुल, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी जंक्शन आणि माजिवाडा या चौकांसह विविध ठिकाणी मार्गरोधक उभारण्यात आले आहेत. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून वाहतूक कोंडी जैसे थे आहे. २० मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी एक ते दीड तास लागत आहे. टोलनाका ते कोपरी पूल हे अवघ्या काही मिनीटांचे अंतर पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागत आहे.
एक काम पुर्ण केले तर लागलीच दुसरे काम हाती घेतले जाते. कोंडीमुक्तीसाठी तुम्हाला हे सहन करावे लागेल असे गाजर दाखविले जाते. मुंबई-ठाणे प्रवास दोन ते अडीच तासांचा झाला आहे. या फेऱ्यातून आमची कधी सुटका होईल ? – पंकज माने, रहिवासी, वर्तकनगर, ठाणे
आनंदनगर ते साकेत प्रकल्पाचे काम अद्याप काही ठिकाणी सुरु आहे. त्यामुळे वाहतुक बदलासंदर्भात कोणतीही अधिसूचना काढण्यात आलेली नाही. – पंकज शिरसाट, उपायुक्त, ठाणे वाहतुक पोलीस