ठाणे : मागील काही तासांपासून मुंबई, ठाणे, पालघरसह कोकण विभागात सुरु असलेल्या मुसळधार पावसानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातून कोकण विभागातील पावसाच्या परिस्थितीबाबत आढावा घेतला. पाऊस पडत असल्याने त्यांनी सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश दिले. ज्या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते तेथील नागरिकांना इतरत्र हलविण्याच्या सूचना त्यांनी केल्या. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये तसेच अफवा पसरविणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. नुकसान भरपाईचा प्रस्ताप शासनाकडे पाठविला जाईल असेही त्यांनी सांगितले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी दुपारी कोकणातील मुंबईसह चार जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीच्या परिस्थितीचा आढावा घेतला. शनिवारी रात्री बदलापूरमध्ये एक व्यक्ती वाहून गेला. यंत्रणा सतर्क असल्याने रविवारी कुठेही जीवित आणि पशूधनाची हानी झाली नाही. पाणी साचले तेथील पाण्याचा निचरा करण्यात आला आहे. ज्याठिकाणी सखल भागात पाणी साचू शकते आणि पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. तेथील नागरिकांना इतरत्र हलविण्याच्या सूचना करण्यात आल्या. शाळा, महाविद्यालयातील वर्ग खोल्या उपलब्ध करुन देण्यात येतील. ठाणे, भिवंडी आणि उल्हासनगर महापालिका क्षेत्रातील धोकादायक इमारतींवर लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत. गरज पडल्यास तेथील नागरिकांनाही इतर ठिकाणी हलविले जाईल असे शिंदे यांनी सांगितले.
जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील नुकसान भरपाईचा पंचनामा करुन प्रस्ताव सरकारकडे पाठविण्यात आला आहे. तसेच सप्टेंबर महिन्यातील प्रस्ताव देखील पाठविला जाईल असेही ते म्हणाले. वृक्ष विजेच्या तारांवर तुटून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे महावितरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना केल्या आहेत. मासेमारीला गेलेल्या बोटी परतल्या आहेत. भातसा धरण क्षेत्रात पाऊस वाढला आहे. या धरणाचे पाच दरवाजे साडेतीन मीटरने उघडले असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या आणि दक्षतेचा इशारा दिल्याचे शिंदे यांनी सांगितले.
आम्ही शेतकऱ्यांसोबत
मराठवाड्यात देखील यंत्रणा सतर्क आहे. येथील नागरिकांना मदत पोहचत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा शासन, स्वयंसेवी संस्था आणि कार्यकर्ते करत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. शेतकरी, माता-भगिनींच्या डोळ्यात अश्रू आहेत. त्यांचे मोठे नुकसान झाले. येथील नागरिकांना मदत देताना नियमावर बोट ठेवले जाणार नाही. काही अटीशर्ती आहेत, त्या शिथील कराव्या लागतील. शेतकऱ्यांना भरीव मदत दिली जाईल. १०० वर्षांत इतका मोठा पाऊस तेथे झाला नव्हता. ज्या ठिकाणी नुकसान झालेआहे, तिथे शासन पूर्णपणे काम करत आहे असे शिंदे यांनी सांगितले. तसेच राजकारण करण्याची वेळ नाही. शेतकऱ्यांच्या मागे उभे राहून त्यांचे अश्रू पुसायचे आहेत असेही ते म्हणाले.