ठाणे : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भाजपसोबत एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. राज्यातील राजकारणामधील एक महत्त्वाची घडामोड म्हणून या घटनेकडे पाहिले जाते. याविषयी आता एकनाथ शिंदे यांनीही एक वक्तव्य केले आहे. निर्णयाबाबत त्यांच्या मनामध्ये शंका होती असे ते ठाण्यातील एका कार्यक्रमात म्हणाले होते. नेमके एकनाथ शिंदे काय म्हणाले वाचूया..
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शनिवारी ‘शिवसेना पुरस्कृत साई दर्शन फाऊंडेशन आयोजित महिला बचतगट स्नेह संमेलन २०२५’ या कार्यक्रमात बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थाची निवडणुका सुरू झाल्या आहेत. नगरपालिका, जिल्हा परिषदा आणि आता येणाऱ्या महापालिकांमध्ये आपल्याला महायुतीचा भगवा फडकवायचा आहे. खूप लोकांना पोटदुखी, जळमळ-मळजळ होत असते. पण मी त्याची काही चिंता करत नाही. मी मुख्यमंत्री झाल्यापासून एकनाथ शिंदे यांचे सरकार पडणार, मुख्यमंत्रीपद जाणार असे म्हणत. पण मी पूर्ण कालावधी महाराष्ट्राची सेवा करत राहिलो. आता देखील पोटदुखी सुरू आहे आणि त्या पोटदुखीसाठी मी मोफत उपचारासाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू केला आहे अशी टीका त्यांनी विरोधकांवर केली.
लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीने फटाके फोडले. सरकार बनविणार म्हणून सगळ्या पदांचे वाटप झाले. कोण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सगळ्यांच्या भाषा बदलल्या. याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, त्याला बर्फाच्या लादीवर झोपवू सगळं-सगळं बोलू लागले. सगळे हॉटेल बुक झाली पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांच्या सगळ्या हॉटेलच बुकिंग रद्द करून टाकले आणि त्यांना घरी पाठवल असेही ते म्हणाले.
मनामध्ये शंका येत होती, निर्णय बरोबर आहे का?…- जिथे आपत्ती तिथे एकनाथ शिंदे आणि जिथे संकट तिथे शिवसेना हे समीकरण आहे. आनंद दिघे गुरुवर्य होते आणि त्यांनी शिकवण दिली, बाळासाहेबांची, दिघे साहेबांची शिकवण आपण घेऊन पुढे जात आहोत. जेव्हा उठाव केला, त्यावेळेस माझ्या मनामध्ये काही वेळा अशा शंकाही आल्या. आपण घेतलेला निर्णय बरोबर आहे का, पण लोकांनी, महाराष्ट्रातल्या जनतेने तो निर्णय स्वीकारला आणि तुमच्या एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने ८० जागा लढवून ६० जागा विधानसभेत जिंकल्या. महाराष्ट्रामध्ये इतिहास घडला. या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आपल्या विचारधारेला आणि आपल्या निर्णयाला स्वीकारल्याचे ते म्हणाले.
डेडिकेटेड टू काॅमन मॅन म्हणायला काय प्राॅब्लेम आहे….
– सर्वसामान्य माणसाचे सरकार म्हणून आम्ही काम करत आहोत. मी सीएम (मुख्यमंत्री) होतो तेव्हा लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन.. काय प्रॉब्लेम आहे कॉमन मॅन म्हणायला. आता मी ‘डीसीएम’ आहे. आता मी म्हणतो ‘डेडिकेटेड टू कॉमन मॅन.’ काय प्रॉब्लेम काय त्यात, काय शिंग सोन्याची लागतात का काय. आपला आपली नाळ बांधीलकी सर्वसामान्य माणसांबरोबर आहे. सर्वसामान्य माणूस हाच आपला केंद्रबिंदू आहे. त्याच्यासाठी जगायचे असते. आपले सरकार चालवायचे असते. मला काय मिळाले पेक्षा या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला काय मिळाले हे आपल्याला पाहायचे असते. आपला अजेंडा खुर्ची नाही आपला अजेंडा ज्या लोकांनी आपल्याला खुर्चीत बसवलय त्या लोकांनी चे प्रश्न काय आहेत, समस्या काय आहेत, त्या सोडवायचा अंजेडा आहे. संपत्ती किती आहे, मालमत्ता किती आहे यापेक्षा तुम्ही माणसे किती कमवली आणि माणसांच प्रेम किती कमवलं हे महत्त्वाचं आहे असेही शिंदे म्हणाले.
