लोकसत्ता प्रतिनिधी

बदलापूर: ठाणे जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात शासकीय आरोग्य सुविधा तोकडी आहे. लवकरच ही आरोग्य सुविधा विस्तारणार असून यात बदलापूर आणि मुरबाड येथील ग्रामीण रुग्णालयांतील खाटांची संख्या वाढवली जाणार आहे. बदलापूरच्या ग्रामीण रुग्णालयाची क्षमता २०० खाटांची केली जाणार असून मुरबाड ग्रामीण रुग्णालयातही आता २०० खाटा असतील. तर कल्याण तालुक्यातील गोवेली येथील रुग्णालयाचे नूतनीकरण करून खाटा वाढवल्या जाणार आहेत. त्याचा ग्रामीण भागातील रुग्णांना मोठा फायदा होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे अजूनही येथील रुग्णांना मुंबई आणि उपनगरातील रुग्णालयात धाव घ्यावी लागते. यात ग्रामीण भागातील रुग्णांचे योग्य उपचारांअभावी खूप हाल होतात. स्थानीक आमदार किसन कथोरे यांनीही याबाबत तातडीने बैठकीचे आयोजन करण्याबाबत मागणी केली होती. त्याची दखल घेऊन सध्या सुरू असलेल्या नागपूरमधील हिवाळी अधिवेशनादरम्यान मंगळवारी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या दालनात एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत अंबरनाथ, कल्याण आणि मुरबाड तालुक्यातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि बळकट करण्याबाबत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. तसेच कल्याण, अंबरनाथ, मुरबाड तालुक्यातील सध्याची आरोग्य व्यवस्था, त्यातील त्रुटी, आवश्यकता याविषयी चर्चा करण्यात आली.

आणखी वाचा- डोंबिवलीतील कर्करोग रुग्णालय रखडले, आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांच्याकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी

करोनाकाळात ग्रामीण भागातील अपुऱ्या आरोग्य सुविधांचा मुद्दा प्रकर्षाने समोर आला. त्यामुळे स्थानिक आरोग्य केंद्रांची सक्षमीकरण करणे, तिथे आवश्यक ते मनुष्यबळ, डॉक्टर्स, औषधसाठा उपलब्ध करून देणे याबाबत बैठकीत चर्चा झाली. मुरबाड आणि बदलापूर येथील ग्रामीण रग्णालयांमध्ये प्रत्येकी २०० खाटांची सोय उपलब्ध करून देण्यासाठी केंद्रीय आरोग्य विभागाकडे प्रस्ताव पाठविण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. बैठकीत झालेल्या चर्चेनुसार बदलापूर येथील ग्रामीण रुग्णालयात २०० खाटांची व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्यापैकी नव्या इमारतीत तातडीने ५० खाटा उपलब्ध होणार आहेत. तर मुरबाड येथील उपजिल्हा रुग्णालयात २०० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे. टोकावडे येथील रुग्णालयात सध्या ३० खाटांची सोय आहे. तिथे ५० खाटांची व्यवस्था केली जाणार आहे. दुर्गम भागातील आदिवासी रुग्णांना त्याचा लाभ होईल, अशी माहिती आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. या बैठकीला आरोग्य विभागाचे संचालक, सचिव, उपसचिव, ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-ढोकाळी-कोलशेत रस्ता निधी अभावी रखडपटटी, अरुंद रस्त्यावर होणाऱ्या कोंडीमुळे नागरिक हैराण

गोवेली येथील ग्रामीण रुग्णालयाची नवी इमारत बांधून सध्याच्या ३० खाटांऐवजी ५० खाटांची व्यवस्था होईल. त्यामुळे कल्याण ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळणार आहे. हे रूग्णालय कल्याण अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर असून अपघातावेळी याचा जखमींना फायदा होतो.

केवळ मुरबाड मतदारसंघच नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात चांगल्या दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करीत असून मंगळवारच्या बैठकीत यासंदर्भात काही चांगले निर्णय घेण्यात आले आहेत. येत्या काही दिवसात आरोग्य सुविधांमध्ये निश्चितच सुधारणा झालेली दिसेल. -किसन कथोरे, आमदार, मुरबाड विधानसभा.