कल्याण : उल्हासनगर शहरात सम्राट अशोकनगर भागात डिसेंबर १९९२ मध्ये झालेल्या एका खून प्रकरणातील पाच आरोपींची ३१ वर्षानंतर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयाचे अपर जिल्हा न्यायाशीध पी. एफ. सय्यद यांनी निर्दोष मुक्तता केली. सबळ पुराव्यांचा अभाव, जीर्ण झालेली तपासाची कागदपत्रे, गहाळ झालेला शवविच्छेदन अहवाल या तपास यंत्रणेच्या कार्यपध्दती विषयी न्यायालयाने तीव्र नापसंती व्यक्त करत या गुन्ह्यातील पाचही आरोपींची या खुनाच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली.
सुरेश दिनानाथ उपाध्याय, गौतम महादेव गायकवाड, मोहिद्दिन सिद्दीकी खान, कन्हैय्या बसण्णा कोळी, कुमार चेतुमल नागराणी अशी सुटका झालेल्या आरोपींची नावे आहेत. या पाचही जणांवर लकी प्रेमचंद भाटिया यांचा खून केल्याचा आरोप होता. मिळालेली माहिती अशी की, १६ डिसेंबर १९९२ रोजी लकी भाटिया हे रस्त्याने पायी चालले होते. त्यावेळी त्यांच्या पाठीमागून येऊन अचानक पाच जणांनी धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले होते. या प्रकरणाने उल्हासनगर शहरात खळबळ उडाली होती. या हल्ल्यानंतर हल्लेखोर पळून गेले होते.
भाटिया यांच्यावतीने उल्हासनगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तिंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला होता. या गुन्ह्याचा तपास करत असताना विविध माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरेश, गौतम, मोहिद्दीन, कन्हैय्या, कुमार यांना अटक केली होती. या आरोपींवर खून करणे, खुनाचा कट रचणे अशी भारतीय न्याय संहितेमधील कलमे लावण्यात आली होती. पोलिसांनी या खून प्रकरणात १९९४ मध्ये आरोपपत्र दाखल केले होते. पण, या आरोपींवरील आरोप निश्चिती डिसेंबर २०२४ मध्ये केली होती.
सुरूवातीला फरार असलेले हे आरोपी अटक केल्यानंतर जामीन घेतल्यानंतर न्यायालयात सुनावणीच्या वेळी कधी हजर राहिले नाहीत. त्यामुळे या प्रकरणातील सत्य बाहेर येण्यात अडथळे आले. या महत्वाच्या खून प्रकरणातील आरोपपत्रासह इतर कागदपत्रे जीर्ण झाली होती. साक्षीदारांचे जबाब जीर्ण कागदांमुळे न वाचण्या योग्य झाले होते. या आरोपपत्रात शवविच्छेदन अहवाल नव्हता. या प्रकरणातील गुन्ह्याची सिध्दता करण्यासाठी पोलिसांनी वेळच्या वेळी आवश्यक कागदपत्रे जमा करणे, आरोपींविरुध्द सबळ पुरावे जमा करणे आवश्यक होते. पण, या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यास तपास यंत्रणा कमी पडली. याप्रकरणात तक्रारदाराचे वडील हिरो मनोहर भाटिया आणि रामेश्वर भगवान गवई हे घटनास्थळाच्या पंचनाम्याचे साक्षीदार होते.
वृध्दत्वामुळे हिरो मनोहर भाटिया न्यायालयात येऊ शकत नाही आणि कोणत्याही साधनाने आणले तरी त्यांना बोलताही येत नाही, असे न्यायालयाला तक्रारदाराच्यावतीने सांगण्यात आले. याप्रकरणातील साक्षीदारही न्यायालयात उपस्थित राहू शकत नाहीत. त्यामुळे हा खटला कशाच्या आधारे चालवायचा, असा प्रश्न करत न्यायालयाने याप्रकरणातील जीर्ण झालेली कागदपत्रे, सबळ पुराव्यांचा अभाव याचे दाखले देत याप्रकरणातील पाचही आरोपींची निर्दोष मुक्तता केली.