ठाणे : ठाणे पालिकेत लुटमार, भ्रष्टाचार सुरू आहे. पालिकेतील कामांचे ऑडिट झाले पाहिजे. त्यामुळे पालिकेच्या कारभाराची चौकशी लावावी तसेच सुरू असलेली लुटालूट थांबवावी अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. चुकीचे काम घडू नये म्हणून चांगला अधिकारी महापालिकेमध्ये पाठवावा अशी मागणीही त्यांनी केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्यावतीने पदाधिकारी, कार्यकर्ता सुसंवाद मेळावे आयोजित करण्यात येणार असून त्याचा शुभारंभ ठाण्यातून होणार आहे. या मेळाव्याची माहिती देण्यासाठी राजन विचारे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पालिकेच्या कारभारावर टिका केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्याच्या गद्दार कंपनीने ठाणे महापालिका अक्षरशः लुटून खाल्ली आहे. ठाणे महापालिकेत भिकेला लावण्याचे काम शिंदे यांनी केले असून आता अधिकारी देखील कोणाला जुमानत नाहीत, असा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. ठाण्यात सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची चौकशी लावावी तसेच चुकीचे काम घडू नये म्हणून चांगला अधिकारी महापालिकेमध्ये पाठवावा अशी मागणीही राजन विचारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

ठाणे महापालिकेला स्वतःचे धरण नाही, शहरातला कचऱ्याचा प्रश्न सुटलेला नाही, त्याचप्रमाणे अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. गेल्या अडीच वर्षात नागरी कामे रखडली आहेत. याला सर्वस्वी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच जबाबदार असून आता शिस्त लावण्याची वेळ आली आहे. चुकीचे काम घडू नये म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घालावे असे विचारे यांनी म्हटले आहे.

ठाण्यातून मेळाव्याचा शुभारंभ

ठाण्यातील खारकर आळी येथील एन के टी हॉल येथे रविवार, २ मार्च २०२५ रोजी सायंका‌‌ळी ४ वाजता पदाधिकारी, कार्यकर्ता सुसंवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी शिवसेना (उबाठा) पक्षाचे नेते संजय राऊत, सुभाष देसाई, अरविंद सावंत, अनिल देसाई, विनायक राऊत, भास्कर जाधव, अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे, दिवाकर रावते, अनिल परब, सुनील प्रभू उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती विचारे यांनी दिली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Former mp rajan vichare demand to the chief minister about investigation of thane municipal corporation asj