Ghodbunder Road Hit and Run: घोडबंदर मार्गावरील वाघबीळ उड्डाणपूलावर एका भीषण अपघातात २७ वर्षांच्या मुलीचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेनंतर घोडबंदर भागातील रहिवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे. येथील रहिवाशांचे अपघातात किती बळी जाणार असा प्रश्न विचारला जात आहे.

गेल्याकाही दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे शहरातील माजिवाडा उड्डाणपूल, घोडबंदर येथील आनंदनगर, वाघबीळ, कापूरबावडी येथे ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना अक्षरशः धोकादायक प्रवास करावा लागतो. दुचाकी आणि पादचारी विशेषतः धोक्यात आहेत. वाहतूक कोंडीत अडकून राहणाऱ्या नागरिकांचा वेळ वाया जात आहे, इंधनाचा अतिरिक्त खर्च होत आहे आणि मानसिक तणावही वाढत आहे. घोडबंदर मार्गावर मागील काही वर्षांपासून मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाची कामे सुरू आहेत. त्याचा परिणाम देखील होत आहे. मेट्रो मार्गिकेसाठी अनेक ठिकाणी खड्डे खणले होते. या खड्ड्याची कामे झाल्यानंतरही दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे मुख्य रस्ते निमुळते झाले आहेत.

कामावरुन घरी परतताना दुर्दैवी अंत

घोडबंदर येथील ओवळा भागात आरती अभिषेक मिश्रा (२७) ही तिच्या पतीसोबत राहते. ती ठाण्यातील एका खासगी कंपनीत कामाला आहे. सोमवारी कामावरुन घरी परतताना ती तिच्या स्कुटरने प्रवास करत होती. वाघबीळ उड्डाणपूलाच्या चढणीवर आली असता, एका कंटेनरची धडक तिला बसली. तिच्या अंगावरून कंटेनरची चाके गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

चालक फरार

अपघातानंतर कंटेनर चालक दानीश अन्वर मलीक हा कंटेनर सोडून घटनास्थळावरून फरार झाला. तर त्याचा सहकारी तेथे थांबला होता. घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी कंटेनर मालक आणि चालकाच्या सहकाऱ्याला पोलीस ठाण्यात आणले. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी तक्रार दाखल केली असून चालकाचा पोलीस शोध घेत आहेत. त्याच्याविरोधात मोटरवाहन अधिनियम, १९८८ चे कलम १३४ (अ) , १३४ (ब), १८४ आणि भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ चे कलम १०६ (१), १२५ (अ), १२५ (ब) आणि २८१ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे.

स्थानिकांचा संताप

या घटनेनंतर स्थानिकांनी संताप व्यक्त केला आहे. आणखी किती बळी घेणार असा प्रश्न त्यांनी प्रशासनाला विचारला आहे. या अपघातानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाने खड्डे बुजविण्याच्या कामास सुरुवात केली होती.