कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडी नेसलेली प्रतिमा समाज माध्यमांवर प्रसारित केली म्हणून काही दिवसापूर्वी डोंबिवलीत मानपाडा रस्त्यावर काँग्रेसचे निष्ठावान कार्यकर्ते मामा पगारे (७२) यांना भाजपच्या डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांनी भर रस्त्यात शालू नेसवून मामा पगारे यांची बदनामी केली होती. मामा पगारे यांनी याप्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. पण हा गुन्हा टिळकनगर पोलिसांनी दाखल करून न घेतल्याने त्याचा निषेध करण्यासाठी शनिवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली कल्याण येथे पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
कार्यक्रमस्थळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांचे आगमन होताच, आपल्या निष्ठावान, सच्च्यावर कार्यकर्त्याची भाजप पदाधिकाऱ्यांनी बदनामी केली आणि त्याचा निषेध म्हणून सामान्य कार्यकर्ता असले तरी वयाने ज्येष्ठ असलेल्या मामा पगारे यांना प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी व्यासपीठाजवळ अलगद उचलून खांद्यावर घेतले. प्रदेशाध्यक्षांची ही कृती पाहून सर्वच काँग्रेस नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आवाक झाले. व्यासपीठाजवळ मामा पगारे यांना उचलल्यानंतर त्यांचे दोन्ही हात उंचावून काँग्रेस मामा पगारे या्ंच्या पाठीशी ठामपणे आहे हे दाखविण्याचा प्रयत्न प्रदेशाध्यक्ष सकपाळ यांनी केला.
मामा पगारे यांना खांद्यावर बसलेले घेऊन प्रदेशाध्यक्ष सकपाळ व्यासपीठाच्या पायऱ्या चढून गेले. आणि पुन्हा व्यासपीठावरून मामा पगारे यांचा चेहरा कार्यकर्ते, लोक बसलेल्या दिशेने करून आम्ही मामा पगारे यांच्या पाठीशी आहोत. त्यांच्यावरील अन्याय काँग्रेस पक्ष सहन करणार नाही हे दाखवून दिले. जोपर्यंत मामा पगारे यांच्या प्रकरणात भाजप पदाधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याने गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत काँग्रेस गप्प बसणार नाही, असा इशारा यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी दिला.
मामा पगारे यांच्या सारख्या ७२ वर्ष वयाच्या निष्ठावान कार्यकर्त्याला बळ देण्यासाठी आणि त्यांच्या पाठीशी उभे राहण्यासाठी प्रदेशाध्यक्ष स्वता कल्याणमध्ये आल्यान काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला होता. भाजप निषेधाच्या घोषणा यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांकडून देण्यात येत होत्या. सामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी काँग्रेस ठामपणे उभी आहे, असा संदेश यामाध्यमातून सकपाळ यांनी दिला.
काही दिवसापूर्वी मामा पगारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची साडी नेसलेली समाज माध्यमांवर आलेली प्रतिमा समाज माध्यमांमध्ये सामायिक केली होती. आपल्या सर्वोच्च नेत्याचा मामा पगारे अपमान करत आहेत म्हणून भाजपचे कल्याण जिल्हाध्यक्ष नंदू परब, संदीप माळकर, दत्ता माळेकर आणि इतरांनी मामा पगारे यांना एक इमारत पुनर्विकासाचे खोटे कारण देऊन भेटीसाठी बोलविले. आणि मामा डोळे दाखविण्यासाठी रुग्णालयात जाण्याच्या तयारीत असताना त्यांना घराच्या बाहेर मानपाडा रस्ता भागात भाजप पदाधिकाऱ्यांनी घेरले आणि मामा पगारे यांना काही कळण्याच्या आत त्यांना त्यांच्या स्वच्छ शुभ्रधवल गणवेशावर लालनिळा भरजरी शालू नेसविला होता.
यावेळी मामांनी कठोर विरोध केला. पण भाजप पदाधिकाऱ्यांनी त्यांना पुन्हा पंतप्रधानांची बदनामी करून नका असा सल्ला देत तेथून निघून जाणे पसंत केले होते. यावरून भाजप, काँग्रेसमध्ये जोरदार घमासान सुरू आहे. त्यामुळे भाजप पदाधिकाऱ्यांना कठोर शिक्षा झाल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही असा पण मामांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर शनिवारी पोलीस उपायुक्त कार्यालयासमोर काँँग्रेसने ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.